36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसंपादकीयनाही मी बोलत...!

नाही मी बोलत…!

एकमत ऑनलाईन

रंगभूमीवरून संगीत नाटके लुप्त होत चालली आहेत, ही नाटके जिवंत ठेवणारे कलाकारही नाहिसे होत आहेत. आता जी नाटके सादर केली जातात त्यात संगीत नसते फक्त बॅकग्राऊंड म्युझिक असते. पाच-सात दशकांपूर्वी संगीत नाटकांचा बोलबाला होता. संगीत नाटक म्हटले की डोळ्यासमोर एकच नाव यायचे ते म्हणजे बालगंधर्व! बालगंधर्वांनी संगीत नाटके जिवंत ठेवली होती. केवळ त्यांची अदाकारी पहायला लोक गर्दी करायचे. या नाटकांना कालमर्यादेचे बंधन नव्हते. नाटकातील गाण्यांना ‘वन्समोअर’ मिळायचे. त्यामुळे ही नाटके रात्रभर चालायची. हळूहळू प्रेक्षकांची रुची बदलू लागली, त्यामुळे संगीत नाटके लयाला गेली आणि त्यातील कलाकारांनीही एक्झिट घेतली. परंतु काल-परवापर्यंत एका घराण्याने संगीत नाटक जिवंत ठेवले होते. ते घराणे म्हणजे शिलेदार. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याने संगीत रंगभूमी जिवंत ठेवली होती. त्यांच्या कन्या कीर्ती आणि दीप्ती भोगले यांनी तोच वारसा पुढे चालवला होता. संगीत रंगभूमीची परंपरा जपणा-या कीर्ती शिलेदार यांचे शनिवारी निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या.

सुमारे सहा दशके संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणा-या ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचे जाणे नाट्यरसिकांना चटका लावणारे आहे. आपल्या अभिनयाने आणि सुरेल गायनाने त्यांनी संगीत नाटकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी आपल्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले होते. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत आणि परिश्रम केले होते. संगीत नाटक हाच त्यांच्या आई-वडिलांचा म्हणजे जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा ध्यास होता. तोच वारसा कीर्ती शिलेदार यांनी जपला. त्यांची बहीण दीप्ती यांनीही त्यांना साथ दिली परंतु दीप्ती कीर्तीइतक्या चमकल्या नाहीत. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. मराठी रसिकांना रिझविण्यासाठी त्यांनी विविध शहरांत संगीत नाटकाचे प्रयोग केले. हे करताना त्यांनी कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत मराठी संगीत रंगभूमीची सेवा अखंडपणे अनेक वर्षे केली. एकच प्याला, कान्होपात्रा, द्रौपदी, मानापमान, ययाति आणि देवयानी, शाकुंतल, संशयकल्लोळ, सौभद्र अशा संगीत नाटकांनी त्यांना अजरामर कीर्ती दिली. १६ ऑगस्ट १९५२ रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. संगीत नाटकांकडे त्यांचा ओढा असला तरी शिक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्यांनी मराठी विषयात बी. ए.ची पदवी घेतली होती. बालपणापासूनच त्यांच्यावर संगीत व अभिनयाचे संस्कार झाले.

आई-वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे घेतले. गोड गळ्याची दैवी देण आणि शास्त्रीय संगीतासाठी घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे त्यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. कोणतेही आव्हान स्वीकारण्यास त्या तयार असायच्या. ‘संगीत सौभद्र’ नाटकात त्यांनी प्रथमच नारदाची भूमिका केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. ‘संगीत कान्होपात्रा’सह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. आपल्या गोड गळ्याने त्यांनी बालगंधर्व यांच्या सुवर्णयुगाची आठवण करून दिली. कीर्ती शिलेदार यांनी गायिलेली अनेक गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हाच त्यांच्या आईवडिलांचा श्वास आणि ध्यास होता. कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या आणि साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले. दीप्ती भोगले (लता शिलेदार) या त्यांच्या मोठ्या बहिणीच्या ‘संगीत नादलुब्ध’ आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शन कीर्ती शिलेदार यांनी केले होते. पारंपरिक संगीत नाटकांचा विचार आणि बदलत्या काळानुसार नावीन्याचा अंतर्भावही त्यांच्या संगीत नाटकात आणि संगीतात दिसून येतो.

र्कीतीताईंनी ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे महत्त्व सांगणारा शोधनिबंधही लिहीला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली आहेत. दीप्ती भोगले यांनी कीर्ती यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा ‘मम सुखाची ठेव’ हा लघुपट नुकताच प्रदर्शित केला आहे. कीर्ती शिलेदार यांची अनेक नाटके आणि भूमिका गाजल्या. अभोगी (गगनगंधा), एकच प्याला (सिंधू), कान्होपात्रा (कान्होपात्रा), द्रौपदी (द्रौपदी), मंदोदरी (मंदोदरी), मानापमान (भामिनी), मृच्छकटिक (वसंतसेना), ययाति आणि देवयानी (शर्मिष्ठा), रंगात रंगला श्रीरंग (माधवी), रामराज्यवियोग (मंथरा), विद्याहरण (देवयानी), संशयकल्लोळ (रेवती), सौभद्र (कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा), स्वयंवर (रुक्मिणी), स्वरसम्राज्ञी (मैनाराणी) अशा विविध रंगछटा त्यांनी सादर केल्या आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. २०१४ सालचा महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कृत बालगंधर्व पुरस्कार, नाट्यदर्पण रजनीचा नाट्यव्रती सन्मान तसेच पुणे महापालिकेच्या बालगंधर्व पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्या दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीच्या सदस्य होत्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पन्नासहून अधिक वर्षे सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार होत्या. संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली. संगीत रंगभूमीची झालेली हानी कधीही भरून न निघणारी आहे. बालगंधर्वांचा आशीर्वाद त्यांच्यावर होता. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच गंधर्वमय होऊन गेले होते. त्यांनी नाट्य संगीताची परंपरा भक्कमपणे सांभाळली होती; नाट्यसंगीत जिवंत ठेवले होते. असा हा नाट्य संगीतातील देदीप्यमान तारा अकाली निखळून पडला आहे.. रंगभूमीच्या उतरत्या काळात शिलेदार कुटुंबियांनी रंगभूमीची धुरा सांभाळली आणि रंगभूमीला उभारी दिली. आता मराठी रसिकांनी कितीही आर्जवे केली तरी कीर्तीताई प्रतिसाद देणार नाहीत… नाही मी बोलत…रसिका…!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या