18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeसंपादकीयपरिणामकारकतेचा गोंधळ!

परिणामकारकतेचा गोंधळ!

एकमत ऑनलाईन

सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूने जगासमोर संकट उभे केले तेव्हा या संकटावर मात करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू झाले. अनेक शास्त्रज्ञ, वैज्ञानिक परिणामकारक लसनिर्मितीच्या कामाला लागले. अथक परिश्रमानंतर काही लसींचा शोध लावण्यात आला. भारतीय वैज्ञानिकांचाही यात सहभाग होता. पुण्याच्या सीरम संस्थेने इंग्लंडमधील कंपनीच्या सहभागाने कोव्हिशिल्ड लस तयार केली तर हैदराबादच्या भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस तयार केली. भारतात सर्वप्रथम कोव्हिशिल्ड लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली. नंतर कोव्हॅक्सिनलाही केंद्र सरकारने आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. भारत बायोटेकने आपली लस ७८ टक्के परिणामकारक असल्याचे म्हटले होते. परंतु या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली नव्हती. ही मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या लसीला मंजुरी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोव्हॅक्सिनचा वापर होण्यातील अडथळा दूर झाला. परंतु नुकतेच ‘लॅन्सेट’ नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार कोव्हॅक्सिन लसीबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

कोव्हॅक्सिन फक्त ५० टक्केच प्रभावी असल्याचे ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे. ‘लॅन्सेट’ने प्रकाशित केलेल्या अभ्यासासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील सुमारे अडीच हजार आरोग्य कर्मचा-यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या कर्मचा-यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यांनी १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत आरटीपीसीआर चाचणी केली होती आणि त्यांना कोव्हॅक्सिनचे दोन डोसही देण्यात आले होते. ‘लॅन्सेट’ने देशात कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक गंभीर असताना हा अभ्यास केला होता. या काळात कोरोनाबाधितांपैकी ८० टक्के रुग्ण हे डेल्टा विषाणूने बाधित होते. १६ जानेवारीला देशात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा एम्सने २३ हजार कर्मचा-यांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले होते. त्यापैकी अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या २ हजार ७१४ कर्मचा-यांपैकी १ हजार ६१७ कर्मचा-यांना या लसीचे दोन डोस दिल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

ही लस ५० टक्के प्रभावी असण्याची कारणेही अभ्यास अहवालात देण्यात आली आहेत. एक तर दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वोच्च पातळीवर असताना हा अभ्यास करण्यात आला, शिवाय या कालावधीत डेल्टा विषाणू वेगाने पसरत होता. त्यामुळे लस प्रभावी ठरण्याचे प्रमाण कमी आढळले. कोव्हॅक्सिन ५० टक्केच प्रभावी असली तरी तिच्या सुरक्षेबाबत चिंता करण्याची गरज नाही असेही ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे. भारत बायोटेकने ही लस बनवताना भारताच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने अलग केलेल्या कोरोना विषाणूचा नमुना वापरला होता. ही लस दिल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कोरोना विषाणूची रचना ओळखू शकते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला कोरोनाशी लढणे सोपे होते. कोव्हॅक्सिनचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने घ्यावे लागतात. लसींबाबत पाश्चात्त्य देशांचा दुराग्रह दिसून येतो. हे देश आपलीच लस चांगली असल्याचे सांगतात आणि दुस-या लसींना दुय्यम समजतात.

याबाबतचे ताजे उदाहरण म्हणजे इंग्लंडने महिनाभरापूर्र्वी जाहीर केलेले प्रवासी धोरण. ४ ऑक्टोबरनंतर अनेक देशांतील लसीकरण पूर्ण झाले असेल असे गृहित धरण्यात आले होते. परंतु इंग्लंडने या लसीकरणाला मान्यता दिली नव्हती. लस घेतलेल्या व्यक्तींना देखील इंग्लंडमध्ये प्रवेश केल्यानंतर दहा दिवस विलग राहणे बंधनकारक करण्यात आले होते. आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली होती. इंग्लंडने ज्या देशांना हे नियम लागू केले होते त्यात भारताचाही समावेश होता. विशेष म्हणजे इंग्लंडमधील कंपनीच्या सहकार्याने तयार केलेल्या कोव्हिशिल्डची लस घेणा-या नागरिकांनाही इंग्लंडने या यादीत टाकले होते. नंतर इंग्लंडने हे निर्बंध मागे घेतले. इंग्लंडचे धोरण भेदभावाचे होते. कोरोनाच्या महाभयंकर संसर्गाच्या काळात कोविड प्रतिबंधक लसीकडे आशेचा किरण म्हणून पाहिले गेले. दीड वर्षात जगभरातील सुमारे २० हून अधिक लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली. परंतु ही मान्यता देतानाही काही देशांनी राष्ट्रवाद आणला.

अनेक संपन्न देशांनी आपल्या नागरिकांसाठी आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत पाचपट अधिक लसींचा साठा करून ठेवला. भारताने अलीकडेच लस पुरवठ्याबाबत घोषणा करताना ऑक्टोबर महिन्यात लसींचा अतिरिक्त साठा परदेशात पाठवण्यात येईल असे म्हटले. या घोषणेचे जागतिक आरोग्य संघटनेने स्वागत केले. अजूनही कमी उत्पन्नाच्या देशात पुरेशा डोसचा तुटवडा आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वच देशांना सारख्या प्रमाणात डोस उपलब्ध होणे आवश्यक आहे. पण ही तफावत श्रीमंत देशांमुळे निर्माण झाली आहे. या देशातील ८० टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत आणि आता ते तिस-या-चौथ्या डोसचा विचार करीत आहेत. भारतात अजूनही दोन डोस पूर्ण झालेले नाहीत. लसीकरणातील हे जागतिक राजकारण थांबले पाहिजे. भारतानेही याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

कोविड लसीसंबंधीची माहिती सार्वजनिक झाली पाहिजे. आजही काही देशांत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. भारतातही कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे विषाणू संसर्ग पसरू शकतो. अनेक राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. विवाहसमारंभात गर्दी होऊ लागली आहे. पर्यटन, उत्सव साजरे करणे झोकात सुरू आहे. अनेकजण विविध ठिकाणी प्रवास करत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. कोविड कमी झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. कोरोनासंबंधीच्या नियमावलीचे पालन करावेच लागेल. आज अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. सामाजिक अंतर ठेवण्याचा केव्हाच फज्जा उडाला आहे. घरोघरी लसीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधक लसीच्या परिणामकारकतेसंबंधी फारसा विचार न करता डोस घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या