20.7 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeसंपादकीयपळपुटा कप्तान !

पळपुटा कप्तान !

एकमत ऑनलाईन

क्रिकेटच्या मैदानावरचा पाकिस्तानचा सर्वांत यशस्वी कप्तान म्हणून नावाजले गेलेले इम्रान खान देशाच्या राजकीय मैदानावरचे केवळ अपयशीच नाही तर चक्क पळपुटा कप्तान ठरले आहेत. विरोधकांनी त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यावर इम्रान खान यांनी ‘मैदान सोडणार नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार,’ असा दावा करत सत्तेला चिकटून राहण्याचा प्रयत्न केला व सन्मानाने व खिलाडूपणे पराभव स्वीकारण्याची संधी गमावली. खरे तर सरकारचे सहकारी पक्ष विरोधकांना जाऊन मिळाल्याने इम्रान खान सरकार पूर्णपणे अल्पमतात आले होते व सरकार वाचणार नाही हे सुस्पष्ट झाले होते. मात्र, लष्कराच्या मदतीने आपण सत्तेवर राहण्याचा चमत्कार घडवू, अशी बहुधा इम्रान खान यांची अटकळ होती. लष्कराने आपला खांदा काढून घेतल्यावर इम्रान खान सैरभैर झाले. खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारून देशाच्या भल्याचा विचार करण्याऐवजी त्यांनी रडीचे डाव खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला हा अविश्वास ठराव होता होईल तितका लांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला व स्वत:चे अपयश लपविण्यासाठी देशच असुरक्षित आहे, माझे सरकार घालवण्याचा कट परकीय शक्तींनी रचला आहे, असा कांगावा करण्यास सुरुवात केली. त्यांचा रोख थेट अमेरिकेकडे होता व देशातील कट्टरतावाद्यांना आपल्या पाठिशी घेण्याची ही इम्रान खान यांची खेळी होती. मात्र, पाकिस्तान लष्कराने इम्रान यांच्या सुरात सूर मिसळण्यास नकार देत अमेरिकेशी सहकार्य वाढविण्याची भूमिका मांडली.

इम्रान यांनी उपस्थित केलेल्या काश्मीरच्या मुद्यावरही लष्कराने त्यांना समर्थन देणारी भूमिका घेतली नाहीच. उलट भारताशी शांततापूर्ण चर्चेने हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी भूमिका घेतली. लष्कराच्या या भूमिकेत किती प्रामाणिक भावना आहे, हे सगळ्या जगाला माहितीच आहे पण इम्रान यांच्या नौटंकीत लष्कर आपला सूर मिसळणार नाही, हे दाखवून देण्यासाठीच लष्कराने ही भूमिका घेतली, हे उघड आहे. आपली कुठलीच खेळी यशस्वी होत नसल्याचे लक्षात आल्यावर इम्रान खान यांनी अखेरचे अस्त्र बाहेर काढत रडीचा डाव खेळला. आपले सरकार वाचविण्यासाठी नाराज व सोडून गेलेल्या सहका-यांचे मन वळवून त्यांना आपल्यासोबत घेण्याचा सनदशीर मार्ग उपलब्ध असतानाही विरोधकांना सरसकट फुटीरतावादी व दहशतवादी ठरवण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला! संसदेच्या उपसभापतींना हाताशी धरून विरोधकांचा अविश्वास ठराव हा घटनाविरोधी ठरवून तो फेटाळून लावला. एवढेच नाही तर पाकिस्तानची संसद बरखास्त करून तीन महिन्यांत निवडणुका घेण्याची शिफारसही करून टाकली आणि उपसभापतींनी ती मान्य करत संसद बरखास्तही करून टाकली. हा घटनेतील कलमांचा आपल्या सोयीसाठी वापर करण्याचा रडीचा डावच! मात्र, इम्रान यांनी तो खेळला कारण पराभव स्वीकारण्याची खिलाडूवृत्ती स्वत: खेळाडू असूनही त्यांच्या अंगी नाहीच. त्यामुळे ते राजकीय मैदानावरचे पळपुटे कप्तानच ठरले.

त्यांच्या या पळपुटेपणामुळे पाकिस्तान अराजकाच्या व अस्थिरतेच्या दिशेने लोटला गेला आहे. मात्र, त्याबद्दल इम्रान यांना ना खेद आहे, ना खंत! इम्रान यांच्या या रडीच्या डावाविरुद्ध विरोधकांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा फैसला आल्यावरच पाकिस्तानात आता पुढे काय? याचे उत्तर मिळणार आहे. पाकिस्तानात एकीकडे प्रचंड महागाई व आर्थिक संकटाने देशातील जनता अक्षरश: मेटाकुटीला आलेली असताना इम्रान यांनी स्वत:च्या जबाबदारीचे भान न ठेवता देशाला अस्थिरतेकडे लोटले आहे. याचा फायदा उठवून पाक लष्कर देशाची सत्ता ताब्यात घेऊ शकते. मात्र, अशा प्रकाराला जगभरातून होणारा विरोध लक्षात घेता पाक लष्कर स्वत:चा अंकित पुढे करून त्याच्याकरवी देशावर ताबा मिळविण्याची शक्यता जास्त! इम्रान यांनी संसद बरखास्त करण्याचा रडीचा डाव खेळला असला तरी तो न्यायालयात यशस्वी होईलच असे नाही कारण उर्वरित कालावधीसाठी पर्यायी सरकार देण्याची तयारी विरोधकांनी केलेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने संसद उपसभापतींनी इम्रान यांची शिफारस स्वीकारणे हे घटनाबा ठरवले तर इम्रान यांचा हा रडीचा डावही फसणार आहे.

अर्थात इम्रान यांनी स्वत:च्या वर्तनातून आपण घटनेची व लोकशाही मूल्यांची बूज ठेवणार नसल्याचे स्पष्ट केलेलेच आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतरही पाकिस्तानातील राजकीय संघर्ष शमण्याची चिन्हे कमीच! त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकवार अस्थिरतेच्या व अराजकाच्या फे-यात अडकणार हे उघडच! या स्थितीचा फायदा या देशात आश्रयाला असलेल्या दहशतवाद्यांकडून उचलला जाणार हे उघडच! अगोदरच अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात आहे. त्यात पाकमध्येही मूलतत्त्ववाद्यांना मोकळे रान मिळणे, हे आशिया खंडातीलच नव्हे तर जगातील सर्वच देशांसाठी धोकादायक! अगोदरच रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा जगाला सोसाव्या लागतायत. त्यात पाकमध्ये अराजकाची स्थिती निर्माण होणे जगाच्या व विशेषत: भारताच्या डोकेदुखीत मोठी भर घालणारीच! अस्थिर पाकिस्तानचा सर्वांत जास्त फटका हा भारतालाच बसतो, हा आजवरचा इतिहास आहे. केवळ काश्मीरमध्येच नव्हे तर देशातही अतिरेकी कारवाया वाढतात, हे लक्षात घेऊन भारताला आता तयारीत रहावे लागेल. शिवाय या अराजकाच्या स्थितीमुळे पाकमधून येणा-या स्थलांतरितांचे लोंढेही भारताला सोसावे लागणार आहेत.

एकंदर कोरोना संकटातून बाहेर पडून आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या भारतासमोर आता अस्वस्थ शेजाराचे नवे संकट उभे ठाकले आहे. चीनच्या वळचणीला गेलेला श्रीलंका तेथे बहुमताचे सरकार असतानाही आर्थिक संकटामुळे उद्ध्वस्त झालाय व त्याच्या परिणामी अस्थिर बनला आहे. श्रीलंकेसाठी भारताने तातडीने मदत उपलब्ध करून दिलेली असली तरी त्यामुळे त्या देशातून भारतात येणारे स्थलांतरितांचे लोंढे थांबलेले नाहीत. ते कसे रोखायचे ही चिंता भारताला सतावत असताना इम्रान खान यांनी पाकिस्तानला अराजकाच्या स्थितीकडे लोटले आहे. या स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न चीनकडून होणार हे उघडच, ही भारतासाठी आणखी मोठी चिंतेची बाब! उद्या पाकमध्ये निवडणूक लागली तरी या निवडणुकीतील प्रचारात भारतविरोधाच्या मुद्यावरच भर दिला जाणार, हे उघड आहे.

इम्रान खान स्वत:चे अपयश झाकण्यासाठी व त्यावरून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी हीच पटकथा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत, हे तर आता स्पष्टच झाले आहे. थोडक्यात या अस्वस्थ शेजाराचा मोठा त्रास येत्या काळात भारताला सहन करावा लागणार आहे. त्यासाठी आता भारताला सज्ज व दक्ष रहावे लागेल आणि या संकटातून मार्ग काढण्याचे मार्गही शोधावे लागतील. त्यातच इम्रान खान यांचा कांगावा यशस्वी ठरून ते परत पाकिस्तानात सत्तेवर आले तर पाकिस्तानही श्रीलंकेप्रमाणे पुरता उद्ध्वस्त होणार, हे सुस्पष्टच आहे. कारण इम्रान केवळ अपयशीच नाही तर पळपुटे कप्तान आहेत व त्याचाच परिणाम आज पाकच्या जनतेला सोसावा लागतोय!

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या