23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeसंपादकीयपोलादी भिंतीला हादरे !

पोलादी भिंतीला हादरे !

एकमत ऑनलाईन

चीनमधील एकाधिकारशाहीच्या पोलादी भिंतीमुळे त्या देशात नेमके काय घडते आहे याची सविस्तर व सत्य माहिती जगाला सहसा प्राप्त होत नाही. तेथील लाल राजवटीला जेवढे आणि जसे जगाला सांगायचे असते तेवढेच या देशातून सांगितले जाते. त्यामुळेच कोरोना महामारीचा जन्मदाता असलेल्या चीनमध्ये या महामारीने किती बळी घेतले व चीनच्या झीरो कोविड धोरणाचे यश-अपयश काय? याची नेमकी व सत्य माहिती अद्यापही जगासमोर आलेली नाही आणि कदाचित ती कधीच बाहेर येणार नाही! मात्र, माहिती जगापासून दडवल्याने किंवा चुकीचा प्रचार करून स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याने वास्तव स्थिती वा सत्य बदलत नाहीच. त्याचीच प्रचीती सध्या चीनबाबत येते आहे.

चीनने कडक प्रतिबंध व लसीकरण याद्वारे कोरोनावर संपूर्ण विजय मिळविल्याचा दावा केला होता. मात्र, आता चीनमध्ये पुन्हा एकवार कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये त्यांच्या झीरो कोविड धोरणाप्रमाणे पुन्हा एकवार कडक टाळेबंदीसह जनतेवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, चीनच्या जनतेला सरकारच्या धोरणाचा व उपाययोजनांचा फोलपणा बहुधा आता पूर्णपणे कळून चुकला असल्याने देशभर जनता रस्त्यावर उतरली आहे आणि सरकारने लादलेल्या कडक निर्बंधांचा तीव्र विरोध करते आहे. अर्थात निर्बंधांचा असा विरोध अमेरिकेसह जगातल्या अनेक देशांतील जनतेने कोरोनाकाळात केलेला आहेच. त्यामुळे चीनमध्येही जनतेने निर्बंधांना विरोध केला तर त्यात वावगे काय? असा युक्तिवाद नक्कीच केला जाऊ शकतो व तो योग्यही. मात्र, तो पूर्ण सत्य नाही तर अर्धसत्य ठरतो कारण निर्बंधांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली जनता केवळ निर्बंध उठवण्याची वा जनतेला स्वातंत्र्य बहाल करण्याची मागणी करून थांबत नाही तर त्यापुढे जाऊन तहहयात चीनचे अध्यक्षपद आपल्या नावावर करून घेणा-या शी जिनपिंग यांनी पदावरून पायउतार होण्याची मागणी करते आहे.

चीनमधील निर्बंधांच्या विरोधातील हे वेगळेपण आहे आणि म्हणूनच हा विरोध जगातील इतर देशांमध्ये झालेल्या विरोधापेक्षा वेगळा ठरतो. हा जिनपिंग यांच्या राजवटीच्या कोविड धोरणाला आलेल्या अपयशाचा वा चीनच्या लसी निकामी ठरल्याच्या मुद्यावरचा चिनी जनतेचा संताप नाही तर तो शी जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधातील जनतेचा उद्रेक आहे. त्यामुळेच विरोधाचे हे लोण चीनच्या एक-दोन शहरांपुरते वा राज्यांपुरते मर्यादित न राहता देशभर पसरले आहे आणि हे पूर्ण सत्य आहे! चीनचे कोविड प्रतिबंधाचे धोरण व कोरोनावर घाईघाईने विकसित करण्यात आलेल्या लसी अपयशी ठरल्याचे जगजाहीर आहे. भलेही चीन हे सत्य नाकारत असला तरी ज्या इतर देशांनी चीनच्या लसी वापरल्या त्यांना या लसींचा काहीही फायदा झाला नाही व कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच या देशांना कोरोना नियंत्रणासाठी इतर मार्ग शोधावे लागले. त्यामुळे चीनने कितीही कोंबडे झाकण्याचा प्रयत्न केला तरी कोविडबाबतचे त्यांचे सत्य उजेडात आले आहेच. मात्र, चिनी जनतेचा संताप केवळ त्यामुळेच नाही, हे जनतेच्या मागण्यांवरून स्पष्ट होते. एकाधिकारशाही व बळाच्या वापराने आपले सिंहासन अभेद्य बनवणा-या जिनपिंग यांच्या सिंहासनाला हादरे देण्याचा चिनी जनतेचा इरादा या नव्या असंतोषातून स्पष्ट दिसतो आहे.

भलेही निमित्त नव्याने लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे असो की, या निर्बंधांमुळे उघियूर प्रांतातील उरुम्की येथे एका इमारतीला आग लागल्याने दहा जणांचा मृत्यू झाल्याचे असो पण हा असंतोष वा उद्रेक तेवढ्यापुरता मर्यादित नाही तर तो जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधातला आहे आणि तो केवळ कोरोनाच्या कारणानेच निर्माण झालेला नाही तर त्यामागे आर्थिक व स्वातंत्र्याच्या गळचेपीचीही कारणे आहेत. कोरोनाचे कारण पुढे करून जनतेच्या असंतोषाला दडपून टाकण्याचा प्रयत्न जिनपिंग यांच्या राजवटीने आरंभिला असल्यानेच चीनची जनता एकाचवेळी देशभर रस्त्यावर उतरून जिनपिंग यांनी पायउतार होण्याची मागणी करते आहे, हाच या घटनाक्रमाचा अन्वयार्थ! याचाच अर्थ चीनची जनता देशाच्या आर्थिक स्थितीने अस्वस्थ आहे व त्याचबरोबर जिनपिंग यांनी पक्षांतर्गत विरोधकांना मोडित काढून तहहयात अध्यक्षपद व सत्ता आपल्या हाती घेतलेले चीन जनतेला अजिबात रुचलेले नाही. चीनने कितीही खोटे अवसान आणले तरी चीनच्या आर्थिक प्रगतीचा आलेख या दशकात सपाट झाला आहे व आता तर त्यात उतरणीला सुरुवात झाली आहे. जागतिक बँकेच्या माहितीनुसार २०१३ मध्ये चीनचा आर्थिक विकास दर ७.२ टक्के होता. त्यानंतर तो सातत्याने कमी होत गेला.

२०२० मध्ये तो अवघ्या दोन टक्क्यांवर होता. त्यासाठी कोरोना महामारीचे कारण पुढे करण्यात आले तरी विकास दरातील सातत्याने होणा-या घसरणीला केवळ कोरोनाच कारणीभूत आहे, हा दावा सपशेल खोटाच! कारण कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वीही चीनच्या आर्थिक विकास दराला मोठी घरघर लागलेलीच होेती. सध्या चीनमध्ये रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमध्ये तरुणांची व विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. हा वर्ग केवळ निर्बंधांच्या विरोधात राजवटीविरुद्ध रस्त्यावर उतरेल व थेट जिनपिंग यांच्याच हकालपट्टीची मागणी करेल, असे वाटत नाही. आर्थिक अस्वस्थता व भविष्याची चिंता निर्माण झाल्याशिवाय पोलादी भिंतीच्या राजवटीला धडका देण्यास चिनी जनता धजावेल असे या देशाचा पूर्वेतिहास पाहता वाटत नाही. या अगोदर या देशात विद्यार्थ्यांचा झालेला उठाव चिनी राजवटीने निर्दयपणे चिरडून टाकला होता. मात्र, त्याची प्रतिक्रिया देशात इतरत्र कुठे उमटली नव्हती की, राजवटीच्या विरोधात असंतोष निर्माण झाला नव्हता कारण त्यावेळी जनता देशाच्या आर्थिक स्थिती व प्रगतीबाबत समाधानी होती. यावेळी तसे घडत नाही. आंदोलनाला निमित्त कोविड निर्बंधांचे असले तरी या आंदोलनाचे लोण एका प्रांतापुरते वा शहरापुरते मर्यादित न राहता ते झपाट्याने देशभर पसरले आहे व त्यात झपाट्याने वाढ होतेय. बळाचा वापर करून हा असंतोष दाबण्याचा राजवटीचा फंडा त्यांच्याच अंगलट आला आहे कारण या आंदोलनाने जिनपिंग यांच्या राजवटीविरुद्धच्या असंतोषाचे रूप धारण केले आहे.

अर्थात त्यातून जिनपिंग यांना किती धक्का बसेल हे आताच सांगता येणार नाही कारण असा असंतोष निर्दयपणे बळाचा प्रचंड वापर करून चिरडून टाकण्याची चिनी सत्ताधीशांची परंपराच आहे. त्यामुळे या आंदोलनाने जिनपिंग यांचे मजबूत सिंहासन लगेच खिळखिळे होईल असे नाही. मात्र, आता त्याला हादरे बसवण्यास व तडे जाण्यास सुरुवात झाली आहे, हे निश्चित! जनतेच्या स्वातंत्र्याच्या व आर्थिक प्रगतीच्या इच्छेची गळचेपी बळाच्या वापराने कायमस्वरूपी करता येत नाहीच उलट अशा गळचेपीचे प्रयत्न असंतोषाचे रुपांतर उद्रेकात व बंडात करण्यास कारणीभूत ठरतात हा जगाचा आजवरचा इतिहास आहे. जिनपिंग यांना तो ज्ञात असेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यामुळे देशांतर्गत मिळणा-या आव्हानाचा सामना करण्यासाठी जिनपिंग आता कोणता मार्ग निवडतात ते पाहायचे. त्यांंनी चुकीचा मार्ग निवडला तर चीनच्या पोलादी भिंतीच्या उद्ध्वस्ततेची ती नांदी ठरेल, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या