19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeसंपादकीयरक्तरंजित बंगाल !

रक्तरंजित बंगाल !

एकमत ऑनलाईन

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील जळितकांडाने समाजाची विवेकबुद्धी हादरली आहे, असे निरीक्षण नोंदवत व या प्रकरणाचा अपेक्षेप्रमाणे तपास झाला नसल्याचा ठपका ठेवत कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्याने प. बंगालमधील विरोधी पक्ष व केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या गोटात आनंदाला उकळ्या फुटल्या आहेत कारण या मुद्याचा जोरदार प्रचार करून व राजकीय आरोपांचा धुरळा उडवून देऊन राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल पक्ष यांना बदनाम करण्याची आयती संधीच भाजपला मिळाली आहे. प. बंगाल विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपचे प. बंगाल सर करण्याचे स्वप्न धुळीस मिळवल्यावर ममतांनी केंद्रात भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची जाहीर घोषणा केली होती व भाजपच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे पलटवार करून भाजप ममतांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करणार, हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची गरजच नाही.

स्वत: ममतांनाही भाजपला शिंगावर घेताना याची जाणीव नाही, असे मानणे राजकीय अपरिपक्वताच! ही सगळी स्थिती लक्षात घेता ममतांनी या प्रकरणाकडे मुख्यमंत्री म्हणून निष्पक्षपणे पाहणे व दोषींना शिक्षा होण्यासाठी आग्रही राहणे आवश्यक होते व त्याद्वारे भाजपला या मुद्याचे राजकारण करण्याची संधी मिळणार नाही याची दक्षता घेणे जास्त आवश्यक होते मात्र, ममताही त्याच माळेतील मणी, शिवाय कुठल्याही मुद्यावर आक्रस्ताळेपणा हेच उत्तर यावर त्यांचा ठाम विश्वास. त्यामुळे या प्रकरणाच्या जलद व योग्य तपासावर लक्ष केंद्रित करण्याचा मुख्यमंत्री म्हणून असणा-या प्राथमिक कर्तव्याचा त्यांना विसर पडला व भाजपच्या राजकीय आरोपांना प्रत्युत्तर देण्यातच त्या मग्न राहिल्या. परिणामी भाजपच्या सापळ्यात त्या अलगद सापडल्या व भाजपला त्यांना बदनाम करण्याची आयती संधी त्यांनी स्वहस्ते उपलब्ध करून दिली. आता उच्च न्यायालयाने योग्य तपास होत नसल्याचा ठपका ठेवत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्याने भाजप विजयोत्सव साजरा करणे साहजिकच कारण त्यांच्या आरोपाला न्यायालयाच्या निर्णयाने अप्रत्यक्ष बळच मिळाले आहे.

प्रत्यक्षात ते तसे आहे की नाही, हे अलहिदा पण भाजप तसेच चित्र पूर्ण शक्तीनिशी रंगवणार व ममतांच्या सरकारची बदनामी करत राहणार हे उघडच! त्यातून राष्ट्रीय पातळीवर भाजपला धक्के देऊ पाहणा-या ममतांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे करून भाजप ममतांचे मनसुबे कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार! हा झाला राजकारणाचा भाग. त्याला ममता कदाचित आपल्या पद्धतीने उत्तर देतीलही. मात्र, या सगळ्या घटनाक्रमाने देशपातळीवर भाजपला टक्कर देण्यास निघालेल्या ममतांबाबत देशातील सर्वसामान्यांच्या मनात जी प्रतिकूल प्रतिमा रुजणार आहे, ती ममता कशी दूर करणार? हाच प्रश्न! यात या नृशंस व अंगावर काटे आणणा-या हत्याकांडाचे ममतांनी मुख्यमंत्री असूनही राजकारण केले, दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी आपल्या अखत्यारीतील पोलिस दलाचा वापर केला, हे जे चित्र देशभर व प. बंगालमध्येही निर्माण झाले, ते ममता आता दूर करू शकत नाहीत. आक्रस्ताळी राजकारणाच्या सवयीतून ममतांनी ही संधी गमावली आहे व भाजपला त्यांच्यावर तुटून पडण्याची आयती संधी प्राप्त करून दिली आहे.

शिवाय बंगालच्या रक्तरंजित राजकारणाच्या देशातल्या प्रतिमेवर या सगळ्या घटनाक्रमाने पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. या सगळ्या खेळात प. बंगालमधील सर्वशक्तिमान व सत्ताधारी तृणमूल पक्ष सर्व गोष्टी व यंत्रणा हातात असतानाही स्वत:चीच अडचण होईल, असा हिंसाचार का घडवेल? हा साधा तारतम्याचा प्रश्न राजकीय गदारोळात लुप्त होऊन जातो! हेच ममतांचे अपयश आणि भाजपचे यश! ज्या बीरभूम जिल्ह्यात हा हिंसाचार झाला तिथे भाजपचे अस्तित्वच नाही. काँग्रेस व डाव्या पक्षांना तृणमूलने केव्हाचेच इतिहासजमा केलेले आहे. या जिल्ह्यात तृणमूलचाच बोलबाला! याचा अर्थ असा की, तृणमूलच्याच दोन स्थानिक गटांतील हा हिंसाचार आहे व त्याला वैयक्तिक भांडणाची पार्श्वभूमी आहे.

यातील भोदू शेख याचा काका मागच्या वर्षी मारला गेला होता. त्या प्रकरणात सोनू शेख हा प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नसतानाच ही घटना घडण्यापूर्वी दोन दिवस अगोदर भोदू शेखचा भररस्त्यात खून झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच एका हिंसक गटाने सोनू शेख याच्या घरावर हल्ला चढविला आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी घरात बसलेल्या कुटुंबास जिवंत जाळले. तत्पूर्वी या जमावाने सोनू शेखच्या कुटुंबीयांना बांधून बेदम मारहाण केली व त्यांना घरात कोंडून जाळले, असाही आरोप. त्यात खरे-खोटे तपासात उघड होणे हे इष्ट! त्यापेक्षा असे हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारेच! त्यामुळे ते कुणी घडवले? का घडविले? कसे घडविले? हे सगळे प्रश्न व त्यावरचे वाद-प्रतिवाद दुय्यमच! मुख्य मुद्दा असे हत्याकांड घडविणा-यांना, मग ते कोणी का असेनात, शोधणे व त्यांना त्यांच्या कृत्याची कडक शिक्षा करणे, हाच असायला हवा! राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून ममतांची हीच स्पष्ट भूमिका असायला हवी व त्यादृष्टीनेच या प्रकरणाचा तपास होऊन त्याची तड लावायला हवी. येथे ममता हुकल्या. प्रकरणाच्या गांभीर्यापेक्षा त्याचे राजकीय परिणाम लक्षात आल्यावर त्यांनी विशेष चौकशी पथकाची घोषणा केली. त्याला राज्यपाल जगदीप धनखड यांनी सदर चौकशी पथकाचा पोलिस अधिकारी प्रामाणिक नसल्याची तक्रार करत विरोध केला. खरे तर ममतांनी इथे आपल्यावरील जबाबदारीचे भान ठेवून हे प्रकरण संयमाने हाताळायला हवे होते.

मात्र, राजकारण डोक्यात भिनलेले असल्याने व त्याला आक्रस्ताळी स्वभावाची जोड असल्याने त्यांनी लगेच इतर राज्यातील हिंसाचाराचे दाखले देत विरोधी पक्ष भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. त्यातून उलटसुलट दावे-प्रतिदावे झाले आणि राजकीय धुरळा वाढत गेला. आता उच्च न्यायालयानेच चौकशीवर ठपका ठेवल्याने ममता राजकीयदृष्ट्या अडचणीत येणे अत्यंत साहजिकच कारण भाजप ही संधी अजिबात सोडणार नाही. इथे ममतांची राजकीय अपरिपक्वता दिसते. भाजपला राष्ट्रीय पातळीवर टक्कर देण्याचा प्रयत्न करताना आपले राज्य साफ-सुथरे व निर्मळ राहील, याची दक्षता ममतांनी घ्यायला हवी. मात्र, ममता ज्या मार्गाने प. बंगालमध्ये सत्तेवर विराजमान झाल्या आहेत व ज्या मार्गाने त्यांनी राज्यातील विरोधक संपवून आपली सत्ता बळकट केली आहे ती राजकीय हिंसाचाराची संस्कृती ममतांना दीर्घकाळ राज्यात सत्तेवर राहूनही नियंत्रित ठेवण्यात अपयश येते आहे.

त्याचाच फायदा उठवत भाजप ममतांनी ज्या मार्गाने डावे व काँग्रेस या विरोधकांना संपविले त्याच मार्गाचा वापर करत ममतांना संपविण्याचा प्रयत्न करत आहे. ममता भाजपच्या या सापळ्यात वारंवार अडकत आहेत आणि त्यामागे त्यांचा स्वभाव हेच प्रमुख कारण आहे. स्वभावाला मुरड घालणे ममतांना जमत नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर हे आक्रस्ताळेपणा असू शकत नाहीच. याचा फटका त्यांना स्वत:ला राजकारणात बसणार हे उघडच! मात्र, हा राजकीय संघर्ष असाच वाढत गेल्यास प. बंगालच्या माथी बसलेला रक्तरंजित बंगालचा शिक्का कधीही पुसला जाणे कठीणच, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या