26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeसंपादकीयलोकप्रिय, लोकमान्य!

लोकप्रिय, लोकमान्य!

एकमत ऑनलाईन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जगभर पसरली आहे. त्यांच्या कार्यप्रणालीबाबत भारतात दुमत असले तरी राजकारणावर त्यांनी आपला जो ठसा उमटवला आहे तो मान्यच करावा लागेल. जगभर त्यांचे जे कौतुक होत आहे त्यामागे निश्चित असे गुणवैशिष्ट्य असेलच. त्यांच्या गुणवत्तेमागे काही सामाजिक, राजकीय संदर्भ असतीलच. त्यांच्या कार्यशैलीबाबत भारतात मतांतरे आहेत. देशाचे नेतृत्व करताना त्यांच्या हातून काही चुका घडल्या असतीलही. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे असे म्हटले जाते. जो काम करतो त्याच्याकडून चुकाही होणारच. परंतु चुका स्वीकारून जो पुढे जाण्यासाठी धडपडतो त्याची वाहवा होत असते. २०१४ मध्ये जनतेला बदल हवा होता म्हणून त्यांनी मोदींना पसंती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जो काही कारभार केला त्याला जनतेने २०१९ मध्ये लोकमान्यता दिली असेच म्हणावे लागेल.

दरम्यानच्या काळात मोदींच्या हातून काही चांगली कामे झाली आणि काही वाईट गोष्टीही घडल्या. चूक स्वीकारण्यात मोदींना कमीपणा वाटला नाही. शेतक-यांना जाचक वाटणारे कृषी कायदे रद्द करणे हे त्याचे उदाहरण! मोदींच्या कारभारावर देशांतर्गत सडकून टीकाही होते. दोष हेरून त्यावर टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हणतात ते खरेच आहे. अशा टीकेमुळे तुम्हाला तुमच्या कामात सुधारणा करता येते. पंतप्रधान मोदी चुकीचे काही करत असतील तर त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवलीच पाहिजे. अर्थात अशी टीका वैयक्तिक नसावी. हाच मापदंड मोदींनाही लागू आहे. त्यांनीही विरोधकांवर तोंडसुख घेताना सामाजिक आणि राजकीय भान ठेवले पाहिजे. देशहिताचे निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. यातूनच लोकशाही व्यवस्थेत हुकूमशाही सुरू झाली आहे असे आरोप होतात. सत्ताधा-यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. सत्ता चालवणे हे एकट्या-दुकट्याचे काम नाही, ते सांघिक काम आहे. अनेकवेळा एखाद्या कृतीमागे मोदींचा उद्देश चांगला असतो परंतु त्याची अंमलबजावणी करणारे मिठाचा खडा टाकण्याचे काम करतात. अशा वेळी बहुतेकवेळा मोदी मौन साधताना दिसतात. म्हणून ते टीकेचे धनी बनतात. खरे तर अशा वेळी मोदींनी आपल्या सहका-यांना खडसावायला हवे. आपल्या देशात मोदींच्या लोकप्रियतेत चढ-उतार होताना दिसतात. मोदींनी आपल्या कारकीर्दीत काही धाडसी निर्णय घेतले आहेत आणि काही जनतेला न रुचणारे निर्णयही घेतले आहेत.

त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख कमी-अधिक होताना दिसतो परंतु जागतिक स्तरावर त्यांचा आलेख चढताच दिसतो. लोकप्रियतेच्या संदर्भात पंतप्रधान मोदी जगात भारी ठरले आहेत. अमेरिकेतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रुव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगातील सर्वाधिक लोकप्रिय, लोकमान्य नेते म्हणून पंतप्रधान मोदींना पहिला क्रमांक मिळाला आहे. पंतप्रधान मोदींचे मान्यता गुणांकन (अ‍ॅप्रुव्हल रेटिंग) हे जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. या यादीमध्ये मोदींना ७१ टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळाला आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅग्टी अनुक्रमे दुस-या व तिस-या क्रमांकावर आहेत. म्हणजेच पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जगातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. लोकप्रियतेच्या संदर्भात पंतप्रधान मोदी अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत वरचढ ठरले आहेत. भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. सर्वेक्षणानुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४३ टक्के लोकांनी पसंती दिली. त्या पाठोपाठ कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांचा क्रमांक लागतो. त्यांनाही ४३ टक्के पसंती मिळाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आठव्या क्रमांकावर असून त्यांना ४१ टक्के मते मिळाली. अकराव्या क्रमांकावर ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो, १२ व्या क्रमांकावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन तर १३ व्या क्रमांकावर ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आहेत.

बोल्सोनारो यांना ३७ टक्के, मॅक्रॉन यांना ३४ टक्के तर जॉन्सन यांना अवघी २६ टक्के मते मिळाली. १३ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ही माहिती मिळाली आहे. प्रत्येक देशामध्ये राहणा-या सज्ञान व्यक्तीच्या मुलाखतीमधून ही माहिती घेतली जाते. ही आकडेवारी दर आठवड्याला अपडेट केली जाते. प्रत्येक देशात सर्वेक्षणाचा नमुना वेगवेगळा असतो. मॉर्निंग कन्सल्ट ही एजन्सी जागतिक स्तरावर ११ हजारहून अधिक मुलाखती घेते. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत ५ हजार नोंदणीकृत मतदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. भारतातील सर्वेक्षणात ऑनलाईन मुलाखती घेतल्या जातात. प्रत्येक देशात वय, लिंग, प्रदेश, शिक्षण आणि काही देशांत अधिकृत सरकारी स्रोतावर आधारित सर्वेक्षण केले जाते. लोकप्रियतेबाबत जगात नंबर वन ठरलेले मोदी भारतात मात्र घसरणीला लागलेले दिसतात. अलीकडे टेलिप्रॉम्टर त्यांचा घात करताना दिसतो. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमामध्ये लोकांना संबोधित करताना एका सरकारी योजनेचे नाव चुकीचे उच्चारले! ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या यशाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’! या चुकीमुळे ‘पीएम प्रॉम्टरजीवी निघाले’ अशी टीका सुरू झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या