26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeसंपादकीयसंमिश्र जनकौल

संमिश्र जनकौल

एकमत ऑनलाईन

राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक ३८४ जागा जिंकत भाजपने प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर असून ३१६ जागा जिंकत काँग्रेसने तिसरा तर २८४ जागांसह शिवसेनेने चौथा क्रमांक घेतला आहे. नगरपंचायतीतील १८०२ जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ आणि १८ जानेवारी २०२२ अशा दोन टप्प्यांत मतदान झाले होते. यापैकी ९७ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन १६४९ जागांपैकी १६३८ जागांचे निकाल बुधवार, १९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. ही निवडणूक चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी होती. राज्यातील १०६ नगरपंचायत व दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र लढूनही आघाडीतील तिन्ही पक्षांना चांगले यश मिळाले आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपच्या विरोधात अन्य पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढल्या तर त्यांचा निभाव लागणार नाही हेही स्पष्ट झाले आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीने काँटे की टक्कर दिली. काँग्रेसनेसुद्धा चांगली लढत दिली मात्र शिवसेनेला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीने राज्याच्या सर्व भागात यश मिळवले आहे तर काँग्रेसने विदर्भात मुसंडी मारली. मराठवाड्यात काँग्रेसला संमिश्र यश मिळाले. इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झाल्याने दोन जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लक्षणीय ठरल्या होत्या.

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला असा दावा भाजपने केला आहे. त्यांचा दावा खरा असला तरी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांनी मिळवलेले यश दृष्टीआड करता येत नाही. आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांनी जिंकलेल्या जागा नऊशेच्या घरात गेल्या आहेत. २०१९ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी मारली होती. हाच कल नगरपंचायतीच्या निवडणुकीतही कायम राहिला. पुढील काळातही हाच कल कायम राहील असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटतो. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक मिळवला होता, नगरपंचायत निवडणुकीतही त्यांनी हा क्रमांक कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळायचे परंतु अलीकडे त्यांनी विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातही आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. प्रचाराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना आजच्या निकालावरून राष्ट्रवादी हा राज्यातील मोठा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे अशी कोपरखळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारली. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, धनंजय मुंडे, डॉ. विश्वजित कदम, शंभुराजे देसाई, शशिकांत शिंदे, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांना आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती निवडणुकीत फटका बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक झाली. ओबीसींचे राजकीय आरक्षण कोणामुळे गेले यावरून या निवडणुकीत बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. पुढील दोन-तीन महिन्यांत १७ महापालिका व २५ जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीच्या निकालाला अधिक महत्त्व आले होते. मिनी विधानसभेच्या या रंगीत तालमीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचेच दिसून आले होते. मराठवाड्यातील २३ नगरपंचायतीच्या निवडणुकीत लातूरमध्ये भाजपला फटका बसला तर नांदेडमध्ये काँग्रेसने गड राखला. शिवसेनेला दोन जिल्ह्यांत यश मिळाले. मराठवाड्यात २३ पैकी भाजपला सहा, राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी पाच तर शिवसेनेला चार नगरपंचायतींवर सत्ता मिळवण्यात यश आले. भाजपचे सर्वाधिक ३८ नगरसेवक बीड जिल्ह्यात निवडून आले. शिरूर कासार, आष्टी, पाटोदा या मतदारसंघात आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांचे हे यश असल्याचे मानण्यात येत आहे. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचेही ९२ उमेदवार निवडून आले आहेत. नांदेडमध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे ८० उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला मात्र ७६ जागांवर समाधान मानावे लागले. लातूर जिल्ह्यात प्रहार आघाडीलाही चांगले यश मिळाले. हिंगोलीमध्ये वंचित तर नांदेडमध्ये एमआयएमनेही तीन जागा मिळवल्या आहेत. बीड जिल्ह्यात भाजपला यश मिळाले असले तरी त्यांना लातूरमध्ये आपला गड राखता आला नाही. लातूर जिल्ह्यात चार नगरपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या.

मात्र, आता केवळ शिरूर अनंतपाळ ही एकमेव नगरपंचायत त्यांना राखता आली. शिवसेनेला औरंगाबाद व जालना वगळता अन्य जिल्ह्यात आपला प्रभाव निर्माण करता आला नाही. याचा अर्थच असा की मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अमाप यश मिळाले असले तरी २०२४ ची निवडणूक त्यांना सोपी जाणार नाही हे उघड आहे. उस्मानाबाद नगरपंचायत निवडणुकीत सेना व भाजपला प्रत्येकी एक नगरपंचायत मिळाली आहे तर राष्ट्रवादी व काँग्रेसची दाणादाण उडाली आहे. लोहारामध्ये काँग्रेस तर वाशी येथे शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. लातूरमध्ये काँग्रेसला ६८ पैकी २३ जागा मिळाल्या. देवणी व जळकोटमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपला धक्का दिला. चाकूरमध्ये ‘त्रिशंकू’ परिस्थिती तर शिरूर अनंतपाळचा गड भाजपने राखला आहे. नगरपंचायतीचे निकाल काँग्रेससाठी समाधानकारक असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता असे ते म्हणाले. ‘भाजपच नंबर वन’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात तर ‘राष्ट्रवादी राज्यात नंबर एक’ असे जयंत पाटील म्हणाले. एक मात्र नक्की, आघाडी मजबूत राहिली तर २०२४ साल भाजपला कठीण जाईल.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या