26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसंपादकीयसत्तासंतुलनाचा प्रयोग

सत्तासंतुलनाचा प्रयोग

एकमत ऑनलाईन

तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा खांदेपालट व विस्तार पार पडला. या विस्ताराला वर्षभरापूर्वी सचिन पायलट यांनी फडकवलेल्या बंडाच्या निशाणाची पार्श्वभूमी आहे, हे उघड सत्यच! सचिन पायलट यांचे त्यावेळचे बंड थंड करताना त्यांना व त्यांच्या समर्थक गटाला न्याय देण्याचे आश्वासन काँग्रेस श्रेष्ठींनी दिले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यास जो वर्षभराचा कालावधी लागला तो पाहता मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे या बदलास अनुकूल नसल्याचेच स्पष्ट होते. याचा अर्थ असा की, पायलट जरी झाले गेले विसरायला तयार असले तरी अशोक गेहलोत त्यासाठी फारसे उत्सुक नाहीतच. तथापि, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमधील प्रयोगाने हात पोळल्याने बहुधा काँग्रेस श्रेष्ठी आता सावध झाल्या आहेत व त्यांनी जुने व नवे यांच्यातील पक्षांतर्गत वाद कमी करण्याचा आणि त्यांच्यातील असंतुलन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानातील सत्तासंतुलनाचा हा प्रयोग याच दृष्टीने पहावा लागेल.

अर्थात हा प्रयोग काँग्रेस पक्षासाठी हिताचाच ठरणारा आहे कारण पक्षातील जुने व तरुण तुर्क यांच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादाने पक्षाचे अतोनात नुकसान केलेले आहे. त्यामुळे खरे तर काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुका लक्षात घेऊन देशभर जुने व नवे किंवा ज्येष्ठ व तरुण यांचे पक्षातील संतुलन योग्य करण्याचा हा प्रयोग व्यापकतेने राबवायला हवा. असो! रविवारी झालेल्या गेहलोत मंत्रिमंडळाच्या विस्तारात १२ नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. राजस्थानात ११ कॅबिनेट व चार राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यात सचिन पायलट यांचे समर्थक हेमाराम चौधरी यांनी सर्वप्रथम शपथ घेतली.

मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापूर्वी गेहलोत यांनी अगोदरच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. गेहलोत यांच्या विरोधात झालेल्या मागच्या वर्षीच्या बंडात सहभागी असल्याने मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेल्या विश्वेंद्रसिंह आणि रमेश वीणा यांचे या नव्या विस्तारात मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे. हे सचिन पायलट यांच्यासाठी सुखकारकच! हा विस्तार पार पाडताना पक्षांतर्गत राजकीय संघर्ष व जातीय समीकरणे यांचा योग्य मिलाफ घालतानाही पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत पार पाडावी लागल्याचेही स्पष्टपणे दिसते. मात्र श्रेष्ठींनी ही कसरत यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत संघर्षाचा राजकीय लाभ उठविण्यासाठी टपून बसलेल्या भाजपची मोठी निराशा झाली आहे. उलट काँगे्रसच्या या संतुलनाच्या प्रयोगामुळे आता भाजप श्रेष्ठींना राजस्थान भाजपमधील धुसफूस कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे भाग पडणार आहे.

खरे तर भाजपमधील याच धुसफुशीमुळेच सचिन पायलट यांच्या बंडाचा राजकीय लाभ उठविण्याचा नाद भाजपच्या कर्त्याधर्त्यांना सोडून द्यावा लागला होता, हे वास्तव आहे. गेहलोत यांचे व्यवस्थापन जसे पायलट यांचे बंड थंड होण्याचे एक प्रमुख कारण आहे तसेच राजस्थान भाजपमधील संघर्ष हे ही एक कारण आहेच, हे नाकारता येत नाही. अन्यथा मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ‘हिट’ प्रयोगाने प्रचंड उत्साहित भाजपला राजस्थानात रोखणे त्यावेळी अवघडच ठरले असते. असो! मात्र, आता देशातील राजकीय स्थिती बदलली आहे. इंधन दरवाढ, महागाई, शेतकरी आंदोलन, चीनने भारताचा भूभाग बळकावणे, प. बंगालमधील प्रतिष्ठेच्या केलेल्या लढाईत झालेला पराभव आदी अनेक कारणांमुळे केंद्रातील शक्तिशाली मोदी सरकारचे मोठ्या प्रमाणावर प्रतिमाहनन झाले आहे व हे सरकार सध्या डिफेन्स मोडमध्ये गेले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत संघर्षावरून बंडाचे निशाण फडकावत भाजपच्या वळचणीला जाऊ इच्छिणा-यांना आता याबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे. सचिन पायलट यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर ‘सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल’, ही जी प्रतिक्रिया दिली ती पुरेशी बोलकी आहे आणि बदलत्या राजकीय स्थितीचे संकेत देणारीच आहे. असो! अशा योग्यवेळी काँग्रेस श्रेष्ठींनी सत्तासंतुलनाचा जो प्रयोग राजस्थानात केला तो त्यामुळेच पक्षासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. या प्रयोगाला राजस्थानात तर यश नक्कीच मिळेल पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्षात त्याचा योग्य संदेश गेला आहे जो पक्षाला नव्याने संजीवनी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा प्रयोग केवळ राजस्थानपुरता मर्यादित न ठेवता तो पक्षाने देशभर व्यापकतेने राबवायला हवा.

ज्येष्ठ नेते व तरुण तुर्क यांचा योग्य मिलाफ घातला गेला तर नक्कीच काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारेल आणि भाजपला समर्थ पर्याय म्हणून देशातील मतदार काँग्रेसला साथ देतील! काँग्रेस पक्षात संघटनात्मक महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. तिथेही पक्षश्रेष्ठींनी हा संतुलनाचा प्रयोग राबवण्याचा व तो यशस्वी करण्याचा प्रयत्न करायला हवा. असो! तूर्त राजस्थानात सत्तासंतुलनाचा प्रयोग काँग्रेसने यशस्वी केला आहे. पायलट यांना त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळाले आहे. पायलट यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले आहे. तसेच पायलट यांच्यावरही नवी व मोठी जबाबदारी सोपविली जाण्याचे संकेत आहेत. त्यांना काँग्रेसचे सरचिटणीसपद आणि एखाद्या राज्याचे प्रभारीपद मिळेल, अशी चर्चा सध्या आहे. मात्र, त्यानंतरही ते राजस्थानच्या राजकारणात सक्रियच राहणार, हे उघड आहे. त्यामुळे राजस्थानात यापुढे दोन सत्ताकेंद्रे राहणार हे ही स्पष्टच! गेहलोत यांना आता राजस्थानातील पक्षांतर्गत संतुलन पार पाडण्याची जबाबदारी उचलावी लागणार आहे.

राजस्थानातील निवडणुकीस अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. तोवर हा सत्तासंतुलनाचा प्रयोग कितपत फळाला येतो, हे स्पष्टच होईल. मात्र, पक्षांतर्गत संघर्ष कमी करण्यात काँग्रेसने राज्यात आघाडी घेतली आहे. आता त्यामुळे भाजपला आपल्या पक्षातील संघर्ष शमविण्यावर लक्ष केंद्रित करणे भाग पडणार आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना बाजूला करण्याच्या प्रयत्नांत भाजपला अद्याप यश प्राप्त झालेले नाहीच. त्यामुळे राजस्थान भाजपात मोठी अस्वस्थता आहे. ती भाजप कशी कमी करणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष राहणार आहेच! असो!! तूर्त काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पक्षांतर्गत संतुलनाचे उचललेले पाऊल अत्यंत योग्य व पक्षासाठी हिताचेच असल्याने अभिनंदनीयच आहे. त्याचे स्वागत करताना हा प्रयोग काँग्रेस श्रेष्ठींनी व्यापकतेने देशभर राबवावा, हीच अपेक्षा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या