37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसंपादकीयसारे जहाँ से अच्छा....!

सारे जहाँ से अच्छा….!

एकमत ऑनलाईन

आज प्रजासत्ताक दिन. भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारा दिवस. आज आपण ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीचे आणि दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो तो असा की आपण स्वातंत्र्योत्सव एकदिलाने, राष्ट्रप्रेमाने कधी साजरे करणार आहोत? कारण अशा प्रसंगी नियमितपणे वाद-प्रतिवाद होत असल्याचे दिसून आले आहे. यंदा भारत सरकारने प्रजासत्ताक दिनासंदर्भात दोन महत्त्वाचे बदल केले. दरवर्षी प्रजासत्ताकदिनाचा सोहळा २४ जानेवारीपासून सुरू होत असे, तो यंदा २३ जानेवारीपासून सुरू झाला. याचे मुख्य कारण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारी रोजी जयंती होती. शिवाय यंदा त्यांची १२५ वी जयंती. त्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन सोहळा २३ जानेवारीपासून सुरू करण्यात आला.

याबाबत प्रतिवाद होण्याचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक इंडिया गेटवर नेताजींच्या पूर्णाकृती होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. या ठिकाणी लवकरच ग्रेनाईटचा भव्य पुतळा बसविण्यात येणार आहे. नेताजींचा हा पुतळा देशाच्या लोकशाही संस्था तथा वर्तमान व भावी पिढ्यांना त्यांच्या कर्तव्याचे स्मरण करवून देईल, त्यांना प्रेरणा देईल अशी भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली. २०४७ साली स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी ‘नव्या भारताच्या’ निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यापासून जगातील कुठलीही शक्ती भारताला रोखू शकणार नाही असेही या प्रसंगी ते म्हणाले. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर अनेक थोर लोकांचे आणि देशाच्या संस्कृतीचे योगदान मिटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र आज स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनी देश या चुका दुरुस्त करत आहे असेही पंतप्रधान म्हणाले. आता वादाचे कारण म्हणजे २१ जानेवारी रोजी दिल्लीतील इंडिया गेटवरील ‘अमर जवान ज्योत’ राष्ट्रीय युद्ध स्मारकातील शाश्वत तेवणा-या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आल्याने वाद उद्भवला. काही माजी सेनाधिका-यांसह काँग्रेसने केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली. इंडिया गेटवरील अमर जवान चिरंतन ज्योत स्वातंत्र्यानंतर झालेल्या विविध युद्धांमध्ये आणि संघर्षामध्ये देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रति कृतज्ञता आणि आदरांजलीचे प्रतीक होती.

अमर जवान ज्योतीच्या विलीनीकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारने अमर जवान ज्योत विझवून इतिहास पुसून टाकला, असा आरोप काँग्रेसने केला. काही लोक देशभक्ती आणि जवानांचे बलिदान समजू शकत नाहीत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. माजी लष्करप्रमुख जनरल वेद मलिक यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले तर माजी हवाईदल उपप्रमुख मनमोहन बहादूर यांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती पंतप्रधानांना केली. या प्रकरणी सरकारचे म्हणणे असे की, चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. अमर जवान ज्योत विझविण्यात आलेली नाही तर ती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली आहे. सर्व युद्धांतील सर्व भारतीय शहिदांची नावे राष्ट्रीय युद्धस्मारकात लावण्यात आली आहेत. त्यामुळे तेथे शहिदांना श्रद्धांजली वाहणे हीच खरी श्रद्धांजली आहे. तरीही काही जणांचा आक्षेप असा की, ‘विलीनीकरण’ या शब्दाचा वापर ही मोठी चलाखी आहे. १९७१ च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ दिल्लीतील इंडिया गेट येथे ‘अमर जवान ज्योत’ ही २६ जानेवारी १९७२ पासून अव्याहतपणे ज्वलंत असलेली, शौर्याची आणि हौतात्म्याची ज्योत तेवत होती.

मोदी सरकारने गुपचूप निर्णय घेऊन तिचे ‘विलीनीकरण’ केले असे जाहीर केले असले तरी वास्तवात इंडिया गेट परिसरातील ज्योत कायमची विझवून टाकली आहे. मध्ययुगात जेव्हा जेव्हा हिंदुस्थानवर आक्रमणे झाली आणि सत्तापरिवर्तन झाले, तेव्हा तेव्हा स्थानिक अस्मिता, संस्कृती, वास्तू यावरसुद्धा आक्रमणे झाली. बाबराने मंदिर तोडून मशीद बांधली. मंदिर का तोडले असेल? त्याच्याकडे मशीद बांधायला जागा नव्हती, साहित्य, संपत्ती नव्हती की सत्ता नव्हती? सर्व काही असून मंदिर तोडले कारण सत्तांतरानंतरचे ते आक्रमण परकीयांच्या अस्मिता, संस्कृृती आणि वास्तूंवरही होते. या बाबींमध्येसुद्धा परिवर्तन घडवणे ही त्या सत्तेची गरज होती. आज पुन्हा तोच अनुभव येत आहे. छान तेवत असलेली ज्योत विझविली. पुन्हा मुद्दा तोच… जागा, संपत्ती, साहित्य आणि सत्ता असताना अस्तित्वातील ज्योत सत्ताधा-यांनी का विझविली? आणखी एक ज्योत त्या ठिकाणी तेवत राहिली असती तर काय हरकत होती? की सत्तांतरानंतरचे स्वत:च्याच देशातील हे सुद्धा आक्रमणच समजावे?… स्वदेशी विरोधकांना शत्रूस्थानी पाहण्याच्या विकृत मानसिकतेमुळे घडणारे? नवनिर्मितीतून इतिहास घडविण्याची खात्री नसली की असे घडत असावे का? भारताची पुन्हा मध्ययुगाकडे वाटचाल होत आहे का? आज होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुमारे एक हजार ड्रोन, ७५ लष्करी विमाने, १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडला येणा-या प्रेक्षकांच्या संख्येत घट झाली आहे.

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ हजार प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. यंदा त्यात ५ ते ८ हजारांची घट होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सांगता समारंभातून ‘अबाईड विथ मी’ धून हद्दपार करण्यात आली आहे. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीच्या विलीनीकरणानंतर सरकारने महात्मा गांधी यांच्या आवडत्या ‘अबाईड विथ मी’ ही ख्रिस्ती भजनाची धून सांगता समारंभातून वगळली आहे. त्याऐवजी ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धून वाजविण्यात येईल. विजय चौकात होणा-या समारंभात २६ धून वाजविण्यात येणार आहेत. त्यात जय जनम भूमी, वीर सियाचेन, अमर चट्टान, गोल्डन अ‍ॅरोज, स्वर्ण जयंती, वीर सैनिक, जय भारती, हिंद की सेना, कदम कदम बढाए जा, ऐ मेरे वतन के लोगों, आदी धूनचे सूर गुंजतील. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. कारण याच दिवसापासून ख-या अर्थाने लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक अथवा गणराज्य अस्तित्वात आले. तेव्हा अभिमानाने म्हणू या ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या