चीनमध्ये कोरोनाच्या नव्या रूपाचा (व्हेरिएंट) उद्रेक झाल्याच्या बातम्यांनी जगाला सतर्क तर केलेच आहे पण चिंताक्रांतही केले आहे. सध्याची जागतिक अर्थव्यवस्था ही परस्परावलंबी आहे. त्यामुळे चीनमध्ये कोरोना उद्रेकाने जर पुन्हा जनजीवन ठप्प केले तर त्याचा अद्याप कोरोनाच्या पहिल्या तडाख्यातूनच सावरण्याची धडपड करत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. अगोदरच सध्या जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फे-यात आहे. रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक अर्थकारणातील मंदीत भर घातली आहे. हे युद्ध अद्याप संपुष्टात यायला तयार नाही त्यात आता चीनमध्ये कोरोनाच्या नव्या रूपाचा झालेला उद्रेक जगाच्या चिंतेत दुहेरी भर घालणारा ठरणार आहे. आरोग्य आणि अर्थकारणाला तडाखा अशी ही दुहेरी चिंता आहे आणि दुर्दैवाने त्यावर सावधानता बाळगण्याशिवाय दुसरे काहीही जगाच्या हाती नाही. तसे चीनने कोरोना जन्माला घालण्यापासून त्याविरोधात स्वीकारलेल्या धोरणापर्यंत व उपाययोजनांपर्यंत सर्व काही संशयास्पदच आहे. चीनने कोरोनाच्या मृतांची संख्या दडविल्याचा आरोपही आहे. त्यामुळे चीनच्या एकंदर वर्तनावरच विश्वास ठेवावा अशी स्थिती नाहीच. त्यातूनच सध्या चीनमधून कोरोना उद्रेकाबाबत येत असलेल्या बातम्या अतिरंजित असल्याचा जो दावा केला जातोय त्यावर कितपत विश्वास ठेवावा, ही शंकाच आहे.
तसेही चीनने कितीही लपवालपवी केली तरी कोरोना हाताळणीत चीन सपशेल अपयशी ठरल्याचे जगजाहीरच आहे. कोरोनावरच्या चीनच्या लसीही निष्प्रभ असल्याचे स्पष्ट झाले आहेच. जगातल्या ज्या देशांनी चीनच्या लसी वापरल्या त्या देशांना त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. त्यामुळे त्या देशांना मग इतर देशांमध्ये निर्माण झालेल्या लसींचा आधार शोधावा लागला होता. या घटनाक्रमाने चीनमधले लसीकरण कुचकामीच असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र, अडेलतट्टू चिनी राज्यकर्ते हे सत्य स्वीकारायला तयार नव्हतेच! त्यामुळे चीनमध्ये कोरोना उद्रेकाची शंका होतीच आणि ती आता सत्य ठरली आहे! विशेष म्हणजे चिनी नागरिकांनाही सरकारच्या ‘झिरो कोविड’ धोरणाचा फोलपणा पूर्णपणे कळून चुकल्याने चीनमध्ये कोरोना निर्बंधांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला व देशभर आंदोलने झाली. त्यामुळे चीन सरकारला माघार घेऊन कडक निर्बंधांचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. सध्याच्या कोरोना उद्रेकासाठी याच निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाचे कारण दिले जात आहे.
मात्र, दुस-या बाजूने तज्ज्ञांचा असा दावा आहे की, चीनच्या झिरो कोविड धोरणांतर्गत लादण्यात आलेल्या दीर्घकाळच्या कडक टाळेबंदीमुळे चीनमध्ये कोरोना विषाणूविरुद्धची सामूहिक प्रतिकारशक्तीच निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे सध्याच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार चीनमध्ये प्रचंड वेगाने होत आहे आणि मृत्युसंख्याही वाढते आहे. तज्ज्ञांचे असे निरीक्षण आहे की, नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्ण १८ व्यक्तींना संसर्ग करू शकतो. याचाच सरळ अर्थ असा की, नव्या व्हेरिएंटची संसर्ग क्षमता १८ पट जास्त आहे. त्यामुळेच चीनमधील कोरोनाचा ताजा उदे्रक वेगवान ठरला आहे आणि त्याने जगाला चिंतेत टाकले आहे. अर्थातच याचा सर्वांत जास्त धोका चीनच्या शेजारी राष्ट्रांना आहे व या शेजा-यांमध्ये आपलाही समावेश होत असल्याने भारतालाही वेळीच सावध होणे आवश्यक आहे. सरकारने विमानतळावर चीनमधून येणा-या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला तो योग्यच मात्र पुरेसा नाही कारण चीनबरोबरच उत्तर कोरिया, जपान, अमेरिका आदी देशांमध्येही कोरोनाने डोके बाहेर काढलेले आहे.
त्यामुळे कोरोना केवळ चीनमधूनच भारतात शिरेल असे समजण्याचे काही कारण नाहीच. त्यामुळे विदेशातून येणा-या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी बंधनकारकच करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलायला हवे. तसेही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे चार रुग्ण भारतात सध्याच सापडलेले आहेत! त्यामुळे पूर्वीच्या चुकांमधून शहाणे होत रुग्णांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा तातडीने शोध घेणे व त्यांना विलगीकरणात पाठवून त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय तर देशात कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची प्रतीक्षा न करता युद्धस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांना व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याला प्राधान्य द्यायला हवे. कोरोनाच्या पूर्वानुभवाने सरकारला एवढे तरी शहाणपण नक्कीच आले असेल ही आशा! शिवाय सर्वसामान्य नागरिकांनीही आता सरकारी सक्तीची वा आदेशाची वाट न पाहता स्वत:च सावधानता बाळगत कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे हे मान्यच पण त्यात अनेक त्रुटीही आहेत. लसीचा पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस न घेणा-याचे प्रमाण बरेच आहे. शिवाय कोरोना आता गेला असे मानून बूस्टर डोसकडे पाठ फिरवणा-यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. ही परिस्थिती पाहता केंद्र व राज्य सरकारांनी पुन्हा एकदा लसीकरण मोहीम युद्धपातळीवर हाती घ्यायला हवी व नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा.
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनासारख्या महामारीचा उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा कितीही विस्तारली तरी ती अपुरीच ठरते, हे वास्तव अगोदर अनुभवायला मिळालेच आहे. पक्षीय राजकारणाची उबळ येऊ न देता हे वास्तव स्वीकारण्याची गरज आहे. दुर्दैवाने अद्याप आपल्याला हे शहाणपण आल्याचे दिसत नाहीच. त्यामुळेच कोरोना महामारीवरही राजकारण करण्याची उबळ अनेकांना आल्याचे सध्या पहायला मिळते आहे. शिवाय या सार्वजनिक संकटात स्वत:चे उखळ पांढरे करून घेणा-यांचीही संख्या आपल्या देशात अजिबात कमी नाहीच. त्याचा पुरेपूर अनुभव देशाने घेतलाच आहे व अल्पावधीत तो विस्मरणात गेला नसेल, हीच आशा! असो! मूळ मुद्दा हा की, कोरोनाचा उद्रेक केवळ आरोग्याचेच नाही तर आर्थिक संकटही सोबत घेऊन येतो याचा अनुभव एकदा आपण घेतलेलाच आहे. त्यामुळे बेफिकीर राहून वा सरकार, यंत्रणेला दोषी ठरवून सावधानता बाळगण्याकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे नाही आणि ते आपल्याला अजिबात परवडणारेही नाही.
त्यामुळे प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे, प्रतिबंधात्मक उपाय काटेकोरपणे पाळणे गरजेचे. आजार झाल्यावर उपचारांसाठी धावपळ करण्यापेक्षा व त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यापेक्षा आजार होणारच नाही याची दक्षता घेणे कधीही शहाणपणाचेच! कोरोना संकटाने आपल्याला हा धडा अगोदरच दिला आहे. तो आपण स्मरणात ठेवला तर देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होणार नाही आणि त्यातून निर्माण होणा-या बंद-निर्बंधांच्या फे-यातून आपले अर्थकारणही उद्ध्वस्त होणार नाही, हे प्रत्येकाने पक्के लक्षात ठेवायला हवे! सरकारनेही आता वेळीच या संकटाच्या सामन्याची तयारी करायला हवी. आता त्यासाठीचा वेळही हातात आहे व अनुभवही गाठीशी आहे. त्यामुळे ‘अचानक उद्भवलेले अनोळखी संकट’ ही सरकारी सबब आता चालणार नाही की, संकट उद्भवल्यावर त्याचे खापर सर्वसामान्य नागरिकांच्या माथी फोडण्याचा राजकीय खेळही खपून जाणार नाहीच! त्यामुळे सावधानता हेच सूत्र आता पाळायला हवे. तरच या संभाव्य संकटाचे बसणारे आरोग्यविषयक व अर्थविषयक अस चटके आपल्याला टाळता येतील, हे मात्र निश्चित!