22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसंपादकीयस्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृतमहोत्सव!

स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृतमहोत्सव!

एकमत ऑनलाईन

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला खरा पण हैदराबाद, जम्मू-काश्मीर आणि जुनागढ या तीन संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण झाले नसल्याने देशाच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले नव्हते. या तीन संस्थानांमध्ये हैदराबाद हे देशाच्या मधोमध असणारे सर्वांत मोठे संस्थान. मात्र याच संस्थानाचा प्रमुख असलेल्या सातवा व शेवटचा निजाम मीर उस्मानअली याने भारतात विलीन होण्यास स्पष्ट नकार दिला होता व पाकिस्तानप्रमाणे हैदराबाद स्वतंत्र राष्ट्र बनविण्याची मागणी केली होती. मराठवाडा, तेलंगणा व कर्नाटकचा काही भाग अशी हैदराबाद संस्थानची व्याप्ती होती.

मराठवाड्यातील जनतेसह या संस्थानामधील बहुसंख्य जनता ही हैदराबाद संस्थान भारताचा भाग व्हावा, स्वतंत्र भारतात संस्थानाने सहभागी व्हावे, अशी मागणी करत होती व त्यासाठी अहिंसेच्या मार्गाने गावागावांतून जनआंदोलने सुरू होती. मात्र, अत्यंत महत्त्वाकांक्षी असणा-या निजामाला हैदराबाद मुस्लिम राष्ट्र करायचे होते. त्यामुळे त्याने आपल्या संस्थानातील आंदोलने दडपून टाकण्यासाठी कासीम रिझवीच्या नेतृत्वाखाली असलेल्या रझाकार या कट्टरपंथी संघटनेला बळ दिले. रझाकार ही निजामाची निमलष्करी संघटना होती. या संघटनेस निजामाच्या वैयक्तिक कोषातून अर्थसा दिले जात होते. कासीम रिझवीच्या काळात ही संघटना प्रचंड वाढली व अनेक अतिरेकी गटही उदयास आले. कासीम रिझवीने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा घात करून या संघटनेत आपली हुकूमशाही निर्माण केली.

निजामाने त्याला बळ दिल्याने रझाकारांनी हैदराबाद संस्थानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. रझाकारांनी त्यावेळी क्रौर्याची परिसीमा गाठली. संस्थानातील अहिंसावादी आंदोलक व रझाकार यांच्यात सातत्याने संघर्ष होत होता. मात्र, निजाम रझाकारांच्या उच्छादाकडे ठरवून दुर्लक्ष करीत होता कारण त्याआडून त्याला संस्थान भारतात विलीन करण्याची मागणी करणा-यांचे आंदोलन चिरडून टाकायचे होते. त्यातूनच रझाकारांचा उन्माद वाढत गेला. २९ ऑक्टोबर १९४६ रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्जापूर गावाजवळ एक निष्ठावान गांधीवादी आंदोलक नेते असलेल्या गोविंदराव पानसरे यांची रझाकारांनी हत्या केली. पानसरे संस्थानमधील स्टेट काँगे्रसचे पहिले ‘हुतात्मा’ ठरले. या गोळीबारात पानसरे यांच्यासोबतचे अन्य चौघेही मारले गेले. त्यामुळे स्टेट काँग्रेसमधील जहाल गट आक्रमक झाला. १ जानेवारी १९४७ रोजी स्टेट काँग्रेसची बिदर येथे झालेली स्थायी समितीची बैठक प्रचंड वादळी झाली. अगोदरची स्थायी समिती बरखास्त होऊन नवी स्थायी समिती स्थापन करण्यात आली.

या समितीच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ यांची निवड झाली आणि स्वामीजींनी मुक्तिसंग्रामाच्या लढ्याला संघटित धार दिली. रझाकाराच्या आडून निजामाने संस्थानातील जनतेवर जे अन्यायाचे सत्र सुरू केले होते त्याचा अहिंसा व धर्मनिरपेक्षतावादी मूल्यांनी प्रखरपणे संघर्ष करणे अवघड होते. त्यामुळे रझाकारांना तोंड देण्यासाठी संस्थानाला लागून असलेल्या सीमेवर सशस्त्र लढ्याची कार्यालये (कॅम्प) सुरू करण्याचा निर्णय स्टेट काँग्रेसला घ्यावा लागला. असे ११५ कॅम्प उघडण्यात आले. हे कॅम्प निजामाच्या नियंत्रित क्षेत्राबाहेर होते. या सर्व आंदोलनाचे मार्गदर्शन करण्यासाठी दिगंबरराव बिंदू यांच्या अध्यक्षतेखाली एका कृति समितीची स्थापना करण्यात आली होती. २९ नोव्हेंबर १९४७ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी घटना समितीत ‘जैसे थे’ करार सादर केला. हैदराबाद संस्थान व इंग्रजांचे सरकार यांच्यात पूर्वी जसे संबंध होते तसेच संबंध स्वातंत्र्यानंतर भारत सरकार व निजाम सरकारचे राहतील असा या कराराचा अर्थ होता.

मात्र, निजामाने या कराराचे पालन केले नाही. उलट रझाकारांना बळ देऊन जनतेला भरडून काढण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा सामना करण्यासाठीच स्टेट काँग्रेसला सशस्त्र लढा देण्याचा मार्ग निवडावा लागला. तथापि, मनुष्यहानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना आंदोलकांना देण्यात आल्या होत्या. सरकारी कार्यालये, बँका वगैरे बंद पाडून निजामाचे राज्य खिळखिळे करण्यासाठी आवश्यक तेवढीच हत्यारे वापरावीत, असे स्टेट काँग्रेसने स्पष्ट केले होते. म्हणूनच लढा संपल्यावर एकूण एक शस्त्रांचा हिशेब सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे सादर करण्यात आला. निजामाकडून झालेला करारभंग, रझाकारांनी सुरू केलेला रक्तपात, लूटमार, निजाम फौजेचा उपद्रव आणि हैदराबाद संस्थानातील उग्र बनलेल्या स्वातंत्र्यलढ्याचे दडपण यामुळे भारताच्या गव्हर्नर जनरलनी ३१ ऑगस्ट १९४८ रोजी निजामाला पत्र लिहून रझाकार संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

मात्र, निजामाने या पत्राला बेजबाबदार उत्तर दिले त्यामुळे निजामाविरुद्ध बळाचा वापर करणे भारत सरकारला अपरिहार्य बनले. ७ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारने सैन्य दलाला हैदराबाद संस्थानवर चढाई करण्याचे आदेश दिले आणि १३ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे ४ वाजता संस्थानविरुद्ध ‘पोलिस अ‍ॅक्शन’ कारवाईला सुरुवात झाली. पाच विविध ठिकाणांवरून भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानमध्ये घुसले आणि अवघ्या चार दिवसांत ते हैदराबाद संस्थान सर करून हैदराबादेत दाखल झाले व निजाम शरण आला. मुक्तिसंग्राम लढा यशस्वी झाला व हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनले. भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले. या स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृतमहोत्सव आजपासून सुरू होतो आहे. पोलिस अ‍ॅक्शनने मुक्तिसंग्रामाचा शेवट झाला असला तरी मराठवाड्याच्या गावागावांत हा लढा लढला गेला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता हा लढा लढला. हा जनतेचा स्वातंत्र्यासाठीचा अभूतपूर्व लढा होता. स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यासारख्या असंख्य नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले.

निजामाच्या पंतप्रधानाला रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, ‘मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई’ अशी ओळख निर्माण झालेल्या बदनापूरच्या दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलिस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्र जाधव, नळदुर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होर्टी गावचे जनार्दन होर्टीकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथ कातनेश्वरकर, नांदेडचे देवराव कवळे, जीवनराव बोधनकर, आदी अनेकांच्या समर्पित सहभागाने हा लढा लढला गेला. त्याचप्रमाणे श्रीधर वर्तक, जानकीलाल राठी, शंकरराव जाधव, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील यासारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी जिवाची पर्वा न करता हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या लढ्यात महाराष्ट्र परिषद, हिंदू महासभा, आर्य समाज, विद्यार्थ्यांची वंदे मातरम् चळवळ यांचाही अत्यंत मोलाचा सहभाग राहिला. त्यामुळेच मुक्तिसंग्राम हा जनतेची उत्स्फू र्तव स्वयंप्रेरणेची लढाई ठरली. महिला, मुली, पुरुष, युवक, अबाल-वृद्ध या लढ्यात झपाटल्यासारखे सहभागी झाले होते. याच लोकसहभागाने हा लढा यशस्वी केला आणि भारतीय स्वातंत्र्यास पूर्णत्व प्राप्त करून दिले. या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना ‘एकमत’ परिवाराचे विनम्र अभिवादन! या लढ्यातील ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र आदरांजली!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या