पुढील तीन वर्षांत मुंबईचा पूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात आपलेच सरकार आहे. लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. आता विकासाचे हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन होणार आहे. पुढच्या दोन वर्षांत मुंबई आणि महाराष्ट्राला एक नवीन ओळख मिळवून देऊ, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आपल्या या कार्याला पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ४० हजार कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच पायाभरणी समारंभ १९ जानेवारी रोजी झाला त्यावेळी बीकेसीच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता जगभरात आहे. मात्र त्यांची सर्वाधिक लोकप्रियता मुंबईकरांच्या मनात आहे असा विश्वास राज्य सरकारला वाटतो. मोठ्या विकासकामांचे भूमिपूजन आणि त्यांचे उद्घाटन करण्याचा विक्रमही पंतप्रधानांच्या नावावर आहे यात शंका नाही. देशसेवेला त्यांनी वाहून घेतले आहे. आपल्या मातोश्रींच्या अन्त्यसंस्कारानंतर काही तासांतच त्यांनी विकासकामांना हिरवा झेंडा दाखवला होता. राज्य सरकारचा कामाचा झपाटाही अचंबित करणारा आहे. म्हणूनच मुख्यमंत्री म्हणाले, केवळ सहा महिन्यांत आमच्या सरकारने इतके काही दाखवून दिले आहे की, त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे.
त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमच्यावर टीका सुरू आहे. मात्र जितकी टीका कराल त्याच्या दसपट काम करून या टीकेला आम्ही प्रत्युत्तर देऊ. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबईकरांचे जगणे सुस करण्याची ही सुरुवात आहे. पंतप्रधान मोदींच्याच हस्ते ऑक्टोबर २०१५मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते, आता त्यांच्याच हस्ते उद्घाटन होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता, लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. त्यातून या राज्याची आणि जनतेची सुटका करण्याचे भाग्य मला मिळाले ते आदरणीय मोदींसारख्या धाडसी नेत्यामुळेच! मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, केवळ रस्ते, पूल बांधणे म्हणजे विकास नव्हे. विकासाला मानवी चेहरा पाहिजे, तो आम्ही दिला आहे. असो. राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता आल्यानंतर दोघांनीही गेली २५ वर्षे ताब्यात असलेल्या बाळासाहेब ठाकरेंची मुंबई महापालिका आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर सत्ता हातात असल्याने मुंबई महापालिकेचे सुशोभीकरण करण्याचा खटाटोप चालविला आहे. आधीच सुशोभीकरण झालेल्या प्रकल्पाचे पुन्हा सुशोभीकरण करण्यासाठी अनेक कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शिवाय एक हजार प्रसाधनगृहांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. सहा महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकारने ती केव्हा बांधली? मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी याचसाठी पंतप्रधानांना बोलावून सुशोभीकरणाचा घाट घालण्यात आला यात शंका नाही. मुळात लोकोपयोगी कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदी सोहळ्याचे इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची गरज काय? जनतेकडून वसूल केलेल्या करातून ही सगळी कामे केली जातात. मात्र सत्ताकारणाच्या अतिरेकापायी राजकीय पक्ष, नेते यांच्यात श्रेयवादाच्या लढाईचा इतका अतिरेक होत आहे की जनतेला आता त्याचा वीट आला आहे. गल्लोगल्ली कुठे कोनशिला बसविली, लोकार्पण झाले की त्याचा गाजावाजा, मीच केल्याचा डांगोरा पिटला जाणे आता नित्याचे झाले आहे. राजकारणामधला ‘मी’पणा काही कमी होत नाही. अनेकदा कामांची कोनशिला बसवली जाते मात्र वर्षानुवर्षे कामे एकतर पूर्ण होत नाहीत किंवा होतच नाहीत! पंतप्रधान मोदींनी आपल्या मुंबई दौ-यामध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ केला. मोदींनी आपल्या भाषणात, महाराष्ट्रातील आधीच्या सरकारच्या काळात विकासकामे रोखली गेल्याने विकास खुंटला होता परंतु आता डबल इंजिन सरकार असल्याने मुंबईचा विकास होत आहे असे सांगितले. मुंबईच्या विकासासाठीच्या निधीचा वापर भ्रष्टाचार करण्यासाठी केला जात असेल तर मुंबईचे भवितव्य उज्ज्वल कसे राहील असा सवाल त्यांनी केला.
मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्यांनी मुंबईच्या विकासासाठी काही केले नाही असेही ते म्हणाले. कोट्यवधीचे प्रकल्प, पायाभूत सुविधांची विविध कामे लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन हे सारे केले जात आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने जे शक्तिप्रदर्शन केले त्याची छाप या शासकीय कार्यक्रमांवर होती. मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायचीच असा संकल्पच जणूकाही शिंदे-फडणवीस यांनी सोडल्याचे या कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणवले. महानगरपालिकेच्या निवडणुका अजून घोषित झाल्या नसल्या तरी त्याआधीच प्रचारास आरंभ करून सत्तारूढ पक्षांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. सत्तारूढ भाजप-शिंदे सरकारने प्रचारात घेतलेल्या आघाडीस तोंड देण्यासाठी विरोधक कशाप्रकारे मोर्चेबांधणी करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विकासाचे नुसते डबल वा ट्रिपल इंजिन असून चालत नाही तर विकासाच्या गाडीला ‘रेड सिग्नल’ लागणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. मुंबईचा कायापालट करत असताना शहरातील सर्व नागरिकांचे, विशेषत: गरीब आणि वंचित लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशाच योजनांचा प्रामुख्याने कृति आराखड्यात समावेश व्हायला हवा.
आतापर्यंत अनेक योजना महाराष्ट्र शासनातर्फे हाती घेण्यात आल्या, या योजनांतर्गत नेमकी किती कामे मार्गी लागली व त्याचा लाभ समाजातील कोणत्या स्तरापर्यंत पोहोचला हे कळायला मार्ग नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रात जी काही कामे करतात त्याचा लेखाजोखा त्यांच्या संकेतस्थळावर टाकत नाहीत. त्यामुळे त्याचा तपशील जनतेला कळत नाही. पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा एकप्रकारे निवडणूक प्रचाराचा भागच होता. मुंबईवर लक्ष ठेवून तिचा कब्जा घेण्याचेच उद्दिष्ट आहे. मुंबईचा कायापालट करणार ही भाषा निव्वळ पालिकेवर सत्ता मिळावी याचसाठी होती. मोदींनी मुंबई-अहमदाबाद रेल्वेच्या कामाला दिलेले प्राधान्य हे गुजराती लोकांनी मुंबईत यावे, बस्तान बसवावे यासाठी आहे. नाव फक्त विकासाचे लक्ष्य मात्र मुंबई पालिका ताब्यात घेण्याचे आहे आणि सत्ताधारी नेते मात्र माना डोलावण्यात धन्यता मानत आहेत. मुंबई मनपाची सत्ता मिळाली तर भाजपचा सत्तेचा अग्निरथ तीन शक्तिशाली इंजिनावर चालणार आहे. या अग्निरथाचे अंतिम स्थानक ‘निवडणुकीचे गाव’ राहणार आहे.