26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसंपादकीय५० खोके, एकदम ओके!

५० खोके, एकदम ओके!

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्रात गत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाने बुधवारी विधानभवनाच्या पाय-यांवर कळस गाठला. खोके, ओक्के, बोके आदी घोषणांचे पर्यवसान सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांना भिडण्यात झाले. एकमेकांविरुद्ध घोषणा सुरू असताना शिंदे गटाचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि शिंदे गटाचे प्रताप सरनाईक तसेच विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली व हा वाद मिटवला. विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधी जवळपास रोजच विधानभवनाच्या पाय-यांवर घोषणाबाजी सुरू होती. विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात आंदोलन करत होते. बुधवारीसुद्धा सकाळी कामकाज सुरू होण्याआधी अशीच घोषणाबाजी सुरू होती. बुधवारी सकाळी १० वाजता भाजपच्या आमदारांनी पाय-यांचा ताबा घेतला. नंतर शिंदे गटाचे आमदारही तेथे आले.

शिवसेना तसेच ‘मातोश्री’विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. ‘अनिल परबचे खोके, मातोश्री ओके’ अशा आशयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. नंतर राष्ट्रवादीचे आमदार गाजरांची माळ घेऊन तेथे आले. पहिल्या चार पाय-यांवर सत्ताधारी शिंदे गटाची घोषणाबाजी, त्यानंतरच्या पाय-यांवर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या घोषणाबाजीचा ‘कलगीतुरा’ यावेळी पहावयास मिळाला. ‘कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी, युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहोचले यांच्या घरी’ असे बॅनर शिंदे गटातील आमदारांनी झळकावले. तसेच ‘वाझेचे खोके-मातोश्री ओके’ अशी घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळाच्या पाय-यावर पोहोचले. मात्र यावेळी आमदारांना न थांबवता ते सभागृहात निघून गेले. विरोधकांनी ‘५० खोके एकदम ओके अन् खाऊन खाऊन माजलेत बोके’ अशा घोषणा दिल्या. नंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेले. माध्यमांशी संवाद साधताना अमोल मिटकरी म्हणाले, त्यांच्या पोटात दुखण्याचे नेमके कारण काय? टीका करण्याचा अधिकार त्यांना आणि आम्हालाही आहे. आंदोलन करताना ते मारहाण करत असतील, शिवीगाळ करत असतील तर ही बाब महाराष्ट्राला अशोभनीय आहे. ५० खोके घेतले म्हणून तुमच्या जिव्हारी लागले. शिंदे गटाचे महेश शिंदे म्हणाले, अमोल मिटकरी म्हणजे राजकारणाला लागलेला काळा डाग आहे.

आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो परंतु त्यांना हे झोंबल्याने आमच्या अंगावर आले. दररोज विरोधक आंदोलन करत होते तेव्हा आम्ही शांत होतो. परंतु आज आम्ही त्यांच्या जागेवर आंदोलन केले तर त्यांना का झोंबले? आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केली. एकूण प्रकारावर व्यक्त होताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी. ‘चोराच्या मनात चांदणे’ असा हा प्रकार आहे. राज्यातील शेतक-यांचे प्रश्न असतील किंवा इतर मागण्या असतील. त्या विविध घोषणांद्वारे सरकारसमोर मांडत असतो. मात्र त्यातील ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही घोषणा त्यांना चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यातून हा प्रकार घडला. बुधवारी विधान भवनाच्या पाय-यांवर जे काही झाले ते विधिमंडळाच्या संस्कृतीला न शोभणारे होते यात शंका नाही. महाराष्ट्राला जसा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहास आहे तसाच प्रगल्भ असा वारसा महाराष्ट्राच्या विधिमंडळालाही आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक आदर्श नेते दिले, या नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि उंचीने भारतीय लोकशाहीची प्रतिमा आणि प्रतिष्ठा तर उंचावली आणि देशासमोर महाराष्ट्राची पताका फडकावली. विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणांनी एकेकाळी विधिमंडळ गजबजून गेलेले असायचे. अशाच एका नेत्याचा सत्कार बुधवारी विधिमंडळात करण्यात आला.

सामान्य लोकांचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडणारे, ‘मन्याडचा वाघ’ अशी ओळख असणारे, ‘जय क्रांती’ अशी घोषणा देत विधानसभा दणाणून सोडणारे कंधारचे केशवराव धोंडगे यांचा त्यांच्या शताब्दीनिमित्त विधिमंडळात सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दीनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. आपल्या कार्याद्वारे महाराष्ट्र विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध करणा-या धोंडगे यांच्या सत्काराच्या दिवशी आमदारांकडून अभद्र प्रदर्शन घडावे ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी आदी आयुधांद्वारे सरकारला जेरीस आणता येऊ शकते हे माहीत असूनही आमदारांनी गुद्यावर येण्याचा नतद्रष्टपणा का दाखवावा? विरोधक असो की सत्ताधारी, आज सत्ता असेल, उद्या नसेल याची जाणीव प्रत्येक लोकप्रतिनिधीला एकेकाळी असायची, आज ती नाही. कारण सत्ता असेल तिकडे धावत सुटायचे अशी मानसिकता असल्याने नैतिकता, सभ्यता आणि संयमी कृतीचा आजच्या लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे.विरोध कुठवर करायचा आणि विरोध होत असताना संयम किती दाखवायचा याचा विसर सर्वांनाच पडला आहे. त्यामुळेच धक्काबुक्कीचे प्रकार घडतात, असभ्यवृत्तीचे दर्शन घडते. राज्यासमोर अनेक समस्या आहेत.

शेतक-यांचे अनंत प्रश्न, आत्महत्या, अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे झालेले नुकसान, राज्यातील बेरोजगारी, वाढती महागाई, इंधनाच्या किमती असे असंख्य प्रश्न राज्यासमोर आहेत. असे असताना त्यावर प्रश्न विचारणे, चर्चा करणे, आंदोलन करणे सोडून सत्ताधारी-विरोधक एकमेकांना धक्काबुक्की, गुद्दागुद्दी करण्याची बहादुरी दाखवत आहेत. म्हणजेच कुठेतरी वैचारिकता हरवून बसले आहेत. विरोध हा वैचारिक असतो. विरोध हा वैचारिक लढाईतून करायचा असतो. त्यासाठी विधिमंडळ आहे, आंदोलनाचा मार्ग आहे, माध्यमांचा मार्ग आहे. ही सारी आयुधे वापरणे सोडून लोकप्रतिनिधी विधानभवनाच्या पाय-यांवर हमरीतुमरीवर येत आहेत, बाचाबाची करत आहेत. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत संस्कृतीला हे शोभणारे नाही. चर्चेद्वारे सामंजस्याने प्रश्नांची उकल करण्याऐवजी आजचे लोकप्रतिनिधी एकमेकांना गर्भित इशारे देण्यात मश्गुल आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच असा इशारा देत असतील तर काय बोलावे? सरकारकडून काही त्रुटी राहिल्यास त्या नजरेस आणून द्या. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण आणाल तर माझ्याकडेही तुमच्या चिठ्ठया-चपाट्या आहेत. त्या बाहेर काढण्याची वेळ आणू नका आणि माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला होता. सत्ताधारी आणि विरोधक ही एकाच रथाची दोन चाके आहेत हे लोकप्रतिनिधींना ज्या दिवशी समजेल तो सुदिन!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या