36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसंपादकीय‘आपला तो बाळ्या....’!

‘आपला तो बाळ्या….’!

एकमत ऑनलाईन

एप्रिल महिन्यात मुस्लिमांसाठी पवित्र असलेला रमजान आणि हिंदु धर्मियांचा महाकुंभमेळा सुरू आहे परंतु या निमित्ताने केंद्र सरकारकडून संविधानातील समानतेच्या तत्वाशी प्रतारणा होत असल्याचे दिसून आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असताना, इंजेक्शन आणि औषधांचा, रुग्णालयात खाटांचा तुटवडा असताना त्याविरुद्ध एकजुटीने लढा देण्याऐवजी ‘राजकारण’ करण्याची हौस भागवली जात आहे असे दिसते. ख-या अर्थाने जनता अडचणीत असताना तरी ‘सत्तेच्या कुरघोड्या’ केल्या जाऊ नये हे अपेक्षित आहे. तेवढे शहाणपणही सत्ताधा-यांकडे नसावे ही दुर्दैवाची गोष्ट.

आपल्या पक्षाचा प्रचार-प्रसार व्हावा, असे वाटणे साहजिक आहे पण जनतेचे हाल होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून आपलीच महत्त्वाकांक्षा कशी पूर्ण होईल हा विचार समानतेच्या तत्वाशी प्रतारणा करणारा आहे. समानतेच्या तत्वांची वल्गना करणा-या सत्ताधा-यांना हे शोभत नाही. कोरोनाच्या विषाणूने देशात थैमानाचे दुसरे चक्र चालवले असताना कुंभमेळ्यातील ‘शाही स्नाना’च्या जाहिरातीत भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबरच देशाच्या पंतप्रधानांची छायाचित्रे झळकावून धर्मप्रिय जनतेला ‘शाही स्नाना’चे पुण्य कमावण्याचे आवाहन करणे, काही राज्यात चाललेल्या ‘सत्तेच्या महासंग्रामा’त कोरोनाचे देशातून पूर्णपणे उच्चाटन झाल्याच्या थाटात सत्तेवर असलेल्या पक्षाविरोधात आरोप-प्रत्यारोप करणे कितपत योग्य आहे? अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्रीय नेतृत्वाने तूर्त सत्तेची हाव बाजूला ठेवून कोरोनामुळे आम जनतेचे होत असलेले हाल थांबवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

आपण राजकीय कुरघोड्या करत रहायचे आणि ‘कठीण प्रश्न अगोदर सोडवा’ असे आवाहन करायचे याला काय अर्थ? ‘लसीकरण उत्सव’ हे युद्धच असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आता ‘उत्सव म्हणजेच युद्ध’ म्हटल्यावर विजय मिळाल्यावर साजरे काय करायचे? कारण ‘उत्सव म्हणजे युद्ध’ संपल्यावर पुन्हा उत्सव साजरा करायचा, म्हणजे युद्ध करायचे काय? असो. निजामुद्दीन मरकज प्रवेशावर निर्बंध घालता येणार नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आणि दुस-याच दिवशी कुंभ मेळ्यातील शाही स्नानाच्या गर्दीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. वर्षभरापूर्वी दिल्लीत तबलीगींनी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याचे म्हटले गेले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा कोरोनाचा धुमाकूळ पाहता कुंभमेळ्यातील स्नान ‘शाही’ असल्याने तेथे कोरोना फिरकणार नाही, असे सरकारला वाटते काय? तुम्ही कुंभमेळ्याला परवानगी देणार असाल तर रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर होणा-या सार्वजनिक नमाज पठणाला कसे रोखता येईल? या उपरही निर्बंध लादले गेल्यास त्यातून ‘आपला तो उत्सव अन् दुस-याच्या त्या अनिष्ट प्रथा’ असे ध्वनित होईल.

कोरोनापुढे गडकरी हतबल!

रमजानच्या काळात निजामुद्दीन मरकजमध्ये भाविकांना प्रवेश देण्याबाबत केंद्र सरकारने सहमती दर्शविली होती परंतु दुस-याच दिवशी घूमजाव करीत मशिदीमध्ये कोणालाही कार्यक्रमास मुभा दिली जाणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयापुढे स्पष्ट केले. नमाज अदा करण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करून भाविकांना मरकजमध्ये प्रवेश मिळावा अशी मागणी दिल्ली वक्फ मंडळाने याचिकेद्वारे केली होती. ‘दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व धार्मिक कार्यक्रमावर १० एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मरकजमध्ये कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले.

पोलिसांनी मंजुरी दिलेल्या २०० नागरिकांच्या यादीतील केवळ २० भाविकांना एकावेळी प्रवेश देण्याच्या केंद्राच्या निर्णयावर न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हरिद्वारमधील महाकुंभमेळ्यात कोरोना नियमावलीचे उघडपणे उल्लंघन केले गेल्याबद्दल त्या अनुषंगाने तुम्ही धार्मिक स्थळांमध्ये एका वेळी किती भाविकांना प्रवेश द्यावा याबाबतच्या संख्येत काटछाट करून ती २० वर आणली आहे का असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला होता. निजामुद्दिन मरकज व कुंभमेळा या दोन्ही कार्यक्रमांची तुलना होऊ शकत नाही, असे वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी केले आहे. मरकज कोठीसारख्या बंदिस्त जागेत होतो तर कुंभमेळा गंगेच्या काठावरील मोकळ्या घाटांवर होतो. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांची तुलना करता येणार नाही असे रावत म्हणाले. हरिद्वार येथील कुंभमेळा कोरोना विषाणूच्या उद्रेकाचे कारण ठरतोय. गत दोन दिवसात तेथे सुमारे एक हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

‘महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे’ त्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लावले आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत मशीदीमध्ये नमाज पढण्यास परवानगी देणे योग्य नाही असे स्पष्ट करत न्या. धनुका व न्या. बिश्ट यांच्या खंडपीठाने दक्षिण मुंबईतील मशीद सुरू करण्यास आणि दिवसातून पाच वेळा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत नमाज पढण्याची परवानगी देण्याची जुम्मा मस्जिद ट्रस्टची विनंती फेटाळून लावली. ट्रस्टने सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन केले जाईल अशी हमी न्यायालयाला दिली होती. परंतु राज्य सरकारच्यावतीने याचिकेला जोरदार विरोध करण्यात आला. राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खंडपीठाने मशीद सुरू करण्यास आणि दिवसातून पाच वेळा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत नमाज पढण्यासाठी परवानगी नाकारली. उत्तराखंडमधील हरिद्वार हे सध्या साधू-संत आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. तेथे कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे कोरोना संक्रमितांची संख्याही वाढत चालली आहे. शहरातील कोरोना रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा गाठला आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या