24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसंपादकीयआरोप-प्रत्यारोपांचे राजकारण!

आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण!

एकमत ऑनलाईन

मुंबई महापालिका जिंकण्याची भाषा करणा-या ‘कमळाबाई’ आणि मुंबईचा संबंध काय, असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजपला लक्ष्य केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत असेल तर महिनाभरात पालिका आणि राज्य विधानसभा निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेतील बंडानंतर प्रथमच भव्य मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे तोडाफोडीचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. जाती-धर्मात फोडाफोडी करून मुंबई जिंकता येणार नाही. त्यासाठी मुंबईकरांची मने जिंकावी लागतील. अमित शहा यांनी शिवसेनेला जमीन दाखवा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र, त्यांना अस्मान दाखविल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईवर लचके तोडण्यासाठी गिधाडे फिरत आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदू-मुस्लिम किंवा मराठी-अमराठी असे फोडाफोडीचे डावपेच आखले तरी ते येथे यशस्वी होणार नाहीत. शिवसेनेने आतापर्यंत आणि कोरोनाकाळातही हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवांसाठी आणि अमराठींसाठीही काम आणि मदतकार्य केलेले आहे. त्यामुळे मुस्लिम, गुजराती, उत्तर भारतीय आणि सर्वच समाज घटकांतील बांधव शिवसेनेबरोबर आहेत, असे ठाकरे म्हणाले. भाजपबरोबर २५ वर्षे युतीत सडली आणि कुजली या वक्तव्याचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. ठाकरे यांनी या मेळाव्यात शिंदे गटावर आणि भाजपवर तोफगोळे सोडले. भाजपचा उल्लेख अनेकवेळा ‘कमळाबाई’असा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख ‘मिंधे गट’ असा केला. आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली होती पण बाप पळवणा-यांची औलाद आता महाराष्ट्रात फि रत आहे, असा घणाघात ठाकरे यांनी केला. यावरून आगामी महापालिका निवडणूक चांगलीच गाजणार हे उघड आहे. हिंमत असेल तर महिनाभरात निवडणुका घेऊन दाखवा, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी भाजप हे आव्हान स्वीकारेल असे वाटत नाही. कारण महापालिका निवडणूक तर होणार आहेच मग ती महिनाभरात झाली काय किंवा दोन महिन्यांनी झाली काय, काय फरक पडतो? राज्य विधानसभा निवडणुकीबाबतही तसेच आहे.

महाविकास आघाडीने अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. मग बंडखोर शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार उर्वरित अडीच वर्षे पूर्ण केल्याशिवाय निवडणुकीला सामोरे कसे जाईल? भ्रष्टाचाराचा आरोप करता करता भाजपने त्याच लोकांना सोबत घेतले आहे असा आरोप करून उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेवर वंशवादाचा आरोप केला जातो. माझ्या वंशाचा मला अभिमान आहे, तुमचा वंश कोणता आहे ते सांगा. बाहेरचे लोक घेऊन तुमच्याकडे निव्वळ भेसळच उरली आहे. तुमचा खरा वंश कोणता ते लोकांना शोधावेच लागेल. शिवसेनेतील बंडानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी २२ ते २५ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून केलेल्या टीका-आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तर दिले. दिल्लीत राज्यप्रमुखांची भेट घेण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात घेतलेल्या सभेत प्रामुख्याने आपल्या बंडाची आणि त्यामागील कारणांची मीमांसा केली. गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनता चांगलीच जाणते.

आम्हाला खोके म्हणतात पण माझ्यापेक्षा जास्त हिशेब कोणाकडे असेल? आमच्यामुळेच आता सभा, मेळावे होऊ लागले आहेत अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. अडीच वर्षांत गटप्रमुखांची आठवण आली नाही. त्यांना अडीच वर्षांत काडीची किंमत दिली नाही. ‘वर्षा’वर प्रवेश नव्हता, ‘मातोश्री’वर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली आणि शिवसैनिकांना ‘अच्छे दिन’ आले असे सांगून शिंदे म्हणाले, राज्यप्रमुखांना आधी कधीच फोन गेले नाहीत. आम्ही त्यांना बोलावले आहे. राज्याच्या प्रमुखांनाही संपर्क केला जात नव्हता. आम्ही टीका करणार नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देऊ असे सांगून शिंदे म्हणाले, आमचा उल्लेख मिंधे गट असा केला जातो. आम्ही मिंधे गट नव्हे, तर बाळासाहेबांचे खंदे शिवसैनिक आहोत. मिंधेपणा कोणी केला? सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कोण गेले? ठाकरे यांनी जमिनीत गाडू म्हणणा-यांना अस्मान दाखवू असे म्हटले आहे. पण तीन महिन्यांपूर्वी आम्हीच तुम्हाला अस्मान दाखवले असा टोला शिंदे यांनी मारला. आम्ही वडापाव आणि मिरचीचा ठेचा खाऊनच मोठे झालो आहोत म्हणूनच तुम्हाला ठेचले.

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण मग तुम्ही बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा खोचक प्रश्न शिंदे यांनी केला. शिवसेना ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिका-यांनी रक्त आणि घाम गाळून शिवसेना उभी केली आहे. त्यामुळे तुम्हाला शिवसेना आमची जहागिरी आहे असे सांगण्याचा अधिकार नाही. कंत्राटी मुख्यमंत्री या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, आपण शेतक-यांचे भले करण्याचे, समाजाचा विकास करण्याचे, राज्य पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे. ‘कहनेवाले कहते रहेंगे, हम अपना काम करते रहेंगे’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. पक्षात फूट पडल्यानंतर एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप होतच राहणार! राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र आजवर राजकारणाची पातळी कधीही इतकी घसरली नव्हती. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात व्यक्तिगत द्वेष आणि टोकाची कटुता असू नये. लोकशाहीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. मात्र गत काही वर्षांपासून राजकारणाचा एकूणच दर्जा खालावला आहे.

सत्ताकारणाच्या अतिरेकापायी एकूणच राजकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कधी काळी राजकारणात तत्त्वनिष्ठा, नीतिमूल्ये, वैचारिक बांधीलकी, पक्षनिष्ठा यांची जपणूक केली जायची, मात्र आता राजकारणात सारे काही क्षम्य असते असे म्हणत स्वार्थ साधला जात आहे. शिंदे गटाला बीकेसी मैदान मिळाल्यानंतर शिवसेनेला पारंपरिक शिवाजी पार्क मैदानावर परवानगी मिळाली असती तर ते अधिक चांगले झाले असते. मात्र एकूणच राजकारणाची पातळी घसरली असल्याने टोकाची कटुता आणि व्यक्तिगत द्वेष असे चित्र दिसणे दुर्दैवी आहे. आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असे दावे-प्रतिदावे केले जात असले तरी सामान्य माणसाला ते पटणारे नाही. यंत्रणा, नोकरशहा हे सत्ताधा-यांना धार्जिण्या भूमिका घेतात हे कालही कटू सत्य होते, आजही ते कटू वास्तव आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या