25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeसंपादकीयस्वातंत्र्याचा ‘अमृत’महोत्सव !

स्वातंत्र्याचा ‘अमृत’महोत्सव !

एकमत ऑनलाईन

शनिवार, दि. १३ ऑगस्टपासून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान देशभर जल्लोषात सुरू झाल्याने देशाच्या स्वातंत्र्याचा आजचा अमृतमहोत्सव झळाळून निघाला आहे यात वाद नाही. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा व्हायला हवाच. त्यामुळे मोदी सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सरकारच्या लौकिकाप्रमाणे ‘इव्हेंट’चे रूप आलेले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून या अभियानाचे स्वागत करायला हवे. शेवटी एखाद्या बाबीचा सार्थ अभिमान वा आनंद व्यक्त करण्याची आपली परंपरा म्हणजे उत्सव साजरा करणे हीच आहे. त्या परंपरेचे पाईक होत सरकारने ‘हर घर तिरंगा’चा महाउत्सव अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने योजला तर त्यात नाक-डोळे मुरडण्याचे काही कारण नाही. राष्ट्रभक्ती व देशप्रेम मनात असायला हवे, त्याच्या प्रदर्शनाची व उत्सवी रूपाची गरज काय? हा प्रतिवाद एका बाजूने बिनतोडच ! मात्र, त्याचवेळी मनामनांमध्ये असलेल्या वैयक्तिक देशप्रेम व राष्ट्रभक्तीला सामूहिक एकतेच्या गोफात गुंफण्यासाठी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाची गरज असतेच. विविध उपक्रमांचे आयोजन करून दरवर्षीच आपण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. मात्र, त्याला वैयक्तिक अथवा फार तर संस्थात्मक वा संघटनात्मक रूप असते.

त्यामुळे कितीही विधायक स्वरूप असले तरी समाजातील सर्व घटक एकत्रितरीत्या त्या उपक्रमाशी जोडले जातीलच अशी शक्यता कमीच. त्यामुळे राष्ट्र म्हणून देशातील सर्व जनतेला एकत्रित जोडायचे तर देशपातळीवर एक व्यापक राष्ट्रीय कार्यक्रम हवा. त्या अनुषंगाने विचार करून मोदी सरकारने घरोघरी राष्ट्रध्वज फडकाविण्याचा कार्यक्रम देशातील जनतेला दिला तर त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाहीच. राष्ट्रध्वज फडकाविणे व त्या अनुषंगाने देशाच्या स्वातंत्र्याचे गौरवाने, अभिमानाने प्रत्येकाने स्मरण करणे यात वावगे वा आक्षेपार्ह काय? त्यामुळे त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात वा टीका करण्यात अर्थ नाही. आक्षेप नोंदवायचाच तर सरकारने यापेक्षा जास्त लोकोपयोगी कार्यक्रमांचा विचार का केला नाही, यावर नोंदवावा लागेल व असा आक्षेप नोंदविताना देशातील प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेतले जाईल, असा पर्यायी कार्यक्रमही सुचवायला हवाच! असे न करता घेतले जाणारे आक्षेप व होणारी टीका सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने एकांगी व विरोधासाठी विरोध ठरते. त्यात मग पक्षीय राजकारण शिरते व मग अमूक पक्षाचा राष्ट्रध्वज फडकावून आनंद व्यक्त करण्याला विरोध राष्ट्रध्वजालाच विरोध आहे का? इथवर हा वाद जाऊन पोहोचतो. दुर्दैवाने आपल्या देशात अशाच वितंडवादाची प्रथा खोलवर रुजली आहे.

खरं तर अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने देशाने एकत्रितरीत्या वितंडवादाची ही प्रथा कायमची गाडून टाकण्याचा संकल्प केला व मनापासून राबविला तर देशाचे भलेच होईल. असो! मूळ मुद्दा हा की, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमास होणारा विरोध वा घेतला जाणारा आक्षेप हा अनाठायीच त्यामुळे तो फारसा दखलपात्र ठरत नाही. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास मनामनांत ताजा करतानाच या ७५ वर्षांच्या प्रवासात देशाने काय मिळविले व काय गमावले? याचे आत्मचिंतन झाले पाहिजे. इतिहास जागवताना वर्तमान तपासला नाही, त्यातील त्रुटी दूर केल्या नाहीत तर भविष्य बिघडू शकते, याचा गांभीर्याने विचार देशावर प्रेम करणा-या प्रत्येक नागरिकाने स्वत:शी प्रामाणिकपणे करायला हवा. ज्या विविधतेतील एकतेवर आपण अभिमान व्यक्त करतो ती विविधतेतील एकता ७५ वर्षांच्या प्रवासात आपण सर्वांनी वृद्धिंगत केली का? यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा कारण त्यावरच देशाचे ऐक्य, अखंडता व एकात्मता अवलंबून आहे. त्यादृष्टीने विचार केला तर आज देशात व समाजात धर्म, पंथ, जात, लिंग, प्रदेश, भाषा, वर्ग अशा अनेक बाबींवरच्या भावना व विचार ज्या अनकुचीदार पातळीवर पोहोचल्या आहेत ते पाहता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपल्या हातात देशाच्या भवितव्याचा ‘अमृत कलश’ आहे की ‘विषाची कुपी’ असाच प्रश्न निर्माण होतो.

घरोघरी तिरंगा फडकावून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना प्रत्येकाने वरील प्रश्नाचे प्रामाणिक आत्मचिंतन करायला हवे. तरच ख-या अर्थाने घरोघरी तिरंगा फडकाविण्याच्या या उपक्रमाचे सार्थक होईल अन्यथा तो इतर इव्हेंटसारखा एक इव्हेंटच ठरेल! असे इव्हेंट हे तात्पुरते असतात व तात्पुरताच आनंद मिळवून देतात. त्यातून काही दिवसांसाठी वा तासांसाठी जागृत झालेले देशप्रेम, राष्ट्रभक्ती व एकात्मतेची भावना भर ओसरल्यावर हाती काही विधायक वा ठोस शिल्लक ठेवते हा अपवादात्मक योगच! बहुतांश वेळा ‘रात गयी बात गयी’ असाच प्रकार अशा ‘इव्हेंटरूपी’ उपक्रमांबाबत घडतो, हाच सार्वत्रिक अनुभव! स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व त्यानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकाविताना हा उपक्रम आपण ‘इव्हेंट’ म्हणून करणार की राष्ट्राचा महाउत्सव या प्रामाणिक भावनेने राबविणार? याचा प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वत:शी विचार करायला हवा. हा विचार मी, माझे कुटुंब, माझी जात, माझा धर्म, माझा प्रांत, माझी भाषा, माझा वर्ग, माझी आर्थिक, सामाजिक स्थिती या सर्व कुंपणांना तोडून माझा देश, माझ्या देशाचे हित, माझ्या देशाचे ऐक्य, माझ्या देशाची अखंडता, सार्वभौमत्व, प्रगती व विकास या पातळीवर पोहोचला पाहिजे. जे जे देशहितासाठी बाधक त्याला विरोध हीच भावना व विचार या आत्ममंथनातून पुढे आला तर प्रत्येकाच्या हाती देशहिताचा ‘अमृत कलश’ येईल.

परिस्थिती बिघडण्यासाठी कुणाला तरी दोष दिल्याने परिस्थिती सुधारणार नाही तर एकत्रितरीत्या अशा दोषींना ठामपणे नाकारून व रोखूनच ती परिस्थिती बदलता येईल. देशहितासाठी आपण प्रत्येकाने आपल्या मनात व कृतीत कायम हीच भावना जागृत ठेवली तर तेच ख-या अर्थाने राष्ट्रप्रेम आहे व तीच खरी देशभक्ती! स्वातंत्र्यासाठीच्या संग्रामात देशातील सर्व नागरिकांमध्ये ही भावना जागृत झाली व तिचे एकात्मिक प्रदर्शन घडले म्हणूनच देशाला स्वातंत्र्याचा कलश प्राप्त झाला. त्या अमृत कलशाचे जतन करताना व त्यावर आनंद, अभिमान, गौरव व्यक्त करताना हातातल्या तिरंग्याच्या जाज्वल्य इतिहासाचे व त्यासाठी झालेल्या प्रचंड त्याग, संघर्षाचे, आहुतींचे विस्मरण होता कामा नये की, देशभक्तीच्या, राष्ट्रप्रेमाच्या ख-या विचारांशी गल्लत होता कामा नये. आपण सर्वांनी तिरंगा फडकाविताना व उत्सव साजरा करताना ही विचारांची गल्लत टाळली तर नक्कीच ‘हर घर तिरंगा’ हा केवळ एक इव्हेंट न ठरता राष्ट्रप्रेम, देशभक्ती, देशाचे ऐक्य, अखंडता, एकता, प्रगती, विकास याचा ‘अमृत कलश’ देशवासीयांंच्या हाती देणारा राष्ट्रीय उपक्रम ठरेल. तो तसा ठरणे व घडविणे हीच आज देशाची सर्वांत मोठी गरज आहे हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या