26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसंपादकीयअमृतयोग !

अमृतयोग !

एकमत ऑनलाईन

सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. अशा गौरवशाली व अभिमानास्पद पर्वात देशाचा गौरव व अभिमान वाढवणारी घटना तमाम देशवासियांना शुक्रवारी अनुभवता आली. स्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू युध्दनौकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. विमानाहू युध्दनौकांच्या जगातील निवडक देशांच्या पंक्तीत भारताने प्रवेश केला. हा देशासाठी अमृतमहोत्सवी वर्षातील अमृतयोगच! ही क्षमता तोवर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया व चीन या देशांकडेच होती. आता भारत या यादीत प्रवेशकर्ता झाला ही देशासाठी व देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब ! २६२ मीटर लांब, ६२ मीटर रूंद, ३० विमाने, हेलिकॉप्टरच्या ताफ्याची क्षमता. ४५ हजार टन वजन अशी ही बाहुबली युध्दनौका भारतीय नौदलाच्या सेवेत रूजू झाली आहे.

हा गौरवाचा व अभिमानाचा क्षण ! ही युध्दनौका तयार करण्यासाठी २० हजार कोटी रुपये लागले आणि हजारो हातांना कित्येक वर्ष अवरित मेहनत करावी लागली. तब्बल १७ वर्षांच्यो कालावधीनंतर ही युध्दनौका देशाच्या सेवेत रूजू झाली. हा विलंब मात्र देशाला विचार करायला लावणारा आहे. सध्याच्या वातावरणात चीनची वाढती दादागिरी पाहता व चीनचे विखारी विस्तारवादी धोरण पाहता संरक्षण सज्जतेचा आपला वेग कैकपटीने वाढण्याची गरज आहे, हेही यानिमित्ताने आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण कोणत्याही देशाचे सार्वभौमत्व आणि जागतिक प्रभाव हा त्या देशाची स्वसंरक्षण व्यवस्था किती प्रबळ व सज्ज आहे यावर अवलंबून असते. नजीकच्या काळात चीनने ज्या आक्रमकपणे आपले विखारी विस्तारवादी धोरण राबवायला सुरुवात केली आहे त्याला तोंड देण्यासाठी भारताला संरक्षण सज्जतेत वेगाने आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

आयएनएस विक्रांतच्या रुपाने भारताने याबाबतीत एक मोठे पाऊल टाकले आहे ही अभिमानास्पद बाब. मात्र एवढ्यावर समाधान मानून चीनच्या आव्हानाला रोखता येणार नाही. हिंदी महासागर व हिंद-प्रशांत सागरी क्षेत्र हे चीनने सुप्त संघर्षाचे क्षेत्र बनविले आहे. विशेषत: हिंदी महासागरवर चीनने जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात चीनने नांगरलेली संशोधन व गुप्तचर नौका, पाकिस्तानच्या ग्वादार बंदराचा विकास तसेच अरबी समुद्रापर्यंत घुसवलेल्या पाणबुड्या या सगळ्यातून चीनची नियत व महत्त्वाकांक्षा स्पष्टच होते आहे. अशा वेळी आपले संरक्षण करण्यासाठी भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही. इतर देशांच्या सहकार्याने चीनवर दबाव आणून त्यांच्या कारवायांना वेसन घालता येते. मात्र चीनने थेट आगळिकंकेली तर त्याचा सामना स्वबळावरच करावा लागणार आहे. रशिया-युक्रेन युध्दातून ही जागतिक परिस्थिती सुस्पष्ट झाली आहेच. त्यामुळे आपण कुठल्याही आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याला कुठलाही पर्याय नाहीच. त्या दृष्टीने स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांतचे लोकार्पण हा भारतासाठी मैलाचा दगड ठरतो.

तेजस विमान, कावेरी इंजिन, अर्जुन रणगाडा, अग्नी-त्रिशूल ते ब्रेम्होससारखी क्षेपणास्त्रे विकसित करणे, प्रोजेक्ट ७५ अंतर्गत पाणबुड्यांची निर्मिती यातून संरक्षण क्षेत्रातील आत्मीनर्भरतेची चुणूकंआपण दाखवत आहोत मात्र या सगळ्या निर्मितीतील अनेक सुटे भाग आजही आपल्याला आयात करावे लागतात. सौदी अरेबियाच्या खालोखाल भारत हा आजही जगातला शस्त्रास्त्र खरेदीदार मोठा देश आहे. संरक्षणावरील भारताचा वार्षिक खर्च पावणेपाच लाख कोटी रुपयांचा आहे आणि त्यातील साठ टक्के रक्कम ही केवळ आयातीवर खर्च होते. ही बाब लक्षात घेता आपल्याला संरक्षण आत्मनिर्भरतेत आणखी किती लांबचा पल्ला गाठायचा आहे याचा अंदाज यावा. शिवाय त्यासाठीचा वेग कैकपटीने वाढविण्याची गरजही ध्यानात यावी. मात्र राज्यकर्त्यांना याचे खरोखरच भान आहे का ? अशी शंका निर्माण होते कारण त्यांचे वर्तन व श्रेयवादाची हौस! मूळ नियोजनानुसार आयएनएस विक्रांत २०१० सालीच नौदलात दाखल व्हायला हवी होती व २०१६ पर्यंत ती पूर्णपणे युध्दसज्ज व्हायला हवी होती. मात्र तब्बल १२ वर्षांच्या विलंबाने ती आता नौदलात दाखल झाली आहे.

या विलंबामुळे मूळ नियोजनापेक्षा या युध्दनौकेचा उत्पादन खर्च तब्बल १३ पटींनी वाढला. ७५ वर्षांपूर्वी ‘उपाशीपोटी लोकांचा कधीही कोलमडून पडेल असा देश’ म्हणून हिणवल्या गेलेल्या भारतासाठी आयएनएस विक्रांतचे लोकार्पण हा अभिमानाचा व गौरवाचा क्षण असला तरी बदलत्या जागतिक परिस्थितीत ही संरक्षण सिध्दता पुरेशी आहे का ? याचाही राज्यकर्त्यांनी साकल्याने व गांभीर्याने विचार करायला हवा. आयएनएस विक्रांंतला पूर्णपणे युध्दसज्ज होण्यासाठी आणखी किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठीचा विलंब ही आपली कायमची राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्याचा फटका देशाला वारंवार सहन करावा लागतो तरीही त्यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याची सुबुध्दी राज्यकर्त्यांना येत नाही. बाप्पांच्या आगमनानंतर लगेच आयएनएस विक्रांतचे लोकार्पण झाले आहे. बुध्दीचा देवता आपल्या देशातील राज्यकर्त्यांनाही किमान देशाच्या संरक्षणासारख्या कळीच्या विषयात तरी पक्षीय राजकारण दूर ठेवण्याची सुबुध्दी देईल, अशी आशा करू या! असो !! आयएनएस विक्रांतच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आणखी एक प्रतिकात्मक बदल घडला आहे.

नौदलाच्या ध्वजातील ब्रिटिशाही सत्तेचा अंमल चिन्हांकित करणा-या लाल क्रॉसला भारताने सोडचिठ्ठी दिली आहे. त्याऐवजी भारतीय आरमाराच्या उज्ज्वल कामगिरीची परंपरा जन्माला घालणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेतलेली अष्टकोनी मुद्रा आणि त्यात अशोकस्तंभ, सत्यमेव जयते हे वचन, नांगर व ‘शं’ नो वरूण:’ हे नौदलाचे ब्रीद वाक्य भारतीय नौदलाच्या ध्वजावर विराजमान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात ‘गुलामगिरीचे जोखड फेकून द्या’ असे आवाहन केले होते. त्यानुसारच नौदलाने उचललेले हे पाऊल आहे. त्याचे मनापासून स्वागत करायला हवे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या संरक्षणासाठी आरमाराचे महत्त्व ओळखन शत्रूच्या काळजात धडकी भरवणारे सुसज्ज आरमार उभारणा-या दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचे अधिष्ठान नौदलाच्या ध्वजास प्राप्त होणे हे स्वागतार्ह आणि अभिमानास्पदही ! इंग्रजांनी भारतावर राज्य करताना भारतीय आरमाराची परंपरा शक्य तेवढी खिळखिळी करून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता.

आयएनएस विक्रांतच्या निमित्ताने भारतीय आरमाराची गौरवशाली परंपरा पुनरुज्जीवीत झाली आहे. नौदलाच्या गरजेनुसार सध्या ३९ युध्दनौकांची निर्मिती सुरू आहे. या आधुनिक स्वदेशी युध्द नौकांमुळे जगाला आता भारताकडे बघण्याची आपली दृष्टी निश्चितच बदलावी लागेल. तथापि विशाल सागरी किनारा लाभलेल्या आपल्या देशाच्या सागरी संरक्षण सज्जतेसाठी आपल्याला आणखी किमान दोन विमानवाहू युध्दनौकांची तातडीने गरज आहे. आयएनएस विक्रांतचे स्वागत करताना आपल्याला देशाच्या या गरजेकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्यायलाच हवी व तातडीने त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. संरक्षण सिध्दतेत विश्वासार्हता निर्माण करणे, या प्रक्रियेचा वेग वाढविणे ही देशाची सध्याची गरज आहे. अमृतयोग साधताना राज्यकर्ते त्याकडेही तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देतील, अशी आशा करूया ! तूर्त हा अमृतयोग प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवाचाच, हे मात्र निश्चित !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या