22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसंपादकीयआटापिटा... श्रेयवादासाठी!

आटापिटा… श्रेयवादासाठी!

एकमत ऑनलाईन

जेव्हा कोरोनाच्या दुस-या लाटेने देशभरात उच्छाद मांडला होता तेव्हा केंद्र सरकारचे समर्थक, भक्त, अंधभक्त उंदरासारखे बिळात दडून बसले होते. यथावकाश ही लाट ओसरू लागल्याचे दिसताच हे उंदीर बिळातून बाहेर आले आणि आम्ही दुस-या लाटेवर मात केली असे सांगत शेपट्या उंचावून नाचू लागले. कोरोनाच्या दुस-या लाटेवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केंद्राने केला. कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, ३७७ जिल्ह्यांत संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. कोरोना लस विकसित केल्याबद्दल आणि कोरोना प्रतिबंधासाठी केवळ एका वर्षातच अन्य उपाययोजनांना चालना दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले. हे कौतुक योग्यच होते. यापूर्वी परदेशात नवे शोध लागले की देशाला अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागायची मात्र आता आपले शास्त्रज्ञ परदेशातील शास्त्रज्ञांंच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत ही गोष्ट कौतुकास्पदच.

देशातील मंदगतीने सुरू असलेल्या लसीकरणाबाबत मात्र पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. कोरोनाच्या दुस-या लाटेत उत्परिवर्तित विषाणू अधिक घातक ठरला. त्याचा संसर्गही वेगाने झाला. लोकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम झालेला दिसला. अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. पण अत्यंत कमी काळात ही लाट आटोक्यात आणण्यात सामूहिक यश मिळाले. कोरोनामुळे विकसित देशांच्या आरोग्ययंत्रणा कोलमडून पडल्या पण भारतात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधात नियोजनबद्ध लढाई लढली गेली असे तुणतुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वाजवले. खरे तर ही लढाई नियोजनबद्ध श्रेयवाद लाटण्यासाठी होती! देशभरात लस गोंधळ सुरू होता तेव्हा गृहमंत्री कोणत्या बिळात लपून बसले होते? पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना कानमंत्र देताना म्हटले आहे की कोरोनाची लढाई सगळे मिळून लढू. कठीण काळ आला म्हणून रडण्यात वेळ घालवायचा नसतो, सकारात्मक विचार करायचा आणि संकटावर मात करायची असते असे उपदेशामृतही प्रधानसेवकांनी विद्यार्थ्यांना पाजले. हे उपदेशामृत पिताना विद्यार्र्थ्यांना प्रश्न पडला असेल की, देशात मृत्यूतांडव सुरू असताना पंतप्रधान मोदी का रडले? ते खरंच रडत होते की डोळ्यात कचरा गेला म्हणून डोळ्यात पाणी आले होते, की ते नाटक होते? विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी परीक्षा रद्द केल्याबद्दल मोदींचे आभार मानले.

विद्यार्थ्यांनी मोदींशी ‘मन की बात’ ही केली. एक विद्यार्थी म्हणाला, आता मी सुटीत स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणार आहे! एका मागून एक परीक्षा रद्द होत असताना तो कसला अभ्यास करणार? दुसरा विद्यार्थी म्हणाला, मी तुमच्यासारखी दाढी ठेवणार… हां, ही मात्र अनुकरणीय गोष्ट आहे! एका विद्यार्थिनीने आता परीक्षा नसल्याने मनसोक्त झोपणार असे सांगितले तर दुसरी म्हणाली, माझ्या आजीला राजकारणात रस आहे. तेव्हा मोदी म्हणाले, तुझ्या आजीला सगळे राजकारण कळते तर…! वस्तुस्थिती अशी की, जुन्या पिढीला तर राजकारण कळतेच पण नव्या पिढीला राजकीय चालही कळते. बिहार निवडणुकीपूर्वी मोफत लसींचे आश्वासन मोदींनी दिले होते पण भारतातील दरिद्री जनतेला मोफत धान्य, वीज यातच स्वारस्य असल्याने जनतेने त्याकडे विशेष लक्ष दिले नसेल. कारण मोफत लसीकरण हा मुद्दा पुन्हा निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी दिसला नाही. पण कोरोनाच्या दुस-या लाटेने अन्न, वीज याबरोबरच लस ही सुद्धा मूलभूत गरज आहे हे दाखवून दिले आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत मृत्यंूची संख्या वाढली आणि सामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र, मोदी सरकार वास्तव आणि काल्पनिक जगातला फरक ओळखू शकले नाही.

कोरोनाचे संकट थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय घेण्याच्या प्रयत्नात होते. श्रेयवादातून कोरोना उपायांकडे दुर्लक्ष झाले असा आरोप नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी केला आहे.भारताकडे औषध निर्मितीचे कौशल्य आहे. साथरोगांना प्रतिकार करण्याची भारतीयांची क्षमता मोठी आहे. त्यामुळे भारताची कोरोना महासाथीशी लढण्याची क्षमता चांगली होती. पण श्रेय लाटण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न, विजयी होण्याची भावना या अनिष्ट गोष्टींमुळे संकट वाढले. या संकटाला सामोरे जाण्याबाबत चुकीचा प्रयत्न सरकारने केला आणि नागरिकांवर संकट लादले. कुणी चांगले काम करत असेल तर त्याला त्याचे श्रेय मिळते. अनेकदा श्रेय मिळणे हे व्यक्ती किती चांगले काम करतेय याचे संकेत असतात पण श्रेय उपटण्याचा प्रयत्न करणे ही वैचारिक दिवाळखोरी होती. मोदी सरकारने नेमकी तीच चूक केली. भारत आधीच सामाजिक विषमता, मंदगती विकास आणि बेरोजगारीच्या संकटाशी झुंजत होता. सरकारच्या बेजबाबदार धोरणांनी कोरोना संकटात हे प्रश्न जास्त स्फोटक होत आहेत. अर्थव्यवस्थेची विफलता आणि सामाजिक एकजुटीच्या अभावाने देशातील कोरोना संकट अधिक गडद झाले. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक नीती या क्षेत्रात मोठे बदल केल्याशिवाय भारताला पुढे जाता येणार नाही.

त्यासाठी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरतील असे अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. गत दीड वर्षात बेरोजगारीत, नैराश्यात वाढ, उत्पन्नात घट अणि इतर सामाजिक व आर्थिक परिणामांना जे घटक जबाबदार आहेत त्यात लसीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष हा घटक प्रामुख्याने पुढे येतो. ज्या काळात विज्ञानाची, त्यातील तज्ज्ञांच्या सल्ल्याची आणि त्यांच्या अंमलबजावणीची गरज होती तेव्हा आम्ही आत्ममग्न होऊन ‘कोरोना गेला’ अशी दवंडी पिटत होतो. सरकार लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत आहे असाही आरोप करण्यात येत होता. कारण मोठ्या शहरात खासगी रुग्णालयात तसेच कंपन्यांमध्ये त्यांच्या कर्मचा-यांसाठी लसीकरण सुरू होते. म्हणजे पैसे द्यायची तयारी असेल व संगणक ज्ञान असेल तर तुम्हाला लस मिळेल. मग गरीब लोकांनी काय करायचे? डिसेंबरपर्यंत १०८ कोटी लोकांना २१६ कोटी लसमात्रा दिल्या जातील असे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. पण आजपर्यंत सुमारे २१ कोटी लसमात्रा दिल्या असताना उरलेल्या १९५ कोटी लसमात्रा सात महिन्यांत देण्यासाठी प्रत्येक महिन्यात सुमारे २७ कोटी डोस द्यावे लागतील. लसीकरणाचा सध्याचा वेग पाहता ही अशक्यकोटीतील गोष्ट आहे. त्यामुळे सरकारचा हा नेहमीप्रमाणे एक जुमलाच वाटतो. लसींच्या वेगवेगळ्या किमतींच्या धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने कोरडे ओढले आहेत त्याचे काय? सरकारने आत्ममग्नता सोडली तरच सुधारणेला वाव आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या