पणजी, आजी आणि वडिलांच्या समर्थ अभिनयाचा वारसा लाभलेले रंगभूमी, रुपेरी पडदा, मालिका या तिन्ही मनोरंजन क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अंगभूत अभिनयाच्या वैविध्यपूर्ण छटांचे समर्थपणे दर्शन घडविणारे, रसिक मनाच्या काळजावर ठसा उमटवित सातत्याने अधिराज्य गाजवणारे विक्रमवीर विक्रम गोखले यांचे जाणे चटका लावून गेले. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. स्पष्ट, सडेतोड, परखड मत आणि विचार प्रामाणिकपणे मांडणारे, त्याचप्रमाणे समाजभान असणारे सजग नटश्रेष्ठ, माणूस आणि माणुसकी जपणारा, संकटकाळी धावणारा, मदतीसाठी सदैव राहणारा माणूस म्हणूनही ते ओळखले जात.
विक्रम गोखले यांनी पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांतून आपल्या सहजसुंदर, कसदार, अंगभूत अभिनयातून रसिक मनावर कायमस्वरूपी ठसा उमटविला. दमदार संवादफेक, कसदार मुद्राभिनय, भेदक नजर आणि स्मितहास्य ही त्यांची आगळीवेगळी खासियत रसिक मनावर कायमची कोरली गेली. ‘अनुमती’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा विष्णुदास भावे तर चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आपल्या विक्रम नावाप्रमाणेच त्यांनी विविधांगी कलेद्वारे अविस्मरणीय भूमिका साकारल्या, कलेची सेवा केली. उतारवयात कलावंतांना हक्काचे घर मिळावे म्हणून भारतीय चित्रपट महामंडळाकडे जमीन दान करून त्यांनी दाखविलेले कलावंतांविषयीचे प्रेम, आपलेपणा, दूरदर्शी दानशूरपणा कधीही विसरता येणे शक्य नाही. भूमिकेच्या लांबीपेक्षा तिची खोली किती मोठी आहे याचा अभ्यास, भूमिकेतील बारकावे, त्यातील जागा यांचे निरीक्षण करून त्या भूमिकेशी एकरूप होत, म्हणूनच त्या रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचत. कायमस्वरूपी अभ्यास, चिंतन, मनन या आयुधांनी प्रत्येक शब्द शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत सहजतेने पोहोचवणारा महान कलावंत आता पुन्हा पहायला मिळणार नाही.
तरीसुद्धा त्यांनी कलाप्रांताला दिलेले योगदान, त्यांच्या कलाकृती, साकारलेल्या अनेकविध भूमिका, त्यांचे माणूसपण, समाज जागरूकता, दानत कधीच काळाला पुसता येणार नाही. विक्रम गोखले महान कलावंत आणि ग्रेट माणूस होते. विक्रम गोखले यांना अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बाल अभिनेत्री कमलाबाई गोखले या त्यांच्या आजी होत. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत यांनी १९१३ साली ‘भस्मासुर’ या चित्रपटात अभिनय केला होता. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे तर प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. म्हणजे विक्रम गोखले यांना घरातच अभिनयाचा वारसा मिळाला. मोठ्या झाडाखाली दुसरी रोपं वाढत नाहीत असे म्हणतात पण विक्रम गोखले यांनी स्वत:च्या अभिनयातून हा समज खोटा ठरवला. त्यांनी अभ्यासपूर्वक अभिनयातील कंगोरे शोधून स्वत:ची शैली व स्वतंत्र ओळख निर्माण केली. महानंदा, बाळा गाऊ कशी अंगाई, कळत नकळत, वजीर असे चित्रपट तर कमला, बॅरिस्टर, संकेत मिलनाचा, नकळत सारे घडले अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचे सामर्थ्य दाखविले. फक्त मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला ठसा उमटवला.
भूलभुलैय्या, हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, मिशन मंगल अशा अनेक चित्रपटांमधूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्यांना मुंबईत सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. राहायला जागा नव्हती तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांना मदत केली. बच्चन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना गोखले यांच्यासाठी पत्र लिहिले होते. या पत्रामुळे गोखले यांना मुंबईत सरकारी घर मिळाले. अमिताभ यांची ही मदत ते कधीच विसरले नाहीत. २०१० मध्ये ‘आघात’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. ९० हून अधिक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केल्यानंतर घशाच्या आजारामुळे २०१६ मध्ये ते अभिनयातून निवृत्त झाले. नव्या कलाकारांना सांभाळून घेणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे विक्रम गोखले यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे ही प्रत्येक मराठी, हिंदी कलाकारासाठी भाग्याची गोष्ट होती. ‘खुदा गवाह’ चित्रपटात त्यांनी बिग बींबरोबर अभिनय केला होता. त्यांच्या त्या भूमिकेची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. प्रचंड आत्मविश्वास आणि परखड स्पष्ट बोलणे यासाठी ते ओळखले जायचे. मराठी मालिकांमध्येही त्यांनी कामं केली. मोठ्या पडद्याबरोबरच छोटा पडदाही त्यांनी त्याच ताकदीने गाजवला.
‘या सुखांनो या’ सारख्या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले. काही हिंदी मालिकांमध्ये ते झळकले. आजारपणामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला, पण तरीही ते ‘सोशल मीडिया’वर सक्रिय होते. सध्याच्या मालिका, चित्रपट यांच्या कथानकावरही त्यांनी आक्षेप घेतला होता. मालिकांत काम करीत असतानाही भिकार मालिका पाहण्याचे बंद करा, असे सांगण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. कथानकाच्या दर्जावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपल्या रोखठोक स्वभावामुळे त्यांना अनेकवेळा टीकेचे धनी व्हावे लागले, पण ते आपल्या भूमिकेवर कायम राहिले. त्यांची राजकीय मतं ठरलेली होती, त्यावर ते ठाम असायचे. वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिचे समर्थन करताना त्यांनी आपली मतंही मांडली. अनेकांनी त्यांना त्याबद्दल ट्रोलही केले, पण ते त्यांच्या मतावर ठाम होते. विक्रम गोखले यांचा अभिनयात जसा हातखंडा होता, तसा त्यांचा सामाजिक कामातही सहभाग होता. आपल्या कमाईतील काही वाट्यावर समाजाचा हक्क असतो असे ते मानत. भाजपसह प्रत्येक राजकीय पक्ष स्वत:चा फायदा पाहतो, असे सांगायला त्यांनी कमी केले नाही.
‘जातीय दंगली व्होट बँकेच्या राजकारणाचा परिणाम आहेत’ असे परखड मत त्यांनी व्यक्त केले होते. देशाच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र आले पाहिजे असेही ते म्हणाले होते. परखड व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांचा कोणत्याही पुरस्कारावर विश्वास नव्हता. शासकीय पुरस्कारांनाही त्यांनी नकार दिला होता. पुरस्कार सोहळे ही फॅशन झाली असून पैसे खिशात ठेवून पुरस्कार घेणारे मी पाहिले आहेत. कोणत्याही पुरस्काराने एखादा नट चांगला आहे की नाही हे सिद्ध होत नाही, त्याचे कामच बोलते असे ते म्हणायचे. गत काही वर्षांपासून गोखले यांना मधुमेहाचा विकार होता, त्यातच श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. शुक्रवारी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे दिसले परंतु शनिवारी ती पुन्हा खालावली आणि दुपारी या चतुरस्त्र अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांना विनम्र श्रद्धांजली.