17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeसंपादकीयनिवडणुकांची रणधुमाळी !

निवडणुकांची रणधुमाळी !

एकमत ऑनलाईन

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत. तेथे आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. हिमाचल प्रदेशात ढोल वाजणे बंद झाले आहे. कारण तेथे सर्व ६८ जागांसाठी मतदान पार पडले आहे. तेथे शनिवारी कडाक्याच्या थंडीत आणि बर्फवृष्टीत सुमारे ७४ टक्के मतदान झाले. सत्ताधारी भाजप आणि प्रतिस्पर्धी काँग्रेसचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १९९० नंतर सत्तेतील पक्षाला सलग दुस-यांदा सत्ता मिळालेली नाही. भाजप ही परंपरा मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रयत्नात भाजपला यश येईल की काँग्रेस बाजी मारेल याचे उत्तर ८ डिसेंबर रोजीच्या निकालातूनच मिळेल. राज्यात २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी ७५.५७ टक्के मतदान झाले होते. राज्यात भाजप आणि काँग्रेसशिवाय आप व बसपा निवडणुकीच्या मैदानात आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मतदानानंतर भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनीही लोकशाहीच्या या उत्सवात मतदान केले.

आता गुजरातमधील निवडणुकांचे ढोल वाजू लागले आहेत. गुजरातच्या १८२ सदस्यीय विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपने बुधवारी १६० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर शनिवारी सहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने ५ मंत्र्यांसह ३९ विद्यमान आमदारांचे तिकिट कापले आहे तर काँग्रेसने दोन याद्यांद्वारे उमेदवार जाहीर करताना २१ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. निवडणूक प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे तर आम आदमी पक्षानेसुद्धा नेटाने प्रचार सुरू केला आहे. मात्र निवडणूक प्रचारात काँग्रेस कुठेच दिसून येत नाही. भाजपने स्टार प्रचारकांची यादी केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुळे भाजपला १०० आमदारांचा आकडा गाठता आला नव्हता. यंदा तर ‘आप’ही मैदानात उतरल्यामुळे बहुमत मिळविण्यासाठी भाजपला सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि नेते मतदारसंघ पिंजून काढत असताना, काँग्रेसचा एकही बडा नेता गुजरातमध्ये फिरकताना दिसत नाही.

राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेचे नेतृत्व करत आहेत तर दुसरीकडे प्रियंका गांधी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत गर्क होत्या. गुजरातमध्ये निवडणुकीचे ढोल वाजण्याआधीच पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेऊन परतले आहेत. राहुल गांधी यांनी अजून तेथे सभा किंवा रोड-शो केलेला नाही. काँग्रेसने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला असून त्याद्वारे आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. दहा लाख नोक-या, ५०० रुपयांमध्ये एलपीजी गॅस, ३०० युनिट मोफत वीज, शेतक-यांची कर्जमाफी, दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान, एमएसपीसाठी समिती व तीन लाखांपर्यंतचे कृषी कर्ज माफ तसेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलून पुन्हा सरदार पटेलांचे नाव देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची शिक्षा माफी रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही बडा नेता सहभागी होताना दिसला नाही अथवा स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देताना दिसला नाही. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपसमोर हात टेकले की काय अशी चर्चा सुरू आहे. निवडणुका या जिंकण्यासाठीच लढल्या जातात.

त्या तत्त्वासाठी, वैचारिक लढाईसाठी लढल्या जातात. निवडणूक लढताना त्यात सर्वस्व ओतावे लागते. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. यंदा तसे काही दिसत नाही. यंदा ‘आप’ही मैदानात उतरल्याने तिरंगी लढती होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला किती जागा मिळतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. ज्या संस्थांनी निवडणुकीपूर्वी जे अंदाज जाहीर केले आहेत त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले आहे. या निवडणुकीत काँग्रेसची मते ‘आप’च्या पारड्यात जाणार असे चित्र आहे. ‘आप’ची संख्या वाढून काँग्रेसची संख्या घटणार असल्याचे चित्र आहे. यामागचे कारण काँग्रेसच्या भूमिकेतच दिसून येते. आपण जेव्हा एखाद्या निवडणुकीवर पूर्ण लक्ष केंद्रित करतो आणि त्या जिंकतो, त्यावेळी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना बळ मिळते. नेत्यांचे काम कार्यकर्त्यांना बळ देणे हेच असते. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

काँग्रेसने आपला जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. हे काम याआधीच केले असते तर त्याचा परिणाम जास्त चांगला झाला असता. किमान काही जागाही वाढल्या असत्या. भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज असला तरी त्यांच्या जागा कमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भाजप जोर लावताना दिसून येत आहे. समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन, विविध प्रकल्पांची उद्घाटने ही त्याचीच उदाहरणे आहेत. मोरबी पूल दुर्घटनेनंतर भाजप बॅकफूटवर गेला असला तरी हा प्रश्न आप व काँगे्रसने उचलून धरावयास हवा होता. परंतु दोन्ही पक्षांनी ती संधी साधली नाही असे सध्या तरी दिसते. गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार असली तरी पंतप्रधान मोदी यांच्यानंतर गुजरातच्या राजकारणावर छाप सोडेल असा नेता आज तरी दिसत नाही. मोदींच्या तोडीस तोड नेता मिळत नाही असेच तेथील चित्र आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातमध्ये प्रभावी नेता न झाल्यामुळे तेथे भाजपचा पाया कमकुवत होत चालल्याचे जाणवते. निवडणुका म्हटल्या की आयाराम-गयारामचा बाजार भरतोच. तिकिट नाकारले की बंडखोरी होतेच. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर भाजपात बंडखोरी झाली.

पक्षाने तिकिट नाकारल्याने विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. असे नाराजी नाट्य प्रत्येक पक्षात होत असते. भाजपचे माजी आमदार हर्षद वसावा यांनी शुक्रवारी नांदोड जागेसाठी अपक्ष म्हणून उमेवारी अर्ज दाखल केला. नर्मदा जिल्ह्यातील नांदोड ही जागा सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. निवडणुका म्हटल्या की आश्वासनांच्या पावसाबरोबर प्रलोभनांचा पाऊस पडणे हे ओघाने आलेच! गुजरात व हिमाचल प्रदेशात मतदारांना आकृष्ट करण्यासाठी लाखो लिटर दारू व भेटवस्तंूसह १२२ कोटी रुपयांचा पाऊस पडल्याचे सांगितले जाते. दोन्ही राज्यांत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी मद्य, रोख रक्कम व भेटवस्तूंचा सुळसुळाट पहावयास मिळाला. गुजरातमध्ये ३.८६ कोटींची दारू, ९४ लाख रुपयांचे अमली पदार्थ, ६४ कोटींच्या भेटवस्तू व तेवढीच रोख रक्कम जप्त करण्यात आली. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करीत बेसुमार पैसा, मद्य व भेटवस्तूंचे वाटप केल्याशिवाय निवडणुका झाल्यासारखे वाटतच नाही!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या