20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसंपादकीयप्रतिमेचे उडाले टवके!

प्रतिमेचे उडाले टवके!

एकमत ऑनलाईन

२०१४ साली देशाच्या राष्ट्रीय राजकीय पटलावर नरेंद्र मोदी यांचा उदय झाला तेव्हा तत्कालीन यूपीए सरकार धापा टाकत होते! या सरकारला कुठल्याच आघाडीवर काहीही करता येत नाही, अशीच प्रतिमा देशातील सर्वसामान्यांमध्ये विशेषत: मध्यमवर्गीयांमध्ये दृढ झाली होती. हे सरकार प्रचंड भ्रष्टाचारी आहे, असेच वातावरण देशात तयार झाले होते व ते सत्य आहे, हा जनतेचा विश्वास बळावला होता. मोदी व भाजपने याचा योग्य अभ्यास करत त्याचा फायदा उचलण्याची अचूक राजकीय रणनीती आखली. ‘गुजरात मॉडेल’च्या गवगव्याचा आधार घेत नरेंद्र मोदी यांची प्रतिमानिर्मिती करण्यात आली. धाडसी, कठोर, विकासाची दृष्टी असणारा, शिस्तीचा भोक्ता व जनतेप्रति कळवळा असणारे एक संवेदनशील पण प्रशासनात तेवढेच कणखर नेतृत्व अशीच मोदींची प्रतिमा निर्माण करण्यात आली व त्यांना ‘मसिहा’ वगैरे ठरवण्यात येऊ लागले! या प्रतिमानिर्मितीला यश आले आणि मग मोदींनी देशातील सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेचा गड लीलया पार केला.

आता या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत व या कालावधीत बरेच पाणी पुलाखालून वाहूनही गेले आहे. दरम्यानच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भाजपने सलग दुस-या टर्मची सत्ताही प्राप्त केलीय व त्यालाही दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही राष्ट्रीय पटलावर मोदींना टक्कर देणारा तोलामोलाचा चेहरा देशासमोर आलेला नाही, हे ही सत्यच! मात्र, तरीही मोदी सत्तेची सात वर्षे पूर्ण करून आठव्या वर्षात पदार्पण करताना प्रथमच अस्वस्थ असतील कारण त्यांनीच निर्माण केलेल्या ‘मोदी है तो मुमकीन है’ या प्रतिमेचे टवके देशावर कोसळलेल्या कोरोना संकटाने उडवले आहेत. कोरोनाच्या देशातील पहिल्या लाटेत मोदींच्या थाली-टाली बजाव, दीप जलाव या इव्हेंटला देशातील सामान्यांनी प्रतिसाद दिला होता कारण त्यावेळी हे जगावरच कोसळलेलं संकट आहे, त्यात मोदींचा दोष नाही, ही जनतेची भावना हे प्रमुख कारण होते! त्यामुळे जसा जनतेने नोटाबंदीचा निर्णय प्रचंड त्रास होऊनही स्वीकारला तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेतील अवघ्या चार तासांचाही अवधी न देता लागू करण्यात आलेली कडकडीत देशव्यापी टाळेबंदीही सोसली! स्थलांतरित मजुरांचे पायीच गावाकडे निघालेले असहाय्य जथ्थे हे चित्रही पचवले!

टाळेबंदीने लागलेली आर्थिक वाटही सोसली व देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले तीन-तेराही सहन केले. रोजगार गमवावे लागल्याचे, शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाल्याचे, भविष्याबाबत निर्माण झालेल्या शंकांचे काहूर हे सगळे जनतेने पचवले कारण मोदींची ‘तारणहार’ प्रतिमा! या प्रतिमेमुळेच या संकटातून मोदी आपल्याला व देशाला नक्कीच सुखरूप बाहेर काढतील, हा जनतेचा विश्वास! तो टिकवण्याचे सर्व प्रयत्नही मोदी सरकारने पहिल्या लाटेत अतिशय चोखपणे केले! कोरोना संकटात जनतेच्या मदतीसाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करणे व निर्माण झालेले अर्थसंकट हे तात्पुरते आहे ते कोरोना संपला की, लगेच संपेल आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन जोमात उभी राहील, हा प्रचार सुरू ठेवणे हा त्याचाच भाग! तो ब-यापैकी यशस्वीही झाला आणि कोरोनावर विजय मिळविल्याचे उत्सवही साजरे झाले. इथवरही मोदींनी आपली प्रतिमा सांभाळण्यात यश मिळवले., हे सत्यच! मात्र, कोरोनाच्या देशातल्या दुस-या लाटेने या प्रतिमेचे आता टवके उडाले आहेत. कोरोनाची दुसरी लाट येणार याचा स्पष्ट इशारा मिळूनही त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष व त्यामुळे देशात निर्माण झालेली विदारक स्थिती यामुळे मोदींनी सात वर्षे जपलेल्या व उत्तरोत्तर दृढ केलेल्या त्यांच्या प्रतिमेला प्रचंड हादरा तर बसलाच आहे पण जबरदस्त तडेही गेले आहेत.

मोदी व मोदी सरकारचे देशातील व जगातील आजवरचे सहानुभूतीदारही मोदींच्या दुसरी लाट हाताळण्यातील अपयशावर उघडपणे बोलू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोदींच्या प्रतिमेलाही जबरदस्त तडाखे बसतायत आणि त्यांची गणना कोरोना हाताळण्यात अपयशी ठरलेल्या नेतृत्वात केली जाते आहे. एकवेळ हे अपप्रचार व षडयंत्र म्हणून त्याला उडवून लावले जाऊ शकतेही, जे सध्या मोदी सरकार प्राणपणाने करतेय, पण सरकारची विशेषत: नरेंद्र मोदी या ‘मसिहा’नेतृत्वाची प्रशासनावरील मांड ढिली झाली आहे, नियंत्रण सुटले आहे, याचे पुरावेच देणा-या ज्या घटना कोरोनाच्या दुस-या लाटेत देशभर घडल्या त्याने सर्वसामान्य जनतेला वास्तवाचे भान आणून दिले आहे, हे सत्य नाकारता येणार नाहीच! देशभर घडलेल्या या विदारक घटनांनी सामान्य जनता पुरती हादरून गेली आहे. ‘सगळ्या समस्यांवर एकच उत्तर असणारा अवतार, मसिहा हे केवळ कथांमध्ये घडते वास्तवात नव्हे’ याचे भान कोरोनाच्या दुस-या लाटेने देशातील जनतेला तर आणून दिलेच आहे पण खुद्द मोदी सरकारला व या सरकारच्या पाठीराख्यांनाही आणून दिले आहे. एका अर्थाने ‘मोदी ब्रँड’ला बसलेला हा जबरदस्त धक्का आहे.

मोदींनी भावविवश होण्यावर विनोद होतायत, त्यांच्या कोरोना संकट हाताळणीवर उघड टीका होतेय, सरकारच्या प्राधान्यक्रमावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण होतेय, ही भाजपसाठी कठीण परिस्थिती आहे जी हाताळताना भाजपची प्रचंड दमछाक होतेय! त्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘मोदी ब्रँड’ हे राजकारणाचे एक प्रमुख सूत्र आहे. याच सूत्राच्या आधारे विरोधकांची खिल्ली उडवत व त्यांच्यावर कडवे प्रहार करत भाजपने सत्ता प्राप्त केलेली आहे आणि अनेक प्रश्न, समस्या, संकटे निर्माण होऊनही ती टिकवली आहे. त्यामागे मोदींची प्रतिमा हेच बलस्थान आहे. त्या प्रतिमेचे टवके कोरोनाच्या दुस-या लाटेने उडविले आहेत., ही खरी मोदी सरकारची आठव्या वर्षात पदार्पण करतानाची चिंता आहे. कारण प्रतिमेचे टवके एकदा उडाले की, मग अनेक प्रश्न विचारले जातात व ते सहज उडवून लावणे शक्य होत नाही. प्रतिमानिर्मितीच्या खेळाची हीच मर्यादा आहे व आजवरचा इतिहास हाच आहे. त्यामुळेच आठव्या वर्षाचा प्रवास सुरू करताना मोदी सरकारला देशाच्या बिघडलेल्या आर्थिक आघाडीपासून परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, कृषि कायदे या सर्व अडचणींच्या मुद्यांवर उत्तरे द्यावी लागणार आहेत.

मोदींनी प्रतिमानिर्मिती करताना दाखविलेली अनेक स्वप्नं व निर्माण केलेल्या आशावादाचा फुगाच आता त्यांच्यासाठीच अडचणीचा ठरू पाहतो आहे. हा फुगा फुटला तर जनतेच्या भ्रमनिरासाने मोदींच्या प्रतिमेच्या ठिक-या उडतील व ‘आपुलीच प्रतिमा होते वैरी’ अशी स्थिती निर्माण होईल. मोदी सत्तेवर आल्यापासून प्रथमच हे घडतेय! आजवर विरोधकांचा विरोध व सर्व प्रश्न, समस्या मोदी यांनी याच बळावर मोडून काढल्या आहेत. त्यामुळेच आजच्या घडीलाही मोदींना पर्याय असणारे दुसरे समर्थ नेतृत्व राष्ट्रीय पटलावर निर्माण झालेले नाही. मग भलेही विधानसभा निवडणुकांत प्रादेशिक पक्षांनी भाजपला रोखले असले तरी त्याचा थेट परिणाम मोदींच्या वैयक्तिक प्रतिमेवर झालेला नाही. हीच ‘मोदी ब्रँड’ची आजवरची खरी ताकद आहे. सरकार आठव्या वर्षात पदार्पण करताना या ब्रँडचे टवके उडणे ही भाजपची व मोदींची खरी चिंता आहे. या ब्रँडला धक्का बसताना मोदी सरकारला प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करा, हा सुस्पष्ट इशारा मिळतो आहे. तो गांभीर्याने घेऊन सरकार कितपत आपल्या दृष्टिकोनात व कामकाजात सुधारणा करते त्यावर ‘मोदी ब्रँड’चे व पर्यायाने सरकारचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. एवढेच नाही तर त्यावरच मोदी ब्रँडसाठी आठवं वर्ष मोक्याचं की धोक्याचं? हे ही सुनिश्चित होणार., हे मात्र निश्चित!

लॉकडाऊन संदर्भात नियमावली जारी; स्थानिक प्रशासनाला अधिकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या