21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसंपादकीयबोरिसांची बोळवण !

बोरिसांची बोळवण !

एकमत ऑनलाईन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करत त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहका-यांनी एकापाठोपाठ राजीनाम्याचे सत्र सुरू केल्यावर व त्याला सत्ताधारी पक्षातील खासदारांनीही जोरदार साथ दिल्यावर कुठलाच पर्याय शिल्लक न राहिल्याने अखेर गुरुवारी बोरिस जॉन्सन यांना आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले. हा निव्वळ राजकीय संघर्षाचा परिणाम असता तर त्याची गणना देशोदेशी घडणा-या राजकीय घडामोडींमध्ये झाली असती व जॉन्सन या राजकारणाला तोंड देऊन पुन्हा उभे राहण्याची शक्यता होती. मात्र ‘ब्रेग्झिट’च्या जिवावर पंतप्रधानपदी एन्ट्री झालेल्या या नेत्याची ही ‘एक्झिट’ त्या प्रकारातील नाहीच. ‘बडे बेआबरू होके..’ अशा धाटणीतील जॉन्सन यांची ही एक्झिट म्हणजे ब्रिटनमधील हुजूर पक्ष व ब्रिटिश जनता यांनी आपली घोडचूक सुधारत त्यांची केलेली कायमची बोळवण आहे.

‘ब्रेग्झिट’च्या संघर्षातून निर्माण झालेल्या प्रतिमेचा बुरखा अवघ्या तीन वर्षांत फाटल्याने व त्यास या सर्वोच्च पदी बसलेल्या नेत्याच्या अंगभूत अवगुणांची जोड मिळाल्याने ब्रिटिश जनतेचा जो जोरदार भ्रमनिरास झाला त्याचा हा परिणाम आहे. आपली झालेली चूक लक्षात आल्यावर ती रेटून न नेता प्रामाणिकपणे मान्य करत ती सुधारण्याची तत्परता ब्रिटिश जनतेने व या जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी दाखवली यासाठी खरोखरच ब्रिटिश जनतेचे मनापासून अभिनंदन करायला हवे. त्यांच्या या कृतीने त्यांचा लोकशाही व्यवस्थेवर असणारा विश्वास व या व्यवस्थेची मूल्ये जपण्यासाठीचा त्यांचा प्रामाणिकपणा अधोरेखित झाला आहे. अन्यथा देशोदेशी लोकशाही म्हणजे आकड्यांचा खेळ बनविण्याचे प्रकार सर्रास अनुभवायला मिळत आहेत.

आपल्या देशात तर मागच्या काही काळात हे खेळ खेळून कशी सरकारे बनवली आणि पाडली जातात, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. मात्र, जे धैर्य दाखवून ब्रिटिश जनतेने आपली चूक दुरुस्त केली ते धैर्य आपल्याकडे पहायला मिळत नाहीच. त्यामुळेच लोकशाहीचा खेळ मांडण्याचे धैर्य नेतेमंडळींना येते. एवढेच नाही तर जनतेचे मौन म्हणजे आपल्या खेळाला पसंतीच असा दावा करण्याचे बळही नेतेमंडळीला प्राप्त होते. असो! त्यामुळेच ब्रिटनमधील घडामोडी वेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरतात आणि त्याची दखल घेणे जगाला आवश्यक ठरते. बे्रग्झिटच्या संघर्षात मोठमोठे दावे केल्याने निर्माण झालेल्या प्रतिमेला डोक्यावर घेत ब्रिटिश जनतेने बोरिस जॉन्सन यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते. स्वत: राजीनामा देऊन जॉन्सन यांनी थेरेसा यांचे सरकार संकटात आणले व याच प्रतिमेच्या जोरावर सर्वोच्च पदही प्राप्त केले खरे पण अवघ्या तीन वर्षांत त्यांच्या या प्रतिमानिर्मितीच्या खेळाचा फुगा फुटला कारण प्रतिमानिर्मितीच्या खेळाने प्राप्त झालेले पद टिकवण्यासाठी जी जबाबदारी उचलावी लागते तशी जबाबदारी उचलणे हे या बोरिसबाबांच्या गावीही नव्हते. आपण विक्रमी मताधिक्याने निवडून आलो म्हणजे जनतेने आपल्याला हवे तसे वागण्याचा परवाना दिला असाच जोरदार समज या महाशयांनी करून घेतला. त्यातूनच मग त्यांच्या बेताल वर्तनाची मालिका सुरू झाली.

कोरोनामुळे संपूर्ण देश टाळेबंदी सोसत असताना या महाशयांच्या कार्यालयात त्यांच्याच उपस्थितीत पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले व सर्व निर्बंध धाब्यावर बसविण्यात आले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर तरी सर्वोच्च पदाची जबाबदारी ओळखून या महाशयांनी प्रामाणिकपणे स्वत:ची चूक कबूल करायला हवी होती. मात्र, त्यांना हे भानच नसल्याने त्यांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवत आपले अंग काढून घेण्याचा खोटारडेपणा केला. ब्रिटनमधल्या प्रसार माध्यमांनी हा खोटारडेपणा उघडा करताना जॉन्सन यांची पार्ट्यातील छायाचित्रेच प्रसिद्ध केल्यावर अखेर सगळे सुटकेचे मार्ग संपल्याने एक महिन्यापूर्वीच जॉन्सन यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. त्यातून ते कसेबसे तरले. मात्र, या प्रकरणातून शहाणपणा घेण्याची सुबुद्धी त्यांना आली नाहीच! उलट आपली चूक दाखविणा-यांवर अरेरावी करण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले. ते ही त्यांच्या सहका-यांनी एकवेळ सहन केले असते पण अरेरावीबरोबरच नेतृत्वाचा खोटारडेपणा व नैतिक अध:पतन याचे सर्रास दर्शन घडत असताना या नेतृत्वाखाली काम करणे अवघडच! याच कुचंबणेला जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थ व आरोग्य खाते सांभाळणा-या ऋषी सुनक व साजिद जाविद या दोन मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन वाट करून दिली.

त्यासाठी निमित्त ठरले ते हुजूर पक्षाच्या उपप्रतोदपदी जॉन्सन यांनी केलेली ख्रिस पिंश्चर यांची नियुक्ती! या ख्रिस पिंश्चर यांच्या मद्यप्रेमाचे व त्यानंतरच्या उन्मादात त्यांनी केलेल्या लैंगिक चाळ्यांचे प्रकार चव्हाट्यावर आल्यावरही जॉन्सन यांनी चूक मान्य न करता पुन्हा खोटारडेपणाचा आधार घेत ‘आपल्याला याची पूर्वकल्पना नव्हती’ असा बचाव करण्याचा प्रयत्न केला. माध्यमांनी पुन्हा एकवार जॉन्सन यांचा खोटारडेपणा उघडा केला. त्यामुळे हुजूर पक्षातील अस्वस्थतेचा स्फोट होणे अटळ होते. याची सुरुवात सुनक व जाविद यांच्या राजीनाम्याने झाल्यावरही जॉन्सन स्वत:च्या लोकप्रियतेच्या भ्रामक उन्मादातून बाहेर आले नाहीत. या राजीनाम्यांवरही त्यांनी असभ्य प्रतिक्रिया व्यक्त करून सगळे काही आलबेल असल्याचा आव आणला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्यांच्या सहका-यांनी त्यांची साथ सोडल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले.

अर्थात अशी बोळवण झाल्यावर तरी जॉन्सन भानावर येतील ही वेडी आशाच! राजीनाम्याची घोषणा करताना केलेल्या भाषणातही या महाशयांनी आपल्या चुका प्रामाणिकपणे मान्य केल्या नाहीत. उलट आपल्या विक्रमी मताधिक्याचीच ते वारंवार आठवण करून देत होते. याचा अर्थ असाच की, लोकांनी पसंती दिली की हवे तसे वागण्यास परवानगी मिळाली, हीच या महाशयांची पक्की धारणा व हीच त्यांना कळलेली लोकशाही व्यवस्थेची मूल्यं! अशा बेताल नेत्यांना जनतेने त्वरित वेसण घालणे व स्वत:ची चूक सुधारून घेणे महत्त्वाचे ठरते. ब्रिटनच्या जनतेने आपल्या या कामात कुठलीही हयगय वा विलंब न करताना या बेताल बोरिसांची बोळवण केली हे योग्यच. त्याबद्दल ब्रिटिश जनतेचे अभिनंदन व कौतुकही! हीच सजगता लोकशाही मूल्य मानणा-या इतर देशांतील जनतेने दाखवली तर त्या देशांमधील अशा ‘बोरिसवर्गीय’ नेत्यांनाही धडा मिळेल व ख-या अर्थाने लोकशाहीत जनताच सर्वश्रेष्ठ हे सिद्ध होईल. यातूनच लोकशाही व्यवस्थेचे ख-या अर्थाने संवर्धन हाईल, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या