24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeसंपादकीयचाणक्य....संकटमोचक हरपला !

चाणक्य….संकटमोचक हरपला !

एकमत ऑनलाईन

राजकारणात तब्बल पाच दशके एक विशिष्ट भूमिका ठरवून निष्ठेने कार्यरत राहणे व त्याद्वारे पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण करणे ही बाब देशाच्या राजकारणाचा इतिहास तपासला तर विरळच. मुळात मानवी स्वभाव हा महत्त्वाकांक्षीच! जे मिळाले किंवा मिळवले आहे त्याहून जास्तीचे मिळवण्यासाठी माणूस नावाचा प्राणी सतत प्रयत्नरत असतो. म्हटलं तर हा गुणही आणि अवगुणही! गुण यासाठी की, ही महत्त्वाकांक्षा, अतृप्तता मानवाला सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा, ऊर्जा देत राहते. मात्र, महत्त्वाकांक्षेची जागा हव्यासाने घेतली की, ती असुरी महत्त्वाकांक्षा ठरते आणि मग हा हव्यास अनेक प्रताप घडवतो. हा अवगुणच! महत्त्वाकांक्षा व हव्यास यातील लक्ष्मणरेषाही अत्यंत धूसरच! त्यामुळे भल्याभल्यांना आपल्या महत्त्वाकांक्षेने हव्यासाचे रूप कधी धारण केले हे ही लक्षात येत नाही आणि मग त्यातून अनेक प्रमाद घडतात.

राजकीय क्षेत्र तर महत्त्वाकांक्षेचे नंदनवनच! त्यामुळे येथे कार्यरत प्रत्येकात महत्त्वाकांक्षा ठासून भरलेली असणे व संधी मिळाल्यावर त्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटणे हे साहजिकच! याची उदाहरणे आपल्याला गल्लीपासून दिल्लीपर्यंत पावलोपावली पहायला, अनुभवायला मिळतात. मात्र, या क्षेत्रात वावरतानाही आणि आपला पक्ष सत्तास्थानी प्रदीर्घकाळ असतानाही, या पक्षात स्वत:चे महत्त्वाचे स्थान प्राप्त असूनही आपल्या भूमिकेवर महत्त्वाकांक्षेला स्वार होऊ न देणा-याला राजकारणातला वैरागीच म्हणावा लागेल! काँग्रेस पक्षाचा असा वैरागी असणारे अहमद पटेल यांचे कोरोनाने झालेले निधन ही या अर्थाने पक्षाच्या कर्मयोगी वैराग्याची ‘एक्झिट’च ठरते! शिवाय सध्या पक्षाला अशा माणसांची प्रचंड गरज भासत असताना त्यांचे जाणे केवळ प्रचंड चटकाच लावून जाणारे नाही तर मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व असलेल्या गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांसोबत निष्ठेने काम करून त्यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार, रणनीतीकार, सल्लागार बनलेले अहमद पटेल यांना सरकारमध्ये सत्तेचे हवे ते पद प्राप्त करणे अवघड नव्हतेच! किंबहुना अनेकवेळा त्यांच्याकडे अशी पदे आपणहून चालत आली.

राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना अशी संधी न साधणे किंवा त्याला नकार देणे म्हणजे व्यवहार्यदृष्ट्या शुद्ध वेडेपणाच! अशी संधी मिळविण्यासाठी या क्षेत्रातले इतर लोक वाट्टेल त्या थराला जायला तयार असतानाच्या काळात व परिस्थितीत अहमद पटेल हा ‘वेडेपणा’ करत राहिले आणि तो ही एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर वारंवार, कित्येक दशके! आपण स्वीकारलेल्या भूमिकेवर कुठल्याही मोहाला स्वार होऊ द्यायचे नाहीच ही स्थितप्रज्ञता कायम अंगी बाळगणारे अहमद पटेल म्हणूनच राजकीय क्षेत्रासाठी ‘अपवाद’च ठरतात! अहमद पटेल हे असेच ‘अपवादात्मक’ व्यक्तिमत्त्व. त्यामुळे गुणवत्ता, राजकीय कसब, चाणाक्षपणा या सर्व बाबी असल्याने ते काँग्रेस पक्षाचे चाणक्य, संकटमोचक बनले तरी कायम पडद्यामागेच राहिले. कारण त्यांनीच स्वत:ची गांधी घराण्याचा हनुमान ही भूमिका सुनिश्चित केली होती आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते या भूमिकेवरून ढळले नाहीत.

आ. सतीश चव्हाण यांच्या विजयाची हॅट्रिक साधून महाविकास आघाडीची एकजूट दाखवून द्यावी

काँग्रेसचे चाणक्य म्हणून त्यांनी देशातील काँग्रेसजनांना राज्यसभा, लोकसभा खासदारपासून मंत्री, मुख्यमंत्री पदावर बसवले पण त्या जागी स्वत: बसण्याचा मोह मात्र त्यांना कधीच झाला नाही. विशेष म्हणजे अंतर्गत पक्षीय राजकारणात महत्त्व कमी करण्याचा अनुभव पचवून पुन्हा आपले स्थान प्राप्त केल्यावरही अहमद पटेल यांना आपल्या भूमिकेत ‘व्यवहार्य’ बदल करण्याचा मोह शिवला नाहीच! असे अनुभव पचवूनही ते आपल्या स्वीकारलेल्या भूमिकेवर ठामपणे कायम राहिले. शिवाय आपल्याला आलेल्या अनुभवाबाबत त्यांच्या मनात ना कटुता होती, ना अढी, ना शल्य! त्यामुळे त्यांनी कधी स्वत:ला सोसाव्या लागलेल्या अनुभवांचे भांडवलही केले नाही, की बाजार मांडत मळमळ व्यक्त केली नाही. शेवटपर्यंत ते शांतपणे, निष्ठेने पक्षासाठी कार्यरत राहिले! काँग्रेससारख्या प्रचंड विस्तार असणा-या पक्षात अचूक व्यवस्थापन ही प्रचंड कौशल्याचीच बाब! अहमद पटेल यांच्या अंगी हे कौशल्य ठासून भरलेले होते आणि त्यामुळेच किमान चार दशके त्यांनी या प्रचंड मोठ्या पक्षाचे व्यवस्थापन अक्षरश: एकहाती सांभाळले.

एवढेच नाही तर आपला पक्ष व आपल्या पक्षाचे सरकार यातील समन्वय ढळणार नाही, ही तारेवरची कसरतही त्यांनी कायम यशस्वी करून दाखवली. महाराष्ट्रात विभिन्न विचारधारा असतानाही सर्व राजकीय पंडितांना धक्का देत सत्तेवर आलेले तीन पक्षांचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे अहमद पटेल यांच्या राजकीय कौशल्याचा सर्वांत ताजा व मोठा पुरावा! या सरकारच्या स्थापनेचा घोळ प्रचंड वाढत चाललेला असताना व गोंधळ, अस्वस्थता निर्माण झालेली असताना सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी ही जबाबदारी अहमद पटेल यांच्याकडे सोपवली आणि त्यांनी ती आपले राजकीय कौशल्य पणाला लावून यशस्वीपणे पार पाडली. नुकतीच या ‘राजकीय चमत्कार’ ठरलेल्या प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आणि त्याचवेळी या प्रयोगाच्या शिल्पकाराची ‘एक्झिट’ झाली. हा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल! आणीबाणी मागे घेतल्यानंतर १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला देशात मोठा पराभव स्वीकारावा लागला असताना गुजरातच्या भरूच मतदारसंघातून ६४ हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत खासदार म्हणून निवडून आलेल्या अहमद पटेल यांचा अवघ्या २६व्या वर्षी राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला होता.

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

त्यानंतरच्या काळात त्यांना राजकीय प्रवासात कधी मागे वळून पहावे लागले नाही की, प्रवाहाबाहेर लोटले जाऊन थांबावे लागले नाही. याचा अर्थ काँग्रेस पक्षात प्रवाह बदलले नाहीत असा नाहीच! गांधी घराण्याच्या प्रत्येक पिढीसोबत पक्षातील प्रवाह प्रचंड बदलले, मात्र अहमद पटेल आपल्या भूमिकेशी कायम निष्ठावान राहिले आणि त्यामुळेच तीन पिढ्यांचे विश्वासू शिलेदार राहिले. कदाचित यामुळेच सोनिया गांधी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना काँग्रेसचा ‘कॉम्रेड’ गेला, अशी भावना व्यक्त केली. तीन वेळा लोकसभा व पाच वेळा राज्यसभा सदस्य राहूनही अहमद पटेल यांनी एकदाही मंत्रिपद स्वीकारले नाही, उलट त्याला नम्रपणे नकारच दिला. पक्ष संघटन व गांधी घराण्याशी अढळ निष्ठा हीच भूमिका त्यांनी प्रथमपासून स्वीकारली व शेवटपर्यंत ते याच भूमिकेत वावरत राहिले. सत्तेचा व त्याद्वारे होणा-या लाभाचा मोहच एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर होऊ नये, हे असे जगातले एकमेव उदाहरण ठरावे! खरे तर काँग्रेस पक्षाला आज मोदी-शहा या जोडीला टक्कर देण्यासाठी अहमद पटेल यांच्यासारख्या प्रचंड निष्ठावान व त्या बरोबरच राजकारणातला चाणक्य असणा-या व्यक्तींची प्रचंड गरज आहे.

मात्र, नियतीने मोक्याच्या क्षणी घात केला व त्यांना पक्षापासून, गांधी घराण्यापासून हिरावून नेले. अहमद पटेल यांचे जाणे पक्षात प्रचंड मोठी पोकळी निर्माण करणारेच आहे. पक्षाचे हे नुकसान नजीकच्या काळात तरी भरून न निघणारेच! काँग्रेसच्या या निष्ठावान चाणक्याला, संकटमोचकाला ‘एकमत’ची भावपूर्ण श्रद्धांजली!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या