29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसंपादकीयसन्मानाला गालबोट !

सन्मानाला गालबोट !

एकमत ऑनलाईन

आताशा भारतीय जनमानसास काय होतेय, हे न कळावे अशीच स्थिती सर्वत्र दिसते आहे. क्षेत्र कुठलेही असो आणि बाब कुठलीही असो, ती ज्या सामान्यपणे घेतली जाणे अपेक्षित आहे तशी ती घेतली जात नाहीच! त्यावर वाद होतात, त्यात खोट शोधण्याचाच जीवापाड प्रयत्न होतो, अंतस्थ हेतू वेगळेच असल्याचा दावा, आरोप व प्रचार होतात. त्यातच आता प्रत्येकाच्या हाती समाजमाध्यमाचे अस्त्र असल्याने तर हे वाद कमालीचे टोकदार होतात आणि मग त्यातून ‘आपले’ व ‘तुमचे’ हे विखारी युद्ध सुरू होते. त्याच्या स्तरावर भाष्य करणेही अक्षरश: किळसवाणे व शिसारी आणणारेच! मात्र, वाद रंगवणा-यांना त्याचे काहीच सोयरसूतक असत नाही कारण ते भानच सध्या हरपून बसलंय!

येथे कोणाही एका बाजूवर दोष ठेवण्याचा अजिबात हेतू नाही कारण टाळी एका हाताने वाजतच नाही तर असंख्य हातांनी वाजते. या अत्यंत निचांकी स्तरावर रंगणा-या वादात ज्यांना ओढले जाते त्यांना या प्रकाराने किती क्लेश होत असेल, याचा विचार तर या वादात होतच नाही पण ज्यांच्यावर आपण आज ‘आपले व तुमचे’ शिक्के मारतोय त्यांना आपण सगळेच कालपर्यंत डोक्यावर घेवून नाचत होतो, याची आठवणही विखारी युद्ध रंगवणा-यांना रहात नाही, हे समाज म्हणून आपले दुर्दैवच! अर्थात ही प्रवृत्तीही अकारण निर्माण झालीय असे नाही, हे सत्यच! राजकारणाने राजकीय क्षेत्र सोडून सामान्यांच्या जीवनाचा एकूण एक भाग व्यापून टाकण्यस सुरूवात केल्याचाच हा परिणाम आहे.

राजकीय स्वार्थापोटीच या ‘आपले व तुमचे’च्या विखारी युद्धाला सातत्याने खतपाणी घातले जाते आणि म्हणूनच एरव्ही ज्या सर्वोच्च सन्मानांच्या घोषणांवर आनंदाच्या, समाधानाच्या व कृतार्थतेच्या प्रतिक्रिया उमटायच्या तेथे हल्ली विखारी फुत्कार आणि मन विषण्ण करून टाकणारे वाद उमटतात. समाज म्हणून आपण कोणत्या दिशेला जातो आहोत? हा प्रश्नच या विखारी युद्धाच्या ज्वरात कुणाच्या मनाला शिवतच नाही, हे दुर्दैवच! भलेही त्याचा दोष राजकारणावर लावला जातो व स्वत:च्या वर्तनाचे सोयीस्कर समर्थन केले जाते पण आपण या देशाचे नागरिक म्हणून, समाजाचे घटक म्हणून एवढे मेंदू गहाण ठेवून वाहवत का जातोय? हा प्रश्न अनुत्तरीतच! त्याचे उत्तर मात्र कुणीही प्रामाणिकपणे स्वत:ला विचारत नाही किंवा असा प्रश्न स्वत:ला विचारावा असे कुणाला वाटत नाही, हेच आपल्या प्रगल्भतेचे व परिपक्वतेचे दुर्दैव!

असाच प्रकार आपल्या हयातीतच आपल्या अभिनय कौशल्याने दंतकथा बनलेल्या व रसिक चाहत्यांनी ‘देवत्व’ बहाल केलेल्या ‘थलैवा’ रजनीकांतबाबत घडतो आहे आणि निमित्त आहे ते या सुपरस्टारला जाहीर झालेल्या फाळके पुरस्काराचे! एरवी रजनीकांतला फाळके पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत स्वाभाविक ठरावी अशीच घटना. रजनीकांतने कित्येक दशकांपासून भारतीय प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची जी मोहिनी घातली आहे व आजही ती कायम आहे, हे पाहता अशा कलाकारास चित्रपटसृष्टीतील सर्वाेच्च सन्मान मानला जाणारा फाळके पुरस्कार जाहीर झाल्यावर त्याच्या चाहत्यांना अत्यानंद होणे तर साहजिकच पण त्याच्या कारकिर्दीची तटस्थ समीक्षा करणा-यांनाही समाधान वाटणे योग्य ! मात्र नेमके ‘टायमिंग’ आडवे आले कारण सध्या पाच राज्यातील व त्यातल्या त्यात तामिळनाडू, प. बंगाल व केरळ या तीन प्रमुख व मोठ्या राज्यातील विधानसभा निवडणूकांचा ज्वर टिपेला आहे!

त्यामुळे साहजिकच तामिळनाडूत अण्णाद्रमुकच्या नौकेत मिळेल ती जागा पकडून प्रवास करू पाहणा-या भाजपने ही नौका पार व्हावी यासाठीच ही पुरस्काराची खेळी केल्याचा आरोप झाला. थेट पत्रपरिषदेतही केंद्रीय मंत्री जावडेकरांना या प्रश्नाचा सामना करावा लागला व त्यावरून ते संतापलेही. मात्र, केंद्रात सत्तेवर असणा-या भाजपला यातील सत्यांश नाकारता येणार नाहीच कारण याच भाजपने रजनीकांत यांना राजकीय अखाड्यात उतरवण्याचे केलेले पराकोटीचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीतच! मनोरंजन क्षेत्रातील नाव कमावलेल्या कलाकारांना आपल्या पक्षाच्या गळाला लावून त्यांच्या लोकप्रियतेचा निवडणुकीत राजकीय फायदा उचलण्याचा ‘फंडा’ आजवर सर्वच राजकीय पक्षांनी मुक्तहस्ते वापरला आहेच. त्यामुळे कोणी एकमेकांकडे बोट दाखविण्याचे कारण नाहीच.

रजनीकांत यांनी तर वेळीच विवेक वापरून ‘राजकारण आपला प्रांत नाही, आपण भले व आपले काम भले’, अशी स्पष्ट भूमिकाही जाहीर करून टाकली आहे. मात्र, तरीही त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्याच्या टायमिंगवरून वाद निर्माण झाला व या पुरस्काराला गालबोट लागले. देशातल्या सध्याच्या राजकारणाचा स्तर पाहता हे ही अपेक्षित! त्याकडेही आपण ‘हे होणारच’ म्हणून कानाडोळा करू पण हे प्रकरण एवढ्यापुरते न राहता समर्थक व विरोधकांनी आपल्या विखारी युद्धाने ते ज्या स्तरावर नेवून ठेवले ते पाहता रजनीकांत यांना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद नव्हे तर प्रचंड क्लेश झाला असणार हे उघडच! पुरस्कार जाहीर करण्याच्या टायमिंगमध्ये राजकीय लाभाचा हेतू असू शकतो, हे नाकारता येणार नाही, हे खरे, पण त्या एका बाबीपोटी या पुरस्काराचे विखारी युद्धाने एवढे वाभाडे हीन पातळीवर जावून काढणे कितपत योग्य?

हा रजनीकांत यांनी आयुष्यभर केलेल्या मेहनतीचा, श्रमाचा, संघर्षाचा अवमानच होत नाही का? या विखारी युद्धाने या गुणी व मेहनती अभिनेत्याची कारकीर्दच आपण मातीमोल ठरवत आहोत, याचे भान युद्धात वाहवत चाललेल्यांनी ठेवायला नको का? अभिनेता म्हणून रजनीकांतचे मोठेपण, त्याची चाहत्यांवर असणारी जादू, त्याने कित्येक दशके सातत्याने प्रेक्षकांचे केलेले मनोरंजन व चाहत्यांनी देवत्व बहाल केल्यावरही अत्यंत प्रामाणिकपणे स्वत:चे पाय जमीनीवरच ठेवण्याचे अपवादानेच बाळगलेले सामान्यपण याचा प्रतिवाद करणे किंवा त्याचा महिमा नाकारणे कोणालाच शक्य नसताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून राजकीय चिखलफेकीत स्वत:ही सामील व्हायचे आणि रजनीकांतलाही बळजबरीने बुडवायचे, ही कोणती प्रवृत्ती आपण पोसतो आहोत? हा खरा प्रश्न! राजकारणाने सध्या प्रत्येक क्षेत्र व्यापले आहे, हे मान्यच पण म्हणून ज्याने ख-या अर्थाने ‘महानायक’ हे बिरुद प्राप्त केले आहे, त्याची कारकीर्दच राजकारणापोटी मातीमोल ठरवायची का?

राजकारण्यांनी भलेही त्यांच्या लाभ-हानीच्य समीकरणापोटी चिखलफेक केली तरी त्यात अभिनेता म्हणून रजनीकांतला कालपर्यंत डोक्यावर घेवून नाचणा-या सामान्य प्रेक्षकांनी, रसिकांनी, समिक्षकांनी रजनीकांतची पुरस्कारासाठीची योग्यता, त्याची कारकीर्द एका क्षणात मातीमोल ठरवून या ‘आपले व तुमचे’च्या विखारी युद्धात सहभागी होऊन आपणही चिखलफेक करावी का? दुर्दैवाने सध्या हेच घडतेय आणि हे फक्त रजनीकांत यांच्याच बाबतीत घडलेय असे नाही तर इतरही अनेकांच्या बाबतीतही सातत्याने घडतेय. समाज दुभंगण्याचे हे लक्षण आहे व त्याचेच भान नेमके हरपत चालले आहे, आपण विखारी युद्धाच्या ज्वराने पुरते पछाडलो जातो आहोत. त्याने दोष नसण-यांना क्लेश सहन करणे भाग पडते आहे व ते तो सहनही करतायत. मात्र, याचा परिणाम समाजावर व पर्यायाने देशावर काय होणार? याची तमा ना राजकारण्यांना आहे ना विखारी युद्धात आकंठ बुडालेल्या समाजातील घटकांना, हेच या घडीचे दुर्दैव!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या