23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसंपादकीय‘चिमणी’ची ‘मस्क’री !

‘चिमणी’ची ‘मस्क’री !

एकमत ऑनलाईन

जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती असणा-या एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटरच्या चिमणीवर आपला मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. त्यासाठी मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्स एवढी किंमत मोजली. त्याबाबत जगभर आश्चर्य व्यक्त होणे साहजिकच! या खरेदी कराराची घोषणा झाल्यानंतर ट्विटरचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्या डोळ्यांत अश्रू आले. अर्थातच ते आनंदाश्रू नव्हते की, आपली नोकरी जाणार या शक्यतेने झालेले दु:ख नव्हते तर सध्या जगातील सर्वांत लोकप्रिय असलेल्या ‘ट्विटर’च्या व्यासपीठाच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या आशंका हेच कारण त्यामागे होते. मस्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उदोउदो करत ट्विटरच्या चिमणीवर ताबा मिळवण्याच्या आपल्या कृतीचे समर्थन करत असले तरी त्यांच्यातील अतिमहत्त्वाकांक्षी उद्योगपतीने व्यावसायिक हिशेब घालूनच हा खरेदी व्यवहार केलेला आहे, हे सुस्पष्टच! त्यामुळे मस्क यांनी चिमणीवर ताबा मिळवण्याच्या घेतलेल्या निर्णयामागे नेमका त्यांचा अंत:स्थ हेतू काय? याबाबत शंका उपस्थित झाल्याशिवाय रहात नाहीतच.

मस्क हे नव्या व बदलत्या पिढीतील सर्वांत यशस्वी व तेवढेच प्रचंड महत्त्वाकांक्षी उद्योगपती आहेत. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, आपल्याला हवी तशी धोरणे बनवून घेण्याचे कौशल्य सध्या जगातील नव्या पिढीच्या उद्योगपतींनी प्राप्त केलेले आहे. जग त्याचा वारंवार अनुभव घेतेच आहे. या पिढीतील मस्क हे सर्वांत यशस्वी उद्योजक आहेत कारण ते आपल्या पिढीच्या उद्योगपतींपेक्षा दोन पावले पुढे आहेत. त्याची झलक त्यांनी यापूर्वीच बोलेव्हिया या अमेरिकी खंडातील देशात दाखवलेली आहे. या देशात लिथियमचे प्रचंड साठे आहेत. विजेवर चालणा-या मोटारींची निर्मिती करणा-या ‘टेस्ला’ या आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी मस्क यांना बॅट-यांमध्ये वापरल्या जाणा-या लिथियमच्या साठ्यांवर आपला कब्जा निर्माण करणे आवश्यक होते.

मात्र, त्या देशातील तत्कालीन सरकारच्या धोरणांचा त्यात अडसर निर्माण झाला. मस्क यांना साठ्यांवर ताबा मिळवणे शक्य होईना. त्यासाठी मग मस्क यांनी थेट त्या देशातील विरोधी पक्षांनाच हाताशी धरले आणि सरकारविरोधात रान उठवले जाईल याची व्यवस्थाच करून टाकली. त्यात ते यशस्वीही झाले आणि त्यांना सोयीची राजवट त्या देशात आली. हा इतिहास आठवण्याचे कारण हेच की, मस्क यांचे कार्यक्षेत्र नसलेल्या उद्योगात त्यांची जागी झालेली आवड! बरं ही आवड केवळ चिमणीच्या महतीपोटी आहे असे म्हणावे तर प्रत्यक्षात ते तसे दिसत नाही. चिमणीवर आपला मालकी हक्क असावा, हीच मस्क यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी त्यांनी अलीकडेच ‘ट्विटर’चे ९.२ टक्के समभाग खरेदी केले होते आणि त्याची माहिती बाजारपेठ नियंत्रकास कळविणे त्यांना गरजेचे वाटले नव्हते. या खरेदीनंतर त्यांना ट्विटरच्या संचालक मंडळात आपसूक स्थान मिळाले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला व सध्या त्याबाबत चौकशी सुरू आहे.

अशा पार्श्वभूमीतच मस्क यांनी ट्विटरच्या सेन्सॉरशिपच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आणि ट्विटरची खरेदी करण्याची घोषणा केली. त्यांचा हा निर्णय वरवर धक्कादायक किंवा ते दाखवतात त्या स्वभावानुरूप वाटत असला तरी मस्क यांचा आजवरचा प्रवास पाहता त्यामागे त्यांचा नक्कीच वेगळा हेतू व तेवढीच वेगळी महत्त्वाकांक्षा असण्याची शक्यता जास्त आहे. महिन्याला ३० कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्ते, पस्तीसहून अधिक भाषांद्वारे होत असलेले संदेशवहन, रोज होणा-या ‘ट्विट’ची संख्या ४० कोटींहून अधिक व या माध्यमावर असणा-यांचे कोट्यवधी फॉलोअर्स असा सगळा ट्विटरच्या चिमणीचा प्रचंड मोठा व्याप आहे. शिवाय देशोदेशीचे बहुसंख्य राजकीय नेते या माध्यमाच्या आकंठ प्रेमात बुडालेले आहेत व आपल्या राजकीय हेतू व महत्त्वाकांक्षांसाठी या माध्यमाचा अगदी मुक्त वापर करत आहेत. थोडक्यात ट्विटरची चिमणी ही सध्या दबावगट निर्माण करण्याचे प्रिय साधन बनले आहे. त्याचा वापर करून काय प्रताप घडविता येतो हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील आपल्या पराभवानंतर जगाला दाखवून दिले आहेच! व्हाईट हाऊसवरील हल्ल्यानंतर त्यासाठी ट्रम्प यांचे चिथावणीखोर ट्विट त्यास कारणीभूत ठरल्याने ट्विटरने त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली होती.

विशेष म्हणजे मस्क यांनी त्यावेळी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत विरोध व्यक्त केला होता. असो! मूळ मुद्दा हा की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जयघोषाच्या आडून या समाजमाध्यमांचा स्वत:च्या हेतूंसाठी कसा वापर केला जातो, ही बाब जगापासून आता लपून राहिलेलीच नाही. त्यामुळे मस्क यांच्या चिमणीवर मालकी मिळविण्याच्या हेतूवर जशी शंका उपस्थित होते तशीच शंका आता खाजगी कंपनी बनलेल्या भविष्यातील पारदर्शी व निरपेक्ष वाटचालीवरही उपस्थित होतेच! मस्क यांनी चिमणीवर ताबा मिळवण्याचा अर्थ हा त्यांच्याकडे एक नवा बँ्रड येणे एवढाच नाही तर या माध्यमावरील संपूर्ण डेटावर मस्क यांचे नियंत्रण निर्माण होणे आहे. ही माहिती मस्क यांना देशोदेशीचा राजकीय कल, नागरिकांच्या भावना व त्यांचा दृष्टिकोन कळण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्याचा मस्क यांच्यातील अतिमहत्त्वाकांक्षी उद्योगपती वापर करणार, हे सुस्पष्टच! मात्र, हा वापर नेमका कसा असणार? ही शंका पोटात भीतीचा गोळा निर्माण करणारीच! मस्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना माझा कट्टर विरोधकही ट्विटरवर कायम असला पाहिजे, असा दावा करत असले व ते ऐकायला अतिशय गोड वाटत असले तरी अशा स्वैराचारी मुक्त स्वातंत्र्याने काय प्रमाद घडतात किंवा घडविले जातात याचा अनुभव देशोदेशीची सर्वसामान्य जनता सध्या घेतेच आहे.

हव्या त्या संदेशांचा प्रचार, प्रसार करणे व नको त्या संदेशांविरोधात समर्थकांच्या पाळीव झुंडी सोडणे, अपप्रचाराचे रान उठवणे, असे सगळे उद्योग या माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बुरख्याआड सर्रास सुरू आहेत. त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न आता उशिराने का असेना पण सुरू झाले आहेत. मात्र, मस्क यांना असे नियंत्रण मान्य नाहीच, हे त्यांच्या आजवरच्या भूमिकेतून स्पष्ट होते. मस्क यांच्या ट्विटरबाबतच्या धोरणांचा अद्याप त्यांनी पारदर्शी खुलासा केलेला नाही, हे ही येथे लक्षात घ्यावे लागते. त्यामुळे मस्क यांच्या ताब्यात गेलेली चिमणी आता मुक्त व्यासपीठ राहील का? तेवढ्याच एकमेव हेतूने कार्यरत राहील का? अशा शंका निर्माण होणे साहजिकच! मस्क यांनाही त्याची पूर्ण कल्पना असेलच. त्यामुळे त्यांनी हा सगळा व्यवहार पैशाच्या जोरावर चिमणीशी झालेली ‘मस्क’री ठरणार नाही, याची ग्वाही देत आपली उद्दिष्टे जगासमोर स्पष्ट करून निर्माण झालेल्या शंकांचे पूर्ण निरसन करायला हवे, तरच त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्याची सत्यता जगाला पटेल!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या