24 C
Latur
Monday, June 21, 2021
Homeसंपादकीयअभिजात, भावस्पर्शी स्वर!

अभिजात, भावस्पर्शी स्वर!

एकमत ऑनलाईन

‘‘माझ्या गाण्यावर रफी साहेबांच्या गायकीचा प्रभाव आहे. रफी साहेबांची गाणी ऐकताना प्रेयसी तुमच्या कानाजवळ येऊन तुम्हाला साद घालतेय की काय, असं वाटतं! याचे प्रमुख कारण हे रफी साहेबांचे भावस्पर्शी स्वर! रफी साहेबांचे स्वर हे एवढे भावस्पर्शी का ठरतात? कारण ते स्वत: एक सुहृदयी व्यक्ती होते. म्हणूनच एक चांगला गायक होण्यासाठी तुम्ही अगोदर एक चांगला व्यक्ती असायला हवं! चांगल्या व्यक्तीचा चांगुलपणा त्याच्या कामात, कलेत, साधनेत हमखास उतरतो आणि कला बहरत जाते,’’ हे बोल आहेत श्रीपथी पंडिताराध्यलू बालसुब्रमण्यम अर्थात एस. पी. बालसुब्रमण्यम् ऊर्फ बालू यांचे! या विचारांशी हा कलाकार आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे बांधील राहिला आणि म्हणूनच गायकीची कुठली पार्श्वभूमी नसताना, शिक्षण घेतलेले नसताना, रियाज नसताना, कुणी गॉडफादर नसताना, एवढेच काय स्वत: कधी पार्श्वगायक होण्याचा साधा विचारही केलेला नसताना हा कलाकार विक्रमादित्य गानसम्राट ठरला.

या कलाकाराच्या भावस्पर्शी स्वरांनी एवढी प्रचंड मोहिनी, जादू निर्माण केली की, रसिकांनी, चाहत्यांनी अत्यंत प्रेमाने त्यांना ‘पादमू निला’ म्हणजे गाणारा चंद्र अशी उपाधी बहाल केली. हा कलाकार एवढा सच्चा, एवढा विनम्र आणि आपल्या कामाबाबत एवढा प्रामाणिक होता की, त्यांच्या या गुणांमुळे गायकीच्या व आयुष्याच्या प्रवासात अनेक विश्वविक्रम सहजरीत्या घडून गेले. हे विक्रम घडविण्याचे ध्यानीमनी नसतानाही निव्वळ कामावरील निष्ठेतून, सच्चेपणातून या कलाकाराने स्वत:च्याही नकळत हे विक्रम घडविले. याबाबतचा एक घडलेला किस्सा याचा पुरावाच! २००० साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन भारतभेटीवर आलेले होते आणि या दौ-यात त्यांनी भारतातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या मान्यवरांची भेट घेतली.

त्यावेळी तिथे गानसम्राज्ञी लता मंगेशकर व इतर कलाकारही हजर होते. लता मंगेशकर या नावाची जगभर जादू असल्याने साहजिकच बिल क्लिंटनही गानसम्राज्ञीच्या भेटीसाठी उत्सुक होते. ही भेट झाली आणि बोलता-बोलता किती गाणी गायिली? अशी चर्चा झाली. लता मंगेशकर यांनी आपल्या गाण्यांची संख्या सांगितल्यावर बिल क्लिंटन पुरते भारावून गेले व त्यांचे कौतुक करू लागले. तेव्हा त्यांना थांबवत लता मंगेशकर यांनी तेथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे इशारा करत सांगितले की, माझ्यापेक्षा जास्त गाणी यांनी गायिली आहेत. ती व्यक्ती होती. एस. पी. बालसुब्रमण्यम! वयाच्या २० व्या वर्षी ध्यानीमनी नसताना केवळ एस. पी. कोदान्तापानी या संगीत दिग्दर्शकाने आग्रहाने गायला भाग पाडले म्हणून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेला व इंजिनीअर होण्याचेच स्वप्न बाळगणारा हा तरुण थेट चित्रपटाचा पार्श्वगायक झाला आणि सच्चेपणा, कामावरील नितांत श्रद्धा व प्रामाणिकपणा या चित्रपटसृष्टीत अत्यंत विरळ व अव्यवहार्य ठरणा-या गुणांसह कार्यरत राहून एकापाठोपाठ एक विक्रम रचत थेट विक्रमादित्य बनला! तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, मराठी अशा देशातील १६ भाषांमध्ये एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी ४० हजार गाणी गायिली आहेत.

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

बारा तासांमध्ये २१ गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रमही ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण देऊन सन्मानित केलेले आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वच प्रतिष्ठेच्या पुरस्कारांवर तर त्यांनी सहजच नाव कोरलं होतं! मात्र, एक देश असूनही केवळ भाषिक अंतरामुळे एखादा महान कलावंतही लोकांपासून कसा अनभिज्ञ राहतो याचे सर्वांत समर्पक उदाहरण म्हणजे एस. पी. बालसुब्रमण्यम्! के. बालचंदर या दिग्दर्शकाला आपला ‘मारो चरित्र’ हा चित्रपट हिंदीत आणण्याची तीव्र इच्छा झाली नसती तर ‘एक दूजे के लिये’ तुमच्या-आमच्या भेटीला आला नसता व या चित्रपटात कमल हसनचा आवाज म्हणून त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा विरोध डावलून एस. पी. बालसुब्रमण्यम यांचाच आग्रह धरला नसता तर हा आवाजही देशाच्या कानाकोप-यात पोहोचला नसता.

मात्र, एस. पीं.च्या सच्चेपणाने व स्वरातील भावस्पर्शाने ही जादू घडवली आणि हा संगीतातील कोहिनूर झळाळून जगासमोर आला. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीने सहजासहजी हा कोहिनूर स्वीकारलाच नाही आणि या भल्या माणसाने आयुष्यात कधी त्याबाबत आदळआपट तर सोडाच पण साधी तक्रार केली नाही की, खंत वाटून घेतली नाही. त्यामुळे ‘एक दूजे के लिये’ मधील एकूण एक गाणी सुपर-डुपर हिट होऊनही एस. पीं.च्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीला सोनेरी वळण लागण्यासाठी तब्बल ९ वर्षे प्रतीक्षा व संघर्ष करावा लागला. सलमान खानच्या उदयाने ‘मैने प्यार किया’पासून एस. पीं.च्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीला सोनेरी वळण लागले व ते सलमानचा आवाज बनले! अर्थात हे सगळे लौकिकार्थाने आपल्यासाठी! एस. पी. बालसुब्रमण्यम् यांच्या अभिजात व भावस्पर्शी स्वराला या ओळखीची गरज नव्हतीच कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एम. जी. रामचंद्रन यांच्यापासून कमल हसन, रजनीकांतपर्यंतच्या सर्व सुपरस्टारचा ते आवाज बनलेले होते.

‘न्याय : द जस्टीस’ : शक्तीकपूर एनसीबी अधिकारी आणि सुधा चंद्रन सीबीआय अधिकारी साकारणार

कमल हसन यांच्या तमिळ चित्रपटांचे तेलगू रिमेक करताना तर बालसुब्रमण्यम् यांच्या आवाजात संवादांचे डबिंग केले जायचे! त्यांनी हे कामही तेवढ्याच तन्मयतेने केले! त्यामुळे जरी हिंदी चित्रपटसृष्टीने एस. पी. बालसुब्रमण्यम् यांना स्वीकारताना प्रचंड व्यावसायिक खळखळ केली, हात आखडता घेतला तरी आलेल्या प्रत्येक संधीला तेवढ्याच निष्ठेने स्वीकारून, प्रामाणिक न्याय देऊन या कलासक्त कलाकाराने प्रत्येक संधीचे अक्षरश: सोने करून टाकले! आपल्या अभिजात, सच्चा व भावस्पर्शी स्वराने प्रत्येक गाणं अजरामर करून टाकलं! एस. पी. बालसुब्रमण्यम् यांनी गायिलेली गाणी असणारे काही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशीही ठरले, मात्र, त्यातील त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालतात, आपलं अढळस्थान कायम ठेवतात! एस. पी. बालसुब्रमण्यम् यांच्या अजरामर गाण्यांची यादी प्रचंड मोठी आहे.

त्यांच्या ५० वर्षांच्या नॉनस्टॉप, ऊर्जावान कारकीर्दीची नोंद करायची तर जागा अपुरी पडेल. मात्र, त्यांनी ज्या कलाकाराला आवाज दिला त्या कलाकाराचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येताच त्याचा आवाज म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम यांचेच स्वर कानात घुमायला लागतात, हेच या अभिजात, कलासक्त, भावस्पर्शी गायकाचे निर्विवाद श्रेष्ठत्व! शास्त्रीय संगीत तर लांबच पण गायकीचेही कुठलेच प्राथमिक धडेही न गिरवता केवळ निसर्गदत्त देणगीवर विक्रमादित्य ठरलेला हा गायक चित्रपटसृष्टीसाठी चमत्कारच! मात्र, हा चमत्कार घडला, टिकला, अजरामर झाला तो या कलाकाराच्या सच्चेपणाने, प्रामाणिकतेने, कामावरील प्रचंड निष्ठेने व अमर्याद कष्ट करण्याच्या तयारीसह कायम जमिनीवरच पाय घट्ट रोवून राहण्याच्या सद्गुणामुळेच! आजच्या मनोरंजन क्षेत्रातील उथळ बाजारूपणात असा कोहिनूर विरळाच!

देवेंद्र फडणवीस यांना भेटणं अपराध आहे का ? -संजय राऊत

कोरोनाने या गाणा-या चंद्राला ग्रहण लावले व अकाली हा प्रवास थांबला तरी या भावस्पर्शी स्वरांनी देशातील कित्येक पिढ्यांना तृप्त करून टाकले आहे व येणा-या अनेक पिढ्यांनाही हा अभिजात स्वर तृप्त करत राहील, प्रेरणा देत राहील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चांगुलपणावर विश्वासाचे बळ देत राहील! या असामान्य, विक्रमादित्य ठरलेल्या अजरामर गायकाला ‘एकमत’ची भावपूर्ण आदरांजली!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या