37.1 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसंपादकीयनेमेचि येतो मग अवकाळी..!

नेमेचि येतो मग अवकाळी..!

एकमत ऑनलाईन

राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे आणि आताशा हे संकट आकस्मिक किंवा अवचित न राहता सातत्याचे झाले आहे! हे संकट म्हणजे अवकाळीचा तडाखा. खरे तर व्यवहाराच्या भाषेत कधी तरी येणारे हे संकट म्हणून बेमोसमी पावसाला अवकाळी असे संबोधले जाते खरे पण मागच्या दशकभरात राज्यातील पावसाचा पॅटर्न व वरुणराजाचा वाढता लहरीपणा यामुळे अवकाळीचे संकट आता नित्याचेच बनले आहे. त्यामुळे आता ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ ही उक्ती बदलून आता ती ‘नेमेचि येतो मग अवकाळी’ अशीच करावी लागणार अशीच स्थिती निर्माण झाली आहे. अगदी गेल्याच महिन्यात म्हणजे नववर्षाच्या प्रारंभालाच अवकाळी पावसाने राज्याला जोरदार तडाखा दिला होता आणि काढणीला आलेले सोयाबीन व इतर खरीप पिके त्याच्या तावडीत सापडली होती.

आता अवघ्या महिन्याचीही विश्रांती न घेता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा राज्याला तडाखा दिला आहे. या तडाख्याने रब्बीत नुकसान भरून निघेल व पदरात चार पैसे पडतील असे स्वप्न फुलविणा-या बळिराजाच्या डोळ्यांत अश्रूंचा पूर आणला आणि त्यात त्याचे हे स्वप्नही वाहून गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत सर्वत्र या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतक-यांना जबरदस्त तडाखा दिला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जालन्यासह विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत मंगळवारपासून सुरू झालेल्या गारपीट व अवकाळीने गुरुवारपर्यंत आपला धडाका कायम ठेवला. बुधवारी अवकाळीने उस्मानाबाद जिल्ह्यास झोडपले तर गुरुवारी रात्री लातूर जिल्ह्याला दणका दिला.

शुक्रवारीही आभाळ गच्च भरलेलेच असल्याने पुन्हा अवकाळीचा तडाखा कायम राहण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील रब्बी पिकांसह द्राक्ष व इतर फळबागा संकटात सापडल्या आहेत. राज्यात पावसाचा हा सलग चौदावा महिना ठरला असून मागच्या वर्षीही फेब्रुवारी महिन्यात राज्यात गारपीट झाली होती, हे विशेष! नाशिकमध्ये व उत्तर महाराष्ट्रात वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत तर कांदा व इतर रब्बी पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. बागलाण आणि दिंडोरीच्या काही भागात गारांचा अक्षरश: खच पडला होता. सिन्नरच्या पांदुर्ली भागात बागांमधून पाण्याचे लोट वाहत होते. मराठवाडा व विदर्भातही अवकाळी पाऊस हजेरी लावतोय व काही भागांमध्ये पावसाच्या जोडीने गारपीटही तडाखा देते आहे. त्याचा फटका या भागातील गहू, हरभरा, ज्वारी या प्रमुख रब्बी पिकांना तर बसलाच आहे. मात्र, सोबत आंबा, संत्रा, डाळिंब आदी फळबागाही संकटात सापडल्या आहेत.

बॅड बँकेने काय साधणार?

कोकणात अवकाळी पावसाने आंब्याला जोरदार दणका दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागांना सर्वांत जास्त फटका बसला आहे. थोडक्यात या अवकाळी पावसाने व त्यासोबत झालेल्या गारपिटीने राज्यातील समस्त शेतक-यांना कमी-अधिक प्रमाणात दणका दिला आहे आणि हे संकट आणखी दोन दिवस तरी राज्यावर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सध्या झालेल्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहेच. अगोदरच यावर्षी प्रत्येकच महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असल्याने शेतीची व शेतक-यांची पुरती वाट लागली होती. तरीही निसर्गाच्या अवकृपेतून जे काही बचावले ते कसोशीने जपण्याचा प्रयत्न राज्यातील शेतकरी प्राणपणाने करत होता. त्यासाठी रात्रीच्या अंधाराची व जागरणाचीही पर्वा न करता, जिवाचा धोका स्वीकारून वीज मिळेल तेव्हा पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत होता. त्यात वीज न टिकणे,रोहित्र जळणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे अशा अनेक संकटांची मालिकाच त्याच्यासमोर कायम ‘आ’वासून बसलेली असते.

या संकटाचा जमेल तसा सामना करत पीक जपण्याची व जोपासण्याची त्याची धडपड सुरू होती. अवकाळी व गारपीट या निसर्गाच्या दणक्याने त्याला आता पुरते हतबल व हताश करून टाकले आहे. जगावे तरी कसे? हाच यक्ष प्रश्न त्याच्यासमोर आहे. या जोडीला आता अगोदरच राज्यातील कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकवार झपाट्याने वाढण्यास सुरुवात झालेली असताना अवकाळी पाऊस व गारपिटीने जो वातावरण बदल राज्यात निर्माण झाला आहे, त्याचीही तीव्र चिंता आहेच. कारण अवकाळीसोबतच्या गारपिटीने संपूर्ण राज्य गारेगार करून टाकले आहे व कोरोनाच्या प्रसाराचा वेग वाढवण्यास हे वातावरण अनुकूल ठरते, असेच निरीक्षण आरोग्य तज्ज्ञ व संशोधकांनी वर्तविले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला लागली तर सरकारकडून बंद-निर्बंधांची पावले उचलली जातील. याचे स्पष्ट संकेत सरकारने दिलेल्या निर्वाणीच्या इशा-यातून मिळालेले आहेत. दुर्दैवाने पुन्हा राज्यात लॉकडाऊन व निर्बंधांची स्थिती आली तर शेतक-यांनाच त्याचा सर्वांत जास्त फटका सहन करावा लागणार आहे.

मागच्या टाळेबंदीत शेतात विक्रमी भाजीपाला उत्पादन होऊनही बाजारपेठा बंद असल्याने शेतक-यांना तो बाजारात आणता आला नाही आणि शेतातच तो नासून गेला. शेतक-यांना जबर आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यात अवकाळीच्या नियमित हजेरीने तर पिकांसोबत भाजीपाल्याचे व फळभाज्यांचेही मोठे नुकसान केलेलेच आहे. निसर्गाची अवकृपा पिकू देत नाही आणि कोरोनाचे संकट पिकलेले विकू देत नाही, अशीच शेतक-यांची विचित्र कोंडी मागच्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे आता या नव्या अवकाळीच्या दणक्याने राज्यातील शेतक-यांचे उरलेसुरले अवसानही गळाले आहे. अशावेळी सरकारच्या मदतीचाच एकमेव आधार शेतक-यांना आहे. मात्र, कोरोनाने सरकारच्या तिजोरीतही प्रचंड खडखडाट निर्माण केला असल्याने या मदतीवरही प्रचंड मर्यादा पडल्या आहेत. सरकारने मागे झालेल्या अतिवृष्टी व अवकाळीच्या नुकसानीपोटी जाहीर केलेली मदत पदरात पडण्याची शेतक-यांना अद्याप प्रतीक्षाच असताना आता हे नवे संकट शेतक-यांवर कोसळले आहे.

सरकारला तिजोरीत कितीही खडखडाट असला तरी अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना जगविण्यासाठी कुठलेही कारण पुढे न करता मदत करण्याची भूमिका घ्यावी लागेल. सरकार ही भूमिका घेईलही. मात्र, त्यावर सध्याच्या परिस्थितीने घातलेल्या प्रचंड मर्यादा ही खरी चिंतेची बाब आहे. अशावेळी केंद्र सरकारनेही पक्षीय राजकारण व मदतीच्या निकषाच्या नियमांचे अडथळे बाजूला सारून संकटातील शेतक-याला जास्तीत जास्त व शक्य तेवढ्या वेगाने मदत देण्याची तत्परता दाखवावी, हीच अपेक्षा. मागच्या अतिवृष्टीचा पाहणी दौरा करायला केंद्राचे पथक ज्या विलंबाने राज्यात आले ती नुकसानग्रस्त शेतक-यांची अक्षरश: क्रूर थट्टाच होती व त्यावर शेतक-यांनी तीव्र संतापही व्यक्त केला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये हीच माफक अपेक्षा! असो!! मदत मिळेल तेव्हा मिळेल पण सध्या राज्याच्या दृष्टीने ऐरणीवर आलेला प्रश्न म्हणजे या वारंवार उद्भवत असलेल्या अवकाळीच्या संकटावर उत्तर काय? हे नैसर्गिक संकट हल्ली शेतक-यांच्या पाचवीला पुजल्याचीच स्थिती आहे. त्याची कारणे शोधणे व त्यावर उत्तर मिळवणे हे सर्वोच्च प्राधान्याने आता क्रमप्राप्त बनले आहे हे मात्र निश्चित!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या