19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसंपादकीयअभिनंदन भारत!

अभिनंदन भारत!

एकमत ऑनलाईन

मानवी जनजीवनालाच विळखा घालून जगणे ठप्प करून टाकणा-या कोरोनाशी हिमतीने लढा देताना गुरुवारी भारताने १०० कोटी नागरिकांना लस देण्याचा ऐतिहासिक व विक्रमी टप्पा गाठला. जगातील दुस-या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश कोरोनाविरुद्ध कसा लढणार? या कुत्सित व चिंतेच्या प्रश्नाला भारताने जे उत्तर दिले आहे त्याने आता जगातल्या व देशांतर्गतच्याही अस्वस्थ आत्म्यांचे समाधान झाले असेल, हीच अपेक्षा! भारताने सामूहिकरीत्या बजावलेल्या एकत्रित कामगिरीचेच हे फलित आहे. त्यामुळे हे कुणा एकाचे यश नाही तर संपूर्ण देशाचे यश आहे आणि म्हणूनच त्यासाठी संपूर्ण देशाचे अभिनंदन करायला हवे. लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत २८१ दिवसांमध्ये भारताने हे उद्दिष्ट पार केले आहे. देशातल्या ७५ लाख लोकांना लसीच्या पहिल्या डोसचे कवच मिळाले आहे तर ३१ टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.

विशेष म्हणजे हे विक्रमी उद्दिष्ट गाठताना ते भारताने देशांतर्गत लसनिर्मितीद्वारे गाठले आहे, हा आत्मनिर्भर भारताचा भीमपराक्रमच आहे. भारताने इतर प्रगत देशांकडून लस मिळण्याच्या मदतीची प्रतीक्षा न करता देशांतर्गत लस संशोधन व निर्मितीही केली. आवश्यकता लक्षात घेऊन लस उत्पादनाची क्षमता वाढवत योग्य वेग पकडला आणि स्वत:ची गरज स्वत: भागवतानाच जगातील इतर देशांनाही मदतीचा हात दिला. भारताकडे पाहण्याचा जो प्रगत राष्ट्रांचा एक दृष्टिकोन आहे त्याला जबरदस्त तडाखा दिला, त्यांना अचंबित केले आणि जगासमोर भारताची एक आश्वासक व विश्वासू देश ही प्रतिमा निर्माण केली, ही खरोखरच एक अविश्वसनीय कामगिरी आहे आणि त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील सर्वच देश अचंबित आहेत व त्यांच्या तोंडी भारताच्या या यशाबद्दल एकच वाक्य आहे ते म्हणजे ‘अभिनंदन भारत’ अर्थात ही कामगिरी सहज सोपी नक्कीच नव्हती.

विशेषत: या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाच्या दुस-या लाटेने भारताची जी दैना उडवून दिली तेव्हा तर आता भारताचे काय होणार? हाच प्रश्न जगभरातून विचारला जात होता. मात्र, संकटाशी लढण्याची एकत्रित प्रखर इच्छाशक्ती काय चमत्कार घडवू शकते, त्याचे उदाहरणच भारताने जगाला दाखवून दिले! त्यामुळे आज भारत दुस-या लाटेतून बाहेर पडला आणि त्याबरोबरच निर्बंध शिथिल होत गेल्याने देशाच्या अर्थचक्रानेही वेग पकडला. १०० कोटी लोकांचे लसीकरण झाल्याने देशात आता कोरोनाविरुद्धची समूह प्रतिकारशक्ती निर्माण झाली. तज्ज्ञांच्या मते आता त्यामुळेच तिस-या लाटेचा धोका कमी झाला आहे. भारताने कोरोनाविरुद्धच्या लढाईत जो वेग पकडला आहे तो कायम ठेवला तर आता देशातील जनजीवनाला व देशाच्या अर्थकारणाला ‘ब्रेक’ लागणे नाही, हाच याचा अर्थ! अर्थात या सगळ्या प्रवासात भारताला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला, त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली.

अनेकांना आपले आप्तेष्ट गमवावे लागले. अनेक संसार उद्ध्वस्त झाले, अनेक बालकांचे छत्रच हरवून ते अनाथ झाले आणि देशातल्या हजारो कुटुंबांच्या चुली विझल्या हे सत्य नाकारताही येणार नाही आणि विसरताही येणार नाही. ही जखम भळभळती आहे. ती सहजासहजी भरून येणार नाहीच. त्यामुळे विक्रमी कामगिरीवर आनंद व्यक्त करतानाच या भळभळत्या जखमेवर फुंकर घालण्याची जबाबदारी विसरता येणार नाहीच! ती ही देशाला अशीच प्रखर इच्छाशक्ती दाखवून पार पाडावी लागेल! जशी कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप संपलेली नाही तशीच या जबाबदारीतूनही अद्याप देशाची मुक्तता झालेली नाही, हे वास्तव आहे. ते देशाला कायम स्मरणात ठेवावे लागेल. देशातील एकूण एक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान अद्याप बाकी आहे. ते देशाला याच वेगाने व याच प्रखर इच्छाशक्तीने पूर्ण करावे लागेल. विक्रमी कामगिरीच्या आनंदोत्सवात ‘नजर हटी..’ असे झाले तर मग जसा दुस-या लाटेच्या तडाख्याचा अपघात देशाला सहन करावा लागला तसेच तिस-या लाटेचा अपघातही सहन करण्याची वेळ येऊ शकते, हे सरकार, प्रशासन, यंत्रणा व सर्वसामान्य नागरिक म्हणजेच सर्वांनीच कायम स्मरणात ठेवले पाहिजे. तसेही हा विक्रमी टप्पा गाठताना आपण काही कमी अडचणींचा सामना केलेला नाहीच!

व्यवस्थापन कौशल्य, समन्वय, लसनिर्मिती, वितरण, त्याबाबतचे नियम व निकष आणि भरीस भर म्हणजे त्यावर रंगलेले राजकारण, वितंडवाद, श्रेयाची लढाई या सगळ्या अडचणी व हिणकस प्रकारांचा प्रचंड त्रास देशातील सर्वसामान्यांना सहन करावा लागला आहे. अगदी लसनिर्मितीवर अविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांनी जी परिस्थिती निर्माण झाली व लसीकरणास मिळणारा प्रतिसाद थंड झाला त्याची मोठी किंमत दुस-या लाटेत देशाला मोजावी लागली. पक्षपाती लस पुरवठ्याचे प्रकारही देशातील सामान्यांना सोसावे लागले. त्यातून योग्य धडा सर्वांनाच मिळाल्याने आपल्याला शहाणपण आले, त्याच्या परिणामी आज देश म्हणून आपण हा विक्रमी टप्पा गाठला आहे. या शहाणपणाचा विसर पडू न देणे, हीच आता आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. असो! हा विक्रमी टप्पा गाठल्याचा आनंद व्यक्त करताना लढाईत निर्णायक विजय हाच महत्त्वाचा असतो याचे भान सोडून चालणार नाहीच. देशातील ३१ टक्के लोकांनाच अद्याप लसीचे दोन डोस मिळाले आहेत, हे ही लक्षात ठेवणे भाग आहे.

शिवाय १८ वर्षांखालील मुलांना अद्याप लस प्राप्त व्हायची आहे, हे ही ध्यानात ठेवले पाहिजे. त्यामुळे भारताला ही लढाई त्याच जोमाने व वेगाने लढावी लागणार आहे तरच या लढाईत निर्णायक विजयाची पताका फडकावता येईल. शिवाय जगात लसींच्या प्रतीक्षेत असणा-या गरीब देशांच्या मदतीच्या अपेक्षेची पूर्तताही करण्याची जबाबदारी भारताला दुर्लक्षिता येणार नाहीच. त्याचबरोबर प्रदीर्घ काळाने देशाचा कोंडलेला श्वास जो आता मोकळा होतो आहे, तो परत कोंडला जाणार नाही, याची काळजीही भारताला सदोदित जागरूक राहून घ्यावी लागणार आहे. तरच देशाच्या अर्थचक्राला सध्या येत असलेला वेग कायमही राहील व वाढवता येईल. कोरोनाने अर्थकारणाला दिलेला प्रचंड फटका भरून काढण्यासाठीही सामूहिक प्रखर इच्छाशक्तीचीच गरज आहे आणि ही लढाईही आपल्याला समांतर पातळीवर त्याच वेगाने लढावी लागणार आहे, याचा विसर पडू नये, हीच अपेक्षा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या