जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत अमेरिका, चीन, भारत, तुर्की, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील यासारख्या समृद्ध आणि विकसनशील अर्थव्यवस्थेच्या नेत्यांचा समावेश आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ही या परिषदेला संबोधित करण्याची शक्यता आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाच्या आव्हानाविरोधात या परिषदेत एकत्र येऊन आशेचा आणि आश्वासनाचा संदेश देणे आपले कर्तव्य आहे असे शाह सलमान यांनी म्हटले आहे. परिषदेला आवाहन करताना शाह सलमान म्हणाले, कोविड-१९ साथीचा रोग हा एक अनपेक्षित धक्क्यासारखा आहे. या रोगाने फारच कमी काळात संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. जगाचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान केले आहे.
यावेळी जी-२० च्या नेत्यांनी माहिती आदान-प्रदान करणे, संशोधनासाठी आवश्यक असलेली सामग्री सामायिक करणे, क्लिनिकल डेटा सामायिक करणे आणि आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे वचन दिले आहे. कोरोना विषाणूविरोधी लस तयार करण्यास निधी उभारण्यासाठी एकत्र काम करण्याचे वचनही या देशांनी दिले आहे. जी-२०च्या देशांनी समन्वयी पद्धतीने विकसनशील देशांना पाठिंबा देण्याचे आवाहनही शाह सलमान यांनी केले. दुस-या महायुद्धानंतर संपूर्ण जगाला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे असे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कला-तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि विश्वास यावर आधारित नवीन जागतिक निर्देशांक विकसित करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. कोरोना विषाणूने जगभरात हैदोस घालताना लहान-मोठा असा भेदभाव केलेला नाही, भल्याभल्यांनाही त्याने सोडले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्यु. यालाही कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या विलगीकरणात आहे.
कोरोनाशी संबंधित वैद्यकीय सूचनांचे तो पालन करतोय. ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया आणि मुलगा बॅरन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. प्रचाराच्या वेळी ट्रम्प ज्यु. याने हिरीरीने भाग घेतला होता. सध्या जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ५३ हजारपेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले आहेत तर १.१७ कोटीपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनावरील लसीचे काम अंतिम टप्प्यात आहे. फायझर कंपनीने त्यांची लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ असे म्हणतात. मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात गरजांशी अनुकूल संशोधन झाले आहे. आज जग एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. आर्थिक घडामोडींना वेग द्यायचा असेल तर संपूर्ण जीवनशैलीच बदलून जाईल. कोरोनाचा सामना करण्यासाठी शारीरिक अंतर तर पाळावेच लागेल शिवाय अन्य बरेच बदल करावे लागणार आहेत.
लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी
आपण हाताळत असलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरणही अत्यावश्यक बनले आहे. त्या दृष्टीने सुरू असलेल्या संशोधनात भारतीय संस्था आघाडीवर आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरात लसीचा शोध सुरू आहे. भारतातही त्या दृष्टीने वेगाने काम सुरू आहे. लसीसंबंधी अनेक दावेही केले जात आहेत. लसींच्या तयारीबाबत कितीही दावे केले जात असले तरी अशा प्रकारच्या विषाणू प्रतिरोधक लसींची निर्मिती करणे हे प्रचंड अवघड व क्लिष्ट काम आहे. साधारणत: अशा लसी विकसित करण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो पण सध्या दीड वर्षातच लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तयार होणारी लस ही प्रमाणित असली पाहिजे, तिचे कोणतेही गंभीर साईड इफेक्टस् होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कारण ही लस कोट्यवधी लोकांना दिली जाणार आहे याचे भान ठेवावे लागेल. लसीची चाचणी तिस-या टप्प्यामध्ये आली याचा अर्थ ती यशस्वी झाली असे ठामपणे सांगता येत नाही. अनेकवेळा १० पैकी २ ते ३ जणांवरच यशस्वी परिणाम झाल्याचे दिसून येते.
परिणामकारक वाटणारे एखादे औषध कधी बाद होईल ते सांगता येत नाही. इतके दिवस व्हेंटिलेटरवर असणा-या कोरोनाबाधित रुग्णांना डेक्सामेथाजोन हे औषध दिले जात होते. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. त्याचप्रमाणे रेमेडेसिविरमुळे कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे होत असल्याचे दिसून आले. परंतु आता अॅन्टीव्हायरल ड्रग रेमेडेसिविर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरू नका असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत.परंतु अजूनही कोरोनावर गुणकारी लस सापडलेली नाही. उलट भारतात अनेक राज्यांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या देशात रेमेडेसिविर औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. इतके दिवस अनेक देशांतील वैज्ञानिकांनी हे औषध प्रभावी असल्याचे म्हटले होते. आता जागतिक आरोग्य संघटनेने रेमेडेसिविर हे औषध कोरोनावर वापरण्यात येणा-या औषधांच्या यादीतून बाद केले आहे.
प्रारंभी इबोला या आजारासाठी या औषधाचा वापर केला जात होता. मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या उपचारात हे औषध प्रभावी असल्याचे सांगितले गेले. या औषधामुळे कोरोना रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी १५ दिवसांवरून ११ दिवसांवर आल्याचे दिसून आले होते परंतु आता डब्ल्यूएचओ म्हणते की, ३० देशांतील ११ हजारांहून अधिक रुग्णांचा कालावधी कमी होण्यास किंवा त्यांचा प्राण वाचवण्यास या औषधाचा फारसा किंवा काहीच उपयोग झाला नाही. जगभरात आतापर्यंत सुमारे ५ कोटी ७६ लाख ६२ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे पैकी १३ लाख ७२ हजार ६६१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ३ कोटी ९९ लाख ७८ हजार ८६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ऑक्सफर्डची लस आरोग्यसेवक व वृद्धांसाठी फेब्रुवारी २०२१ पर्यंत तर सर्वसामान्यांसाठी एप्रिल २०२१ पर्यंत उपलब्ध होईल असे सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी आदर पूनावाला यांनी म्हटले आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील, त्याची किंमत १ हजार रुपये राहील. सर्व भारतीयांना लस मिळण्यासाठी २ ते ३ वर्षे लागतील. भारतामध्ये स्वदेशी कोविड-१९ लस ३-४ महिन्यांत उपलब्ध होईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.