मार्च महिन्यात नाशिक येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. प्रारंभी साहित्य संमेलन कोठे घ्यायचे यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. संमेलन आयोजनासाठी नाशिक आणि दिल्लीकरांनी अर्ज दाखल केले होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी संमेलन दिल्ली येथे व्हावे असा दिल्लीकरांचा आग्रह होता. तर अभाषिक राज्यात संमेलन आयोजित करून काय साध्य होणार आहे? शिवाय अमराठी जनता संमेलनाकडे फिरकणारही नाही, त्यामुळे संमेलन महाराष्ट्रातच व्हावे असे नाशिककरांचे म्हणणे होते. या आधी इंदूर, बडोदा आदी परराज्यात संमेलन भरवण्यात आले होते; परंतु त्याला प्रेक्षकांचा फारसा रसिकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर नाशिककरांनी बाजी मारली आणि संमेलन स्थळ ठरले. नाशिकमधील गोखले शिक्षणसंस्थेच्या प्रांगणात २६ ते २८ मार्च या कालावधीत संमेलन आयोजित केले जाणार आहे. सध्या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. परंतु कोरोना विषाणूच्या मनात वेगळेच दिसते.
राज्यात कोरोना महामारीने पुन्हा उचल खाल्ली आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मराठी साहित्य संमेलनावर त्याचे मळभ दाटले आहे. संमेलनात कोरोनाच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या बदलत्या स्थितीत संमेलनातील गर्दी मर्यादित करायची की संमेलन पुढे ढकलायचे यावरही विचार करण्यात आला. जिल्हा परिसरात कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने संमेलनात विशेष दक्षता घेण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि स्वागत समितीच्या एकत्रित बैठकीत घेण्यात आला. या संमेलनात वारंवार निर्जंतुकीकरण, स्वच्छता, सहभागी होणा-यांची चाचणी, साहित्यिकांसाठी स्वतंत्र निवास, वाहतूक व्यवस्था आदी बाबींवर विचार करून नियोजन सुरू आहे.साहित्यप्रेमींसाठी वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय संमेलनाचे सहा शहरांत थेट प्रक्षेपण करण्यावरही विचार झाला आहे. गर्दी टाळण्यासाठी हा विचार आवश्यक वाटतो. मध्यंतरी स्थानिक पातळीवर कोरोना उतरणीला लागला होता, त्यामुळे संयोजकांचा उत्साह वाढला होता आणि तयारीने वेग घेतला होता. संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होऊ इच्छिणा-यांची संख्या वाढली होती. पण आता नाशिकसह राज्यातील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे.
बदलती स्थिती लक्षात घेऊन संमेलन आयोजन यशस्वी कसे होईल यावर विचार करणे क्रमप्राप्त आहे. संकटे झुंडीने येतात हे लक्षात ठेवून कामाला लागले पाहिजे. संमेलनात खुर्च्यांमध्ये अंतर ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे, येणा-यांची तपासणी करणे असे उपाय आवश्यक बनले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी गर्दी नियंत्रणात आणण्यापेक्षा संमेलन स्थळावर येणारी गर्दी सुरक्षित घरी कशी पोहोचेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. संमेलनास एक महिन्याचा अवकाश असून त्यानुसार कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ते फेरबदल करणे सोपे जाईल. संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ३९ विविध समित्या तयार करण्यात आल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. महापालिका, पोलिस प्रशासन पातळीवर संमेलनविषयक प्रमुख अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. संमेलन म्हटले की पुस्तक प्रदर्शन आले. पुस्तक प्रदर्शनासाठी सोडत पद्धतीने जागा दिल्या जाणार आहेत. या संमेलनात शेतकरी आंदोलन आणि कोरोना संसर्ग हे विषय चर्चिले जाणार हे उघड आहे. संमेलनात व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान दिले जाणार नाही असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी म्हटले होते. परंतु तो विचार बारगळलेला दिसतो.
चमोली जलप्रलयातील बेपत्तांना मृत घोषित करणार
कारण संमेलनाचे स्वागताध्यक्षच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आहेत. जाहिरात, स्मरणिकेच्या माध्यमातून निधी संकलित करण्यात येत आहे. ग्रंथ संमेलनात ४०० कक्ष उभारण्यात येणार असून विविध परिसंवादांसाठी उपमंडप उभारण्यात येणार आहेत. संमेलन आयोजनाची तयारी जोरात सुरू असली तरी संमेलनाच्या अडचणींत वरचेवर वाढ होत चालली आहे. आता संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ कोरोनाबाधित झाल्याने संमेलनाच्या तयारीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. रविवारी अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि स्वागत समिती यांची बैठक झाली होती. दुस-याच दिवशी भुजबळांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे महामंडळाचे पदाधिकारी गृहविलगीकरणात असून पुढील एक-दोन दिवसांत त्यांची चाचणी होणार आहे. संमेलनाबाबत लगेच पुनर्विचार न करता पुढील काळात स्थितीचे अवलोकन करण्याचे महामंडळाने ठरवले आहे. संमेलनाच्या तयारीसाठी दैनंदिन प्रत्यक्ष होणा-या विविध समित्यांच्या बैठका आता ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. कोरोना काळात कराव्या लागणा-या उपायांमुळे संमेलनाचे अंदाजपत्रक साडेचार ते पाच कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गत २४ तासांत सुमारे ७ हजार कोरोना रुग्णांची वाढ झाली. राज्यात जवळपास ५३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपण कोरोनाबाधित झाल्याची माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. या आधी महाविकास आघाडीतील आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, बच्चू कडू, एकनाथ खडसे आदींनाही कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयातील महसूल विभागात ८ कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. राज्यात मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर, यवतमाळ, अमरावती आदी जिल्ह्यांतही कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना संकटामुळे संमेलनाच्या अडचणींमध्ये भर पडणार असली तरी चिवट नाशिककर या आव्हानाला सामोरे जात संमेलन यशस्वीरीत्या पार पाडतील यात शंका नाही.