23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeसंपादकीयदेश प्रथम, नेहमीच प्रथम!

देश प्रथम, नेहमीच प्रथम!

एकमत ऑनलाईन

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारा भारतीयांना ‘देश प्रथम, नेहमीच प्रथम’ अशी नवी घोषणा दिली, नवा मंत्र म्हणा हवे तर. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने ‘भारत जोडो’ आंदोलन उभे केले पाहिजे असे ते म्हणाले. पारतंत्र्याच्या काळात महात्मा गांधींनी सुसंगत असे ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले होते. आज ‘भारत जोडो’ आंदोलनाची वेळ आली आहे. मोदींनी ‘मन की बात’ केली खरी पण त्यांनी ‘जन की बात’ ऐकली नाही. ती ऐकली असती तर जनतेला पडलेल्या प्रश्नांची उकल झाली असती. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आदी महत्त्वांच्या, देशाला मार्गदर्शन करणा-या सभागृहांमध्ये काम करणारे प्रतिनिधी निवडून दिले जातात. त्यातील काहींचे वर्तन आक्षेपार्ह असते. मोठ्याने आवाज करत गोंधळ घालणे, घोषणा देत सभेचे कामकाज बंद पाडणे, हौदात उतरून सभापतींच्या टेबलावर हल्ला करणे, राजदंड पळवणे असे प्रकार करणा-या सदस्यांना लगेच सभागृहाबाहेर का काढले जात नाही? कामकाज बंद पाडणे हा जनतेचा एक प्रकारे विश्वासघातच.

असे प्रकार का चालू दिले जातात? दुर्वर्तन करणारे सदस्य जनतेसमोर कोणता आदर्श ठेवतात? जनतेचे प्रतिनिधी म्हणवणा-या लोकांना असे करण्याची परवानगी कशी काय दिली जाते? सभागृहामध्ये सदस्यांचे वर्तन कसे असावे यासाठी एखादी आचारसंहिता आहे काय? प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षातील काही लोक असा गोेंधळ घालताना दिसतात. तेव्हा अशा कामकाज बंद पाडणा-या लोकांवर नियंत्रण ठेवणारे कायदे कोणत्याच राजकीय पक्षाला नको आहेत काय? तसे असेल तर आपल्या लोकशाहीचे भवितव्य काय असेल? या प्रश्नांची उत्तरे ‘मन की बात’मधून अपेक्षित आहेत. सध्या जाती आधारित आरक्षणाची मागणी वाढत चालली आहे. जातीप्रथा हा भारतीय समाजाला लागलेला दोष आहे, तो गेला पाहिजे असे सारेच म्हणतात. सतत जातीचा आधार घेत आरक्षणाची मागणी करणे, मुलांना शाळेत प्रवेश देताना धर्म व जात यांची नोंद करणे अशा गोष्टींमुळे जातीसंस्था पुसट अथवा निष्प्रभ केली जाईल काय? देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होत आहेत. कोणत्याही जातीमधील गरीब लोकांना आरक्षणाचा फायदा का मिळत नाही? या प्रश्नांची उत्तरे ‘मन की बात’ मधून मिळाली असती तर बरे झाले असते.

यासंबंधी सगळे राजकीय पक्ष उघड दिसणारी गोष्ट मान्य करत नाहीत, जातीभेदाला पाठिंबा देतात याची खंत वाटायला हवी. देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे पंतप्रधान सांगतात पण अशीच निकड लसीकरण मोहीमेबाबत त्यांना का वाटत नाही? काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या वेगावरून पंतप्रधानांना हाच सवाल केला आहे. पंतप्रधानांना देशाच्या मनातली गोष्ट समजली असती तर लसीकरणाची दारूण स्थिती झाली नसती. लसीकरणाच्या वेगावरून सरकारला धारेवर धरताना राहुल गांधी यांनी ‘व्हेअर आर व्हॅक्सिन’ असा ‘हॅशटॅग’ वापरला. संथ लसीकरण व माध्यमातील वृत्ताचा दाखला देत एक व्हीडिओही ट्विट केला. सरकारने डिसेंबरपर्यंत दोन्ही डोससह एकूण ६० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दररोज ९३ लाख लोकांना लस देण्याची गरज आहे. पण गत आठवडाभरात सरासरी ३६ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे.

कोरोनाचा अद्याप नायनाट झाला नसल्याचे पंतप्रधान सांगतात आणि नागरिकांना या महामारीपासून सावध राहण्याचे आवाहनही करतात मात्र लस पुरवठ्यासंबंधी चकार शब्द काढत नाहीत हे विचित्रच म्हटले पाहिजे.जगावेगळे प्रयत्न होतात तेव्हाच मानवतेसाठी नवी कवाडे खुली होऊन एका नव्या युगाची सुरुवात होते हे सांगताना मोदींनी मणिपूर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू-काश्मीरसह विविध राज्यातील शेतक-यांनी आपल्या शेतात केलेल्या विविधांगी प्रयोगांचा दाखला दिला परंतु चार महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत काहीच वक्तव्य केले नाही. पेगॅसस हेरगिरी प्रकरणी इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांची हेरगिरी झाली किंवा नाही याबाबतचे स्पष्टीकरण मोदींनी संसदेत द्यायला हवे होते. त्याबाबत किमान ‘मन की बात’मध्ये तरी बोलवायला हवे होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा संपूर्ण देशात साजरा केला जाईल या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मार्गावर चालून त्यांच्या स्वप्नातील देश साकार करण्याचे आहे. हा कोणताही सरकार किंवा राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही.

हा कोट्यवधी देशवासीयांचा कार्यक्रम आहे. या मोदींच्या विचारांशी देशातील नागरिक सहमत आहेत.अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनाच देशावर श्रद्धा दाखवण्याचा व देशालाच सर्वाधिक प्राधान्य देण्याचा संकल्प देशबांधव निश्चितच करतील. याबाबत पंतप्रधानांनी निश्चिंत रहावे परंतु तेवढे ते लसीकरण मोहीम व लस पुरवठ्यासंबंधी अधिक लक्ष द्यावे. जगभरात तिस-या लाटेचा धोका कायम असल्याचे सांगितले जाते. जगाची वाटचाल कोरोनाच्या तिस-या लाटेच्या दिशेने सुरू असून स्पेनमध्ये रुग्णसंख्या ६४ टक्क्यांनी तर हॉलंडमध्ये ३३ टक्क्यांनी वाढली आहे. म्यानमार,थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगला देश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहिले पाहिजे. भारतात लसीकरणाचा वेग वाढत असला तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने देश अजून प्रतिकारशक्तीपासून खूप दूर आहे. त्यामुळे देशातील मोठ्या लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे.

त्यातून सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा मार्ग चुकीचा ठरेल. दुस-या लाटेची तीव्रता कमी होत असली तरी नियंत्रणातील स्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये यासाठी लोकांनी दक्ष राहणे व कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करणे हाच पर्याय असल्याचे कोरोना कृतीगटाने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही संभाव्य तिस-या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे पण नवी लाट कधी येईल यापेक्षा तिची तीव्रता काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतात दुसरी लाट अजून संपलेली नाही. काही राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. देशातील सुमारे ४७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे संसर्गाचे प्रमाण अधिक असले तरी त्यातील केवळ ९.८ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. शिवाय मृत्यूदर केवळ ०.४ टक्के होता. याचा अर्थ लस उपयोगी ठरते आहे.

लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रकार व मृत्यूदर या दोन्हीतही घट झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ असा की, लसीकरण प्रक्रिया वेगाने केली तर त्याचा फायदा होणार आहे व पुढच्या घातक लाटांपासून संरक्षण मिळणार आहे.सध्या देशात एकूण बाधितांची संख्या सुमारे ३ कोटी १३ लाख ७१ हजार याहून एकूण मृतांची संख्या सुमारे ४ लाख २० हजार आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली असून ती सुमारे ४ लाख ८ हजार झाली आहे. एकूण संसर्ग दर १.३० टक्के तर बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९७.३६ टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत ४५ कोटी ६२ लाख ८९ हजार ५६७ चाचण्या झाल्या आहेत. देशातील सकारात्मकता दर २.३१ टक्के राहिला असून तो लागोपाठ ३४ व्या दिवशी तीन तीन टक्क्यांपेक्षा कमी होता.

कान्होपात्रा आणि तरटीचे झाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या