23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसंपादकीयकोसळधार !

कोसळधार !

एकमत ऑनलाईन

राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार बहुमत चाचणीची परीक्षा पास होऊन सत्तारूढ झाले आणि संपूर्ण जून महिना दडी मारून बसलेल्या पावसाने या सरकारचे दणक्यात स्वागत केले. त्यावर आनंद व्यक्त व्हावा असे वाटत असताना पावसाने आपले सुखावणारे रूप बदलत रौद्ररूप धारण केल्याने आता चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. राज्यात मराठवाडा विभाग वगळता इतर सर्वत्र पाऊस धो-धो बरसतो आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या कोसळधार पावसामुळे नव्या सरकारची चिंता वाढवली आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पालघर भागात पाऊस ‘जोर धार’ बरसतो आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. मुंबई-ठाण्यातील रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढले आहे. दरडी कोसळणे, पुलावर पुराचे पाणी येणे आदी कारणांनी महामार्ग ठप्प होतायत, रस्ते बंद होतायत. कोकण विभागात तर सर्वच नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे तिथे एनडीआरएफच्या तुकड्या तैनात झालेल्या आहेत.

या सगळ्या परिस्थितीने महापुराच्या आठवणी ताज्या केल्याने सर्वसामान्य जनता पुरती धास्तावली आहे. त्यातच हवामान खात्याने राज्यात बुधवारपासून आणखी तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने साहजिकच प्रशासन, यंत्रणा व सामान्य जनतेच्या उरात धडकी भरली आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांपूर्वी दडी मारून बसलेल्या पावसामुळे राज्यावर दुष्काळाची छाया निर्माण झाली होती. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावरच्या चर्चेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी हा मुद्दा उपस्थित करून नव्या सरकारने तातडीने त्याचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली होती. विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यावर अजित पवार यांनीही हा मुद्दा अधोरेखित केला होता. त्यातून या नेत्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा नव्हे तर दुष्काळाचा आढावा घेण्याची गरज असल्याचेच बहुधा सुचवायचे असावे. मात्र, अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री शिंदे यांचाच अंदाज जास्त योग्य असल्याचे वरुणराजाने सिद्ध केले आहे. शिंदे यांचे राजकीय अंदाजच नव्हे तर पावसाचे अंदाजही महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा खरे ठरावेत हा अजब योगायोगच म्हणावा लागेल. असो. मूळ मुद्दा हा की, अगोदर दडी मारून राज्याच्या तोंडचे पाणी पळवणारा पाऊस आता धों-धों कोसळून राज्याच्या उरात धडकी भरवतोय. या कोसळधार पावसाने राज्यात निर्माण झालेला पाणीटंचाईचा प्रश्न एका झटक्यात निकाली निघाला आहे.

मराठवाडा वगळता राज्याच्या इतर सर्वच भागातील धरणांमध्ये पाणीसाठा वेगाने वाढला आहे. मात्र, पावसाचे हे रौद्ररूप शेतीचे मोठे नुकसान करणारे आहे. अतिवृष्टीमुळे उगवलेले पीक हातचे जाण्याबरोबरच जमीन खरवडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे महापुरामुळे जीवित व वित्तहानीची शक्यता वाढली आहे. विधिमंडळात बहुमत चाचणी जिंकल्यावर केलेल्या भाषणात एकनाथ शिंदेंच्या कामाच्या झपाट्याचे कौतुक करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात आलेल्या महापुरावेळी शिंदेंनी केलेल्या कामाचे उदाहरण दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नव्या सरकारवर पुन्हा अशाच संकटाला सामोरे जाण्याची वेळ येईल असे फडणवीसांना स्वप्नात देखील वाटले नसेल. असो. एकीकडे मराठवाड्यातील बळिराजा आजही पावसासाठी ढगांकडे डोळे लावून बसलेला असताना दुसरीकडे धों-धों बरसणा-या पावसामुळे बळिराजाच नव्हे तर सर्वसामान्य जनताही डोक्याला हात लावून बसली आहे.

निसर्गाचे हे रूप आता नित्याचेच होत असल्याचा अनुभव राज्यालाच नव्हे तर देशालाही वारंवार घ्यावा लागतो आहे. संपूर्ण जून महिना उलटला तरी हवामान खात्याने ‘आला-आला’ म्हणून गाजावाजा केलेला मान्सून आलाच नाही. त्यामुळे जून महिना संपल्यावरही राज्यात जेमतेम ५० टक्क्यांच्या आसपासच पेरण्या झाल्या आहेत. त्यातही बहुतांश शेतक-यांनी पाऊस पडला म्हणून नव्हे तर पडेल या आशेवरच पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट घोंघावत होते. आता पाऊस आला तो असे रौद्ररूप घेऊन. त्यामुळे उगवलेले पीक हातचे जाणे अटळ! पावसाने असे दोन्ही बाजूंनी शेतक-यापाठी दुष्टचक्र लावले आहे. एकाच राज्यात सरकारला एकाच वेळी अतिवृष्टीने होणारे शेतीचे नुकसान व पावसाने दडी मारल्याने संकटात सापडलेले शेतकरी अशा दोन्ही प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यात हवामान खात्याच्या ताज्या अंदाजाने नव्या संकटाच्या शक्यतेची भर पडली आहे.

अर्थात हवामान खात्याचे अंदाज बरोबर उलटे होतात हाच आजवरचा लौकिक! त्यामुळे ताज्या अंदाजाबाबतही हाच लौकिक सार्थ ठरण्याची शक्यता अधिक. मात्र, तरीही या अंदाजाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण सध्या कोसळत असलेला पाऊस धडकी भरवणारच आहे. त्यामुळे आताच खबरदारी घेण्याची वेळ आलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत पावसाने जादा संकटाची भर घालू नये, हीच वरुणराजाला प्रार्थना. दुसरीकडे वरुणराजाने मराठवाड्यावर आपली कृपादृष्टी टाकावी, ही या भागातील जनतेची प्रार्थना असणार कारण अत्यंत तुरळक बरसणा-या पावसामुळे मराठवाड्यात शेतीचेच नव्हे तर पाणीटंचाईचेही संकट निर्माण केले आहे. जुलै महिना सुरू होताच प्रशासकीय खाक्याप्रमाणे अधिग्रहणे बंद करण्यात आल्याने अनेक गावे, वाड्या-तांडे यांच्यासमोर तहान कशी भागवायची असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे हवामान खात्याचा ताजा अंदाज मराठवाड्यात थोडा तरी खरा ठरावा, अशीच या भागातील जनतेची प्रार्थना असणार ! एकंदर मागचे १५ दिवस राजकारणाच्या महापुरात डुंबणा-या महाराष्ट्राला आता ख-या महापुराचा सामना करावा लागण्याची शक्यता दिसते आहे.

राजकारणाच्या महापुरात तडफेने कार्यरत होऊन राज्यात सत्तांतराचा यशस्वी प्रयोग घडविणा-या शिंदे-फडणवीस जोडीला आता फार काळ त्या आनंदात राहता येणार नाही. त्यांना आता महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटाला पूर्ण क्षमतेने व तत्परतेने भिडण्याची तडफ दाखवावी लागेल. तरच सत्तांतराचा प्रयोग राज्यातील जनतेच्या हितासाठीचा असल्याचा दावा सत्य ठरेल. सध्या तरी शिंदे व फडणवीस हे दोघेच सरकार आहेत कारण मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही व तो ११ जुलैची सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होऊन त्यात दाव्या-प्रतिदाव्यांचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय होण्याची चिन्हेही नाहीत. त्यामुळे सध्या तरी शिंदे-फडणवीस जोडीलाच एकहाती या संभाव्य संकटाला भिडण्यास सज्ज राहावे लागेल. त्यात या दोघांच्या कार्यकुशलतेची, तडफेची व कार्यतत्परतेची ‘लिटमस टेस्ट’ पार पडेल. त्यात ते कितपत यशस्वी होतात यावरच जनतेची या सत्तांतराच्या प्रयोगाला मिळणारी पसंती अवलंबून असणार आहे. खरे तर नव्या सरकारसाठी आपल्यावरील सर्व आरोपांना चोख उत्तर देण्यासाठीची ही ‘संकटातील संधी’ आहे. ती हे दोघे किती साधतात, हे आता पहायचे !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या