19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसंपादकीयधर्मयुद्ध?...डॉग फाईट?

धर्मयुद्ध?…डॉग फाईट?

एकमत ऑनलाईन

खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळला गेला पाहिजे. त्यात धर्मभेद, प्रांतभेद, राजकारण आणले जाऊ नये असे म्हटले जाते; परंतु दुर्दैवाने अशा गोष्टी दिसून येतातच. संघनिवड करताना प्रांतभेद, राजकारण हे केले जातेच. काही नतद्रष्ट लोक त्यात धर्मभेदही मिसळतात आणि खेळातली खरी मजाच निघून जाते. कोणत्याही खेळामध्ये खेळाडूच्या कौशल्याचा कस लागला पाहिजे. खेळ हा नेहमी निर्मळ भावनेनेच खेळला जावा. त्यात धर्मभेद, वर्णभेद्र, वंशभेद, असूया वृत्ती असू नये. जे देश दहशतवादाला पाठबळ देतात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर थारा दिला जाऊ नये हे ही खरेच. पाकिस्तानातील दहशतवाद लक्षात घेता न्यूझिलंड व इंग्लंडने त्या देशात खेळण्यास नकार दिला, आपले दौरे रद्द केले. त्यामुळे पाकची जगभर नाचक्की झाली. पाच दिवसीय कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली तेव्हा प्रत्येकी ५० षटकांचे एकदिवसीय क्रिकेट अस्तित्वात आले.

कसोटीसाठी पाच दिवसांचा वेळ देणे क्रिकेट रसिकांना शक्य होईना तेव्हा त्यांच्यासमोर एकदिवसीय क्रिकेटचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला रसिकांनी काही काळ पसंती दिली परंतु धावत्या जगात एक दिवसाचा वेळ देणेही कठीण होऊ लागले तेव्हा सात-आठ तासांचे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट अस्तित्वात आले. हा क्रिकेट प्रकार मात्र रसिकांना भावला आणि टी-२० क्रिकेटला खच्चून गर्दी होऊ लागली. या क्रिकेट प्रकारातील क्रिकेटपटूंच्या कौशल्याबाबत म्हणाल तर सारा आनंदी-आनंदच आहे. या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांचे अक्षरश: मरण होते. फलंदाजांची मात्र चलती आहे. त्यांनी कसेही वेडेवाकडे फटके मारले तरी चालते. कसेही फटके मारा पण धावा काढा हा या क्रिकेट प्रकाराचा आत्मा आहे. विशेष म्हणजे रसिकांना त्यात आनंद मिळतो. कमी चेंडूत किती धावा काढल्या त्याला महत्त्व आले.

चार षटकांमध्ये गोलंदाज आपली कला काय दाखवणार? या क्रिकेट प्रकारामुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र कमालीचा सुधारला आहे. एक वेळ खेळाडूने फलंदाजी-गोलंदाजीत चमक दाखवली नाही तरी चालेल मात्र क्षेत्ररक्षणात तो चमकदारच असला पाहिजे. टी-२० क्रिकेट म्हणजे तुफान फलंदाजी, कंजूष गोलंदाजी, चमकदार क्षेत्ररक्षण आणि भरपूर मनोरंजन. या क्रिकेट प्रकाराने प्रेक्षकांचा वेळ वाचवला आहे आणि त्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. पर्यायाने क्रिकेट मंडळांच्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या तिजो-या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नाइलाजाने का होईना ‘कालाय तस्मै नम:’ असे म्हणत या क्रिकेट प्रकाराला स्वीकारले पाहिजे, स्वीकारले गेले आहे. यंदाच्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे संयुक्त अरब अमिरातीत आयोजन करण्यात आले आहे. एव्हाना १७ ऑक्टोबर रोजी पात्रता फेरीच्या सामन्यांनी स्पर्धेस प्रारंभही झाला आहे.

परंतु ख-या अर्थाने स्पर्धेची सुरुवात झाली ती २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका यांच्यातील सामन्याने. परंतु २४ ऑक्टोबरच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने पाकिस्तानचे बॅटिंग कोच मॅथ्यू हेडनने जी मुक्ताफळे उधळली आहेत ती आक्षेपार्ह आहेत. त्याने या सामन्याची तुलना ‘डॉग फाईट’ (कुत्र्यांची लढाई) अशी केली. म्हणजे त्याने दोन्ही संघांना ‘कुत्रे’ ठरवले. दोन्ही देशांच्या लढतीत कोणताही देश हार मानावयास तयार नसतो असेही तो म्हणाला. हार-जीतच्या संदर्भात हेडन जे काही म्हणाला ते सा-या जगाला माहीत आहे. इतकेच काय पण पाकिस्तान तर या लढतींना ‘धर्मयुद्ध’च मानतो. अर्थात असे मानणे सर्वस्वी चुकीचे आहे. कारण खेळ म्हटला की कोणाची तरी हार किंवा जीत होणारच. लढत ही खुन्नस, जिद्द ठेवून लढली गेली पाहिजे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दरम्यान होणा-या ‘अ‍ॅशेस’ लढती खुन्नसीनेच लढल्या जातात. म्हणून त्यांना ‘पिग फाईट’ किंवा ‘डाँकी फाईट’ असे संबोधायचे काय? हेडन पाकचा बॅटिंग कोच आहे म्हणून त्याने काहीही बरळायचे काय? भारताने स्पर्धेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन्ही सराव सामने दणदणीतरीत्या जिंकले आहेत.

परंतु स्पर्धेतील कोणत्याही सामन्यात काहीही होऊ शकते. म्हणून कोणत्याही संघाला दुबळा किंवा मातब्बर समजून चालत नाही. विशिष्ट दिवशी जो संघ चांगला खेळतो तो संघ जिंकतो. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. आयपीएलचा दुसरा टप्पा अमिरातीत पार पडल्याने भारतीय खेळाडंूना अमिरातीतील हवामान, खेळपट्ट्या यांचा अन्य कोणत्याही संघांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघाला स्पर्धा जिंकण्याची चांगली संधी आहे. त्या अनुषंगानेच पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने यंदाची विश्वचषक स्पर्धा भारत जिंकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. अमिरातीतील एकूण परिस्थिती लक्षात घेता भारतीय संघ इतर सर्व संघांमध्ये सर्वांत धोकादायक वाटतो असेही इंझमाम म्हणाला. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही म्हटले आहे की, भारतीय संघात चांगले मॅचविनर आहेत. गत काही महिन्यांपासून भारतीय खेळाडू अमिरातीत खेळत आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड आहे.

स्पर्धेत एखाद्या सामन्यात हार झाली म्हणजे सारे काही संपले असे होत नाही, अन्यही काही सामने असतात त्यात कसर भरून काढता येते. भारतीय संघाच्या सामर्थ्याची मॅथ्यू हेडनला चांगली जाण आहे. परंतु त्याने भारत-पाक लढतीला ‘डॉग फाईट’ संबोधून स्वत:ची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. काही लोकांच्या डोळ्यात भारतीय संघाचे यश, बीसीसीआयची दादागिरी सलते एवढे मात्र निश्चित. बीसीसीआय पुढील पाच वर्षांत आयपीएलच्या प्रसारण हक्कामधून ५ अब्ज डॉलर्सची कमाई करणार आहे. भारत-पाक लढतीला ‘डॉग फाईट’ असे संबोधून हेडन पाक पैशालाही जागला नाही असे म्हणता येईल, पाक डॉग पिसाळले तर ते नक्कीच हेडनचा चावा घेतील!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या