28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसंपादकीयअभ्यासक्रम अन् गाढवाचे ओझे!

अभ्यासक्रम अन् गाढवाचे ओझे!

एकमत ऑनलाईन

सरकारचे शैक्षणिक धोरण युवकांची पिढी घडवणारे असायला हवे. कारण या पिढीवरच देशाचे भविष्य, भवितव्य अवलंबून आहे. शैक्षणिक धोरणातील धरसोड वृत्ती भावी पिढी बरबाद करणारी ठरू शकते. म्हणून असे निर्णय सखोेल आणि सर्वांगीण विचार करूनच घ्यावे लागतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे, आता ते केवळ म्हटले जाते. देश खरोखरच कृषिप्रधान आहे का यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. कारण कृषि विभागाची पदवी घेणारे विद्यार्थीही आपल्या ज्ञानाचा वापर कृषि क्षेत्रात करताना दिसत नाहीत. स्वत:च्या शेतातसुद्धा राबताना दिसत नाहीत. ते नोकरीच्या मागेच धावताना दिसतात. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला दिसतो. शेतक-यांच्या अडचणी दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश कृषि विभागाला दिले आहेत.

याअंतर्गतच सत्तार यांनी शिक्षकांनाही शेतीचे प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा अद्याप प्रत्यक्षात उतरलेली नाही. पाचवीपासून शेतीचे धडे देणार असल्याचेही सत्तार यांनी म्हटले आहे. शेतीत तरुणांना निपुण करण्याच्या उद्देशाने हे धोरण राबविण्यात येणार आहे. शेतीत अनेक प्रकार असतात. पशुधनाला चारा कसा द्यायचा, कोणता द्यायचा, त्यांची निगा कशी राखायची, गोठा स्वच्छ कसा ठेवायचा अशा अनेक गोष्टी असतात. याचे प्रशिक्षण लहानपणीच विद्यार्थ्यांना दिले तर त्याचे भविष्यात चांगले परिणाम दिसू शकतात. आज काय स्थिती आहे? नोकरी नाही मिळाली तर त्या युवकाला शेती देखील करता येत नाही कारण त्या दृष्टीने त्याला शिक्षणच मिळालेले नसते. त्याला लहानपणापासूनच शेती कशी करावी याचे शिक्षण मिळाले असते तर त्याची उपासमार झाली नसती. म्हणून युवकांना, विद्यार्थ्यांना शेती शिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे. म्हणून सर्वप्रथम शिक्षक तयार करावे लागतील. त्यासाठी प्रथम शिक्षकांना ट्रेनिंग द्यावे लागेल. तरच ते विद्यार्थ्यांना नांगर कसा धरावा ते शिकवू शकतील. त्यासाठी शिक्षकांना शेतीचे प्रशिक्षण देण्याची सत्तार यांची योजना आहे.

पाचवी ते बारावी अशी सात वर्षे विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण दिल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल असे सत्तार यांना वाटते. आपली टोपी फिरवताना सत्तार यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्या मनात जो विचार आहे तो अंतिम नाही. मी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मी केवळ मागणी केली आहे. कारण याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर यासंबंधीचा अंतिम प्रस्ताव ठेवला जाईल आणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. कृषि अभ्यासक्रमाबाबतची सत्तार यांची कल्पना चांगली आहे. अर्थात त्यावर साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे. कृषिमंत्र्यांचे शेतीविषयक विचार पुढे आल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही शालेय शिक्षणाविषयी आपले विचार व्यक्त केले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि त्यांच्या मेंदूचा विकास व्हावा म्हणून शाळांच्या वेळेत बदल करणार असल्याचे आणि गृहपाठबंदीचा विचार असल्याचे म्हटले आहे. लहान मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावरील अभ्यासाचे ओझे कमी झाले पाहिजे तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. यासाठी चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ बंद करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. गृहपाठ बंद झाला पाहिजे, अशी आपली व्यक्तिगत भूमिका असून याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.

लहान मुलांवर अभ्यासाचे ओझे असते हे खरे आहे. अगदी केजीच्या विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅग पाहिल्या तर ते ओझे गाढवांनाही पेलवणार नाही असे आहे ही वस्तुस्थिती आहे. जुन्या पिढीतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे दोन-चार वह्या आणि पुस्तकांवर भागायचे. तेच आजच्या पिढीतील केजी-पहिलीच्या विद्यार्थ्यांचे दप्तर पाहिल्यास बघणा-याची छाती दडपून जाते हे वास्तव आहे. शाळेतील सात-आठ तासांच्या वेळेने मुलांना शारीरिक थकवा येतो. शाळेतून घरी आल्यानंतर ते झोपतात किंवा त्यांच्यात अभ्यास करण्याइतके त्राण रहात नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांनी शाळांची वेळ कमी करण्याची मागणी केली आहे. चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ ही पालकांची मोठी डोकेदुखी असते. मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी त्यांना अधिक ताण येऊ नये. त्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा आणि त्यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग गृहपाठबंदी संबंधीचा निर्णय घेण्याची तयारी करीत आहे. सर्व शिक्षकांप्रति आदर व्यक्त करून गृहपाठबंदीचा मोठा निर्णय सर्वांशी चर्चा करून घेतला जाईल असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

शिक्षक जे काही अर्धा तास शिकवतात ते त्यांनी लक्षपूर्वक शिकवले पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्याची आवश्यकताच भासणार नाही असेही केसरकर म्हणाले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळलेदेखील पाहिजे. या दोहोंची योग्य सांगड घालण्यासाठी शिक्षणपद्धतीत बदलाची आवश्यकता आहे. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी त्यांना इंग्रजी पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून दिली पाहिजेत. स्पर्धा परीक्षेत मुलांना चांगली कामगिरी करता यावी यासाठी शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले पाहिजेत. गृहपाठबंदी संबंधी काही उलट-सुलट मते व्यक्त होत आहेत. पहिली ते चौथी या वर्गांना गृहपाठ देऊ नये असा शालेय शिक्षण विभागाचा विचार असला तरी शहरी भागासाठी ही संकल्पना योग्य आहे पण खेड्यापाड्यात व दुर्गम भागात जेथे पालक निरक्षर असतात त्या ठिकाणी गृहपाठ दिला नाही तर काही मुले अभ्यासाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम योग्य रीतीने समजेल अशा पद्धतीने शिकवण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. पण त्याचे मुलांना कितपत आकलन होते, याचे काही मोजमाप नाही. त्यामुळे घरी त्याच विषयाचा अभ्यास गृहपाठ म्हणून दिला जात असेल तर त्या निमित्ताने पाल्याची उजळणी होईल. म्हणून गृहपाठ बंद होऊ नये.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या मेंदूला नेहमी अतिरिक्त बौद्धिक खाद्य हवे असते. वर्गात शिकवलेल्या सर्व विषयांचा अभ्यास बराच काळ लक्षात रहावा आणि त्याचा अभ्यास व्हावा यासाठी गृहपाठ असतो. शिकवलेल्या गोष्टींचा सराव करण्यासाठी गृहपाठ दिला जातो. पूर्णपणे शिक्षकांवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांचा हळूहळू अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण विद्यार्थी घडणे अभिप्रेत आहे. या दीर्घ व खडतर प्रवासात गृहपाठ महत्त्वाची भूमिका बजावतो. गृहपाठ विद्यार्थ्यांची विचारसरणी, स्मरणशक्ती, कौशल्ये सुधारण्यासाठी मदत करतो. यासाठी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेऊन त्यासाठी लागणारा वेळ, तसेच तो गृहपाठ विद्यार्थ्याला ओझे वाटणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी गृहपाठबंदीचे स्वागत केले आहे. मुलांच्या पाठीवर असणारे ओझे कमी करीत असतानाच अभ्यासाचे ओझे कमी करून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहेत असे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या