32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeसंपादकीयसायबर ड्रॅगन जागा झाला!

सायबर ड्रॅगन जागा झाला!

एकमत ऑनलाईन

पाच-सहा दशकांपूर्वी ‘हिंदी-चिनी, भाई-भाई’ अशी घोषणा देणारा चीन प्रत्यक्षात पाठीत खंजीर खुपसणारा विश्वासघातकी अन् ‘मूँह में राम, बगल में छुरी’ असे वर्तन करणारा बदमाश निघाला. चपट्या नाकाचा, पिंगट बारीक डोळ्यांचा चिनी माणूस कपटी आणि राक्षसी प्रवृत्तीचा असेल याची कल्पना भारतीय राजकीय नेत्यांना आली नाही. हुकूमशाही प्रवृत्तीचा चीन दगा देईल असे वाटलेच नाही. १९६२ साली चीनने भारतावर युद्ध लादले अन् भारतीय नेत्यांचे डोळे खाडकन् उघडले नव्हे पांढरे झाले. भारताची युद्धाची काहीच तयारी नव्हती. भारतीय सेनेच्या हातात शस्त्रे नव्हती, पायात पायमोजे-बूटही नव्हते. परिणामी युद्धात भारताला सडकून मार खावा लागला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या दगाबाजीचा इतका धसका घेतला की त्यामुळेच त्यांनी जगाचा निरोप घेतला असे म्हणतात.

चीन आणि भारत यांच्यातील सीमावाद हा दोन्ही देशांच्या जन्मापासूनचा आहे. इंग्रजांचे भारतावर राज्य होते तेव्हा त्यांनी मॅकमोहन रेषा आखली होती; परंतु चीनने ती कधीच मान्य केली नाही. आजही दोन्ही देशांच्या सीमा कोणत्या आहेत याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही वादात आहे. आजही दोन्ही देशांचे सैन्य या भागात येते आणि गस्त घालून जाते. त्यावरून दोन्ही देशांत छोट्या-मोठ्या चकमकी झडतात आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. पाकिस्तान हा भारताचा परंपरागत शत्रू. त्यामुळे भारताचा शत्रू तो आपला मित्र हे चिनी धोरण. या परिस्थितीमुळे भारताला नेहमीच ‘जागते रहो’ वर शक्ती खर्च करावी लागते. भारतीय लष्कराने १९९६ सालच्या करारावेळी परराष्ट्र खात्याला ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ शब्दाऐवजी ‘नियंत्रण रेषा’ हा शब्द वापरण्यास सांगितले होते. म्हणजे ज्याचे सैन्य ज्या भागावर उभे आहे तिथपर्यंत त्याची सत्ता. तत्कालीन राजकीय नेतृत्वाच्या कचखाऊ धोरणामुळे ‘नियंत्रण रेषा’ ऐवजी ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ हाच शब्द राहिला त्यामुळे चीनला भारतीय सीमेवर अतिक्रमण करण्याची संधी मिळत असते असा एक मतप्रवाह आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय नेतृत्वामुळे आणि चातुर्यामुळे महासत्तांपैकी एक गणल्या जाणा-या चीनला जरब बसली आहे. सीमेवर जाऊन चीनला ठणकावण्याची हिंमत, धमक मोदींमध्ये आहे. त्यांनी चीनची आर्थिक नाकेबंदी केली आहे त्यामुळे चिनी सैन्याला दोन पावले मागे जावे लागले आहे. चीनला भारताच्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे असे मोदी भक्तांना वाटते नव्हे तसे त्यांचे ठाम मत आहे. कदाचित सीमेवर भारतीय सेना ‘हर हर महादेव’ अशी गर्जना करण्याऐवजी ‘हर हर मोदी’ अशी गर्जना करत असेलही परंतु सद्यस्थितीत भारताविरुद्धच्या चिनी कारवाया सुरूच आहेत असे म्हणता येईल. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने नुकताच प्रसिद्ध केलेला एक अहवाल. हा अहवाल मैदानी युद्धासंबंधीचा नव्हे तर चिनी हॅकर्सनी भारतात केलेल्या सायबर घुसखोरीसंबंधीचा होय. चीनच्या ‘रेडएको’गटाच्या हॅकर्सनी संगणकीय विषाणूद्वारे भारताची वीज संचालन आणि नियंत्रण प्रणाली हॅक केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

गतवर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला होता. महाराष्ट्राच्या वीजपुरवठा यंत्रणेचे संचालन आणि नियंत्रण करणा-या संगणक यंत्रणेत परदेशातून सायबर घुसखोरी झाल्याने १२ ऑक्टोबरला मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला होता. मुंंबईच्या काही भागात तर १२ तास विजेचा पत्ता नव्हता. या हल्ल्यामागे देशाची आर्थिक राजधानी ठप्प करण्याचा चीनचा डाव होता असे आता म्हटले जात आहे. इतके दिवस देशात छोट्या-मोठ्या चिनी वस्तूंचा सुळसुळाट होता. चिनी बनावटीच्या वस्तू, खेळणी, तंत्रज्ञानाचा जिकडे तिकडे बोलबाला होता. ही ‘चायना मेड’ उत्पादने चालली तर दीर्घकाळ चालायची अथवा त्यांचा खेळ एका दिवसात किंवा काही तासांत समाप्त व्हायचा. शिवाय ती कमी किमतीत मिळायची. परंतु यामागचा चिनी कपटी डाव भारतीयांच्या लक्षातच आला नाही. आजही भारतात अनेक हार्डवेअर, डिव्हायसेस बाहेरून येतात. स्वस्त आणि मस्त उत्पादनांवर भारतीय खुश असायचे.

या तंत्रज्ञानानेच भारतीय जनजीवन पोखरले गेले आहे. त्याचा फटका किती जबर असतो याची कल्पना आता कुठे येऊ लागली आहे. मुळात ड्रॅगनचा विषारी फुत्कार भारतीयांच्या लक्षातच आला नाही. चीनच्या हॅकर्स आर्मीमध्ये ३ लाख हॅकर्स आहेत म्हणे. त्यांना चिनी सरकार निधी पुरवठा करते. चिनी साम्राज्यवादी धोरणाचा हाच पाया आहे. सागरी, हवाई आणि भूदलावर साम्राज्य गाजवण्याचा कुटील हेतू आता कुठे हळूहळू लक्षात येऊ लागला आहे. सा-या जगाला याची कल्पना येऊ लागली आहे. मोदी सरकारने हा डाव ओळखला असून त्यातूनच स्वदेशी चळवळीने जन्म घेतला आहे. मुंबईचा वीजपुरवठा बंद पाडण्यामागे ड्रॅगनचा हात होता असे ‘रेकॉर्डेड फ्युचर’कंपनीच्या अहवालात म्हटले आहे. मुंबईतील वीजपुरवठा खंडित करण्यामागे चीनचा काहीतरी हेतू असावा किंवा त्यातून त्याला ‘भारताने सीमेवर प्रतिकार केला तर आम्ही विपरीत मार्ग अवलंबू शकतो हे सुचवायचे होते’ असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.

अर्थातच चिनी हॅकर्सनी संगणक प्रणालीत घुसखोरी करून मुंबईचा वीजपुरवठा बंद पाडल्याच्या आरोपाचा चीनने इन्कार केला आहे. भारताच्या वीज नियंत्रण प्रणालीत आम्ही घुसखोरी केलेली नाही. त्यामुळे हे आरोप बेजबाबदारपणाचे आणि वाईट हेतूने केलेले आहेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. खरे तर आता भारताला अशा ‘चोराच्या उलट्या बोंबां’ची सवय झाली आहे. चीन काय किंवा पाक काय ‘चोराच्या उलट्या बोंबा’ मारतच असतात. भारताला आता प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. आपली शेंडी दुस-याच्या हातात देऊन उपयोग नाही. कारण त्याचे झटके भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असतात. म्हणून प्रगत तंत्रज्ञान असो किंवा संगणकीय सायबर क्षेत्र असो ते पूर्णपणे आत्मसात करण्याची गरज आहे. याबाबत दुस-यावर विसंबून राहिले की आत्मघात होणारच.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळेना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या