21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसंपादकीयमराठीचा डंका

मराठीचा डंका

एकमत ऑनलाईन

मनोरंजन क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणा-या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवार, २२ जुलै रोजी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ला तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणला पुरस्कार देण्यात आला. अजय देवगणचा हा चित्रपट खूपच गाजला होता. अजय देवगणने तानाजी मालुसरेची भूमिका साकारली होती. मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा
पुरस्कार मिळाला. यंदा मराठीला एकूण नऊ पुरस्कार मिळाले.‘गोदाकाठ’ आणि‘अवांछित’साठी किशोर कदम यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला. राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘मी वसंतराव’साठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून आशुतोष गोवारीकर निर्मित ‘तुलसीदास ज्युनियर’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला. मराठी चित्रपटांच्या विभागात अमोल गोळे दिग्दर्शित ‘सुमी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर यांना जाहीर झाला आहे. विवेक दुबे दिग्दर्शित ‘फ्युनरल ‘या चित्रपटाला सामाजिक समस्येवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला तर शंतनु रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा ‘रौप्य कमळ पुरस्कार’ जाहीर झाला. ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून तरुणीच्या स्वप्नांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. महिला वर्गासाठी पैठणी म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आपल्या कपाटात इतर महिलांपेक्षा उठावदार आणि चारचौघीत भारी दिसेल अशी पैठणी असावी अशी इच्छा प्रत्येक महिलेची असते.

हीच इच्छा या चित्रपटातील अभिनेत्रीची दाखवण्यात आली आहे. ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी प्रख्यात माजी गायक, अभिनेते वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार तर याच चित्रपटासाठी सर्वोत्तम ध्वनी संयोजनाचा पुरस्कार अनमोल भावे याला जाहीर झाला आहे. ‘जून’ या चित्रपटासाठी अभिनेता सिद्धार्थ मेनन यांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉन फीचर चित्रपटांच्या विभागात मराठी भाषेतील ‘कुंकूमार्चन’ चित्रपटाला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून पुण्याच्या एमआयटी संस्था निर्मित ‘परिह’ या चित्रपटाचे नाव जाहीर झाले आहे. ‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणा-या कलावंतांचा अभिमान आहे’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध क्षेत्रांतील चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे. पूर्वी मराठी चित्रपट प्रामुख्याने तमाशाप्रधान धाटणीचे असायचे.सामाजिक विषय हाताळणारे ‘उंबरठा’ सारखे चित्रपट अभावानेच चमकायचे. राजकारणावर आधारित ‘सिंहासन’सारखा चित्रपट कधीतरीच दिसायचा. ‘माहेरची साडी’, ‘सतीचं वाण’ यासारख्या कौटुंबिक चित्रपटांची मात्र रेलचेल होती. नव्या युगाचा कानोसा घेणारे चित्रपट मात्र अभावानेच निर्माण होतात असे दिसून आले आहे.

अलीकडे मात्र मराठी चित्रपटांच्या कक्षा ब-याच रुंदावताना दिसत आहेत. त्याचे स्वागत करायलाच हवे. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणा-या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ सालापासून करण्यात आली. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली. त्यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाला मिळाला होता. आजच्या मराठी चित्रपटांनी अथवा चित्रपट निर्मात्यांनी ‘श्यामची आई’चा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चित्रपट निर्मिती करावयास हवी. दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. अलीकडे वेबमालिकांचे प्रस्थ खूपच माजले आहे. ओटीटीमुळे या मालिकांमधून अनेक विषय हाताळले जात आहेत. या वेबमालिकेत एक नाही अनेक प्रेमकथा आहेत. आतापर्यंत चित्रपटांतून जे सांगता आले नाही, मांडता आले नाही ते या वेबमालिकेतून मांडले जात आहे. जगभरात प्रेमाची भावना ही सारखीच आहे. काळानुसार प्रेमामुळे निर्माण झालेले नातेसंबंध बदलत राहतात.

सुरुवातीच्या काळात मुली फार जाहीरपणे प्रेम व्यक्त करू शकत नव्हत्या, आज त्या बेधडक प्रेमाची कबुली देतात. पूर्वी त्या लाजत होत्या, आता त्या लाजत नाहीत. असो. कला ही आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेली असते. एक व्यक्ती म्हणून आजूबाजूची माणसं, भवताल, घटना समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘फ्युनरल’सारखे सामाजिक विषय चित्रपटातून अधिकाधिक हाताळले जावेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह विविध विभागांतील पाच पुरस्कार मिळवणा-या मल्याळम चित्रपट ‘सुराराई पोटु’ने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली. सध्या ओटीटीपासून चित्रपटगृहांपर्यंत सगळीकडेच दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका वाजत आहे. ‘सुराराई पोटु’साठी अभिनेता सूर्या आणि ‘तान्हाजी’साठी अभिनेता अजय देवगण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला. कोरोनामुळे गत दोन वर्षे मनोरंजन उद्योगाचे चक्र थंडावले होते. त्यामुळे यंदा २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी देशभरातून फ क्त फीचर फिल्म विभागात किमान ४०० चित्रपटांच्या प्रवेशिका येतात. यंदा मात्र बहुधा कोरोना काळाचा परिणाम म्हणून की काय केवळ २९५ प्रवेशिकाच आल्या. त्यातून निवडक ६६ चित्रपट मुख्य परीक्षकांकडे पाठवण्यात आले.

चित्रपटांवर आधारित लेखनासाठीही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात. यंदा सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान ‘द लॉन्गेस्ट किस’ या किश्वर देसाई लिखित पुस्तकाला मिळाला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर दाक्षिणात्य चित्रपट जशी मोहर उमटवतात तशी मोहर मराठी चित्रपटसृष्टीला का उमटवता येत नाही यावर विचारमंथन व्हायला हवे. मराठी चित्रपटनिर्माते यासाठी फारशी मेहनत घेत नाहीत असे नाही परंतु त्यांचे परिश्रम कुठेतरी नक्कीच कमी पडत असावेत. ‘फ्युनरल’सारख्या चित्रनिर्मितीसाठी निर्माता रमेश दिघे आणि दिग्दर्शक विवेक दुबे यांनी खूप मेहनत घेतली होती. ‘मृत्यू’सारखा विषय हाताळायचा असल्याने ते २०१० पासून या चित्रपटाची तयारी करत होते. त्यासाठी लोकांच्या भेटीगाठी, संशोधन अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी चित्रनिर्मिती केली आहे. मृत्यूसारखा कडवट विषय अत्यंत खेळकरपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हे मोठे अवघड काम होते. चित्रनिर्मिती हे सांघिक काम आहे. एक मात्र खरे, मराठी चित्रपट आणि कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सातत्याने आपली दखल घ्यायला लावली आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या