27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसंपादकीयहताश महासत्ता!

हताश महासत्ता!

एकमत ऑनलाईन

जगातील एकमेव महासत्ता म्हणून मिरविणा-या अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील उव्हाल्दे गावात एका प्राथमिक शाळेत माथेफिरू युवकाने घडविलेल्या हत्याकांडाने केवळ ही महासत्ता व अमेरिकी जनताच नाही तर जगभरातील संवेदनशील नागरिक अक्षरश: सुन्न झाले आहेत. माथेफिरू युवकाच्या अंदाधुंद गोळीबारात मरण पावलेल्या चिमुकल्यांचा अपराध तरी काय? हाच आर्त टाहो जगभर फोडला जातो आहे आणि त्याच जोडीला या हत्याकांडास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होतो आहे. तसे शस्त्रास्त्रांच्या अंदाधुंद व विकृत वापराचे प्रकार अमेरिकेसाठी नवे नक्कीच नाहीत. यापूर्वीही महासत्ता म्हणून मिरविणा-या या देशात अशा कैक घटना घडल्या आहेत व घडत आहेत. तरीही त्यावर अंकुश निर्माण करण्यात बलाढ्य मानल्या जाणा-या या देशाला अद्याप यश आलेले नाहीच. त्यामुळेच आजवरची इतिहासातील सर्वांत नृशंस हत्याकांडाची ही घटना घडली आहे.

साल्वादोर रामोस या माथेफिरू युवकाने हे नृशंस हत्याकांड घडविले. त्यात १९ शालेय विद्यार्थी व दोन प्रौढ असे २१ जण ठार झाले. सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात हा माथेफिरू युवकही ठार झाला. या हत्याकांडामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी प्राप्त माहितीनुसार या माथेफिरूच्या कृत्याचे कारण तसे अत्यंत किरकोळच! हा युवक याच शाळेत शिकायला होता. अडखळत बोलण्यावरून त्याला त्यावेळी शाळेतले त्याचे त्यावेळचे सोबती चिडवायचे! त्याची आई ड्रग्जच्या आहारी गेलेली. त्यामुळे त्यातून त्याच्या घरी सतत वाद व्हायचे. या सगळ्या स्थितीमुळे त्याने शाळा सोडली व एका स्थानिक स्टोअरमध्ये नोकरी पत्करली. वयाची १८ वर्षे नुकतीच पूर्ण करणा-या या माथेफिरूने अर्ध स्वयंचलित ‘एआर-१५ हँडगन’ खरेदी केली. अमेरिकेत १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला कायद्यान्वये स्वसंरक्षणासाठी शस्त्र खरेदी करण्याची परवानगी असल्याने त्याला ही बंदूक खरेदी करणे सहज शक्य झाले. हत्याकांड घडविण्यापूर्वी त्याने मैत्रिणीला ‘आज काही तरी घडवणार’ असा मॅसेजही पाठविला होता. या युवकाने अगोदर आपल्या आजीवर गोळीबार केला आणि नंतर प्राथमिक शाळेत जाऊन हे नृशंस हत्याकांड घडविले. २०२० मध्ये अमेरिकेत गोळीबाराने मृत्यूच्या १९,३५० घटना घडल्या होत्या. तेव्हापासून अमेरिकेत शस्त्रास्त्र नियंत्रण कायदा राबविण्यावर चर्चा झडत आहेत.

मात्र, प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी होत नाहीच. जगाच्या तुलनेत अमेरिकेत सर्वांत जास्त सामूहिक हत्याकांडाच्या घटना घडत असतानाही त्या रोखण्यात ही महासत्ता असमर्थ ठरते, हे आश्चर्यकारकच! हे घडतेय कारण अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांना शस्त्रास्त्र नियंत्रण कायदा राबविण्यास देशातील ‘गन लॉबी’ अर्थात नॅशनल रायफल असोसिएशनच्या कडव्या विरोधाची भीती वाटते. त्यामुळे बहुसंख्य अमेरिकी नागरिक अशा प्रत्येक घटनेनंतर हा कायदा लागू करण्याची मागणी करत असतानाही अमेरिकेत या कायद्याची अंमलबजावणी होत नाहीच. आता या ताज्या हत्याकांडावर शोकसंतप्त व भावूक झालेल्या अमेरिकी अध्यक्षांनी देशवासियांना संबोधित करताना निर्णायक कृतीची वेळ आली आहे, हे अमेरिकेतील लोकप्रतिनिधींना पटण्यासाठी यापेक्षा अजून काय गंभीर घडावे लागेल? असा हताश प्रश्न उपस्थित केला आहे. बायडन पुढे म्हणाले की, बलाढ्य बंदूक उत्पादकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता कृतीची गरज आहे. अशा रक्तलांछित घटना रोखण्यासाठी आपल्या देशाकडे कणा नाही का? जगभरात कुठेही काहीही घडले की, लगेच पोलिसी थाटात डोळे वटारणा-या व कडक कारवाईचे इशारे देणा-या महासत्तेचे अध्यक्ष आपल्याच देशातील शस्त्रास्त्रांच्या अनिर्बंध वापराबाबत एवढे असहाय्य कसे, हे जगभरातील नागरिकांसाठी एक मोठे कोडेच! त्याचे उत्तर शोधले तर मात्र ‘घरोघरी मातीच्याच चुली’ ही म्हण यथार्थ पटते! अमेरिकी सरकारने शस्त्रास्त्र नियंत्रण कायदा राबवू नये म्हणून अमेरिकेतील ‘गन लॉबी’दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांना बक्कळ निधी देते.

त्यामुळे या ‘गन लॉबी’ला रोखले पाहिजे हे तेथील सर्वच लोकप्रतिनिधींना कळतंय पण वळत मात्र नाहीच. त्यामुळेच अशा घटना घडल्या की सगळेच लोकप्रतिनिधी इमानेइतबारे मृतांना श्रद्धांजली वाहतात. मात्र, कायद्याच्या अंमलबजावणीस सभागृहात विरोध करतात. हा अमेरिकी जनतेच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरचा घाला आहे, असे गळे काढत ‘गन लॉबी’ची तळी उचलतात. त्यामुळेच वारंवार अशी नृशंस हत्याकांडे घडत असूनही जगाला सदोदित शहाणपणाचे डोस देणा-या या महासत्तेला स्वत:च्या देशात अशी हत्याकांडे रोखण्यासाठी आवश्यक असणा-या कायद्याची अंमलबजावणी काही केल्या करता येत नाहीच. विशेष म्हणजे या इच्छाशक्तीच्या अभावाला अमेरिकेतील दोन्ही पक्ष अजिबात अपवाद नाहीत. जेव्हा जेव्हा हा कायदा लागू करण्याचे प्रयत्न अमेरिकेत झाले तेव्हा तेव्हा तेथील दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी ते एकत्रितरीत्या हाणून पाडले आहेत. थोडक्यात काय तर अमेरिकेतील ‘गन लॉबी’ अमेरिकी जनतेला व नेत्यांना पुरून उरली आहे. त्याचे कारणही तेवढेच स्पष्ट आहे की, शस्त्रास्त्रांच्या अमाप विक्रीतून ही लॉबी प्रचंड गब्बर बनली आहे व तिला तशी बनवण्यात भरमसाठ व मुक्तहस्ते शस्त्र खरेदी करणा-या अमेरिकी जनतेनेच हातभार लावला आहे. महासत्ता म्हणून जगावर पोलिसी धाक ठेवणारी अमेरिका जगातील शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा व्यापारी आहे. त्यामुळेच जगातल्या देशांना आपापसांत झुंजविणे व आपली शस्त्रे विकण्याचा व्यापार साधणे हेच अमेरिकेचे दीर्घकाळचे धोरण राहिलेले आहे.

या व्यापारातूनच बक्कळ पैसा कमावणारी ‘गन लॉबी’ त्यामुळेच अमेरिकी सरकारसाठीही डोईजड झाली आहे. बायडन आज भावूक होऊन कितीही कडक पवित्रा घेण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता कमीच! त्यांची ही हताशाच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. ‘बंदूक माणसे मारीत नाही तर माणसेच माणसं मारतात’ हा गन लॉबीचा दीर्घकाळापासूनचा युक्तिवाद स्वत:च्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी कायमच राहिला आहे. त्यातूनच शस्त्रास्त्र हे स्वसंरक्षणासाठी आवश्यकच या विचारप्रवाहाने अमेरिकेत पद्धतशीर उचल खाल्ली आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावावरचा हा स्वैराचार सामूहिक हत्याकांडे घडून नागरिकांचे मूलभूत अधिकार धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरत आहे. मात्र, त्यावर कठोर निर्बंध आणण्यात जगाला शहाणपण वाटत फिरणारी महासत्ता स्वत: मात्र अपयशीच ठरली आहे. दिव्याखाली अंधार म्हणतात तो हाच! बायडन हा अंधार दूर करण्यात कितपत यशस्वी ठरतात, हे आता पहावे लागेल. त्यातूनच अमेरिकेतील ही हत्याकांडे रोखली जाणार की, आणखी वाढत जाणार हे ठरणार आहे. शेवटी जबाबदारीशिवाय स्वातंत्र्य वा अधिकार म्हणजे स्वैराचाराला आमंत्रण, हेच खरे, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या