27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeसंपादकीयउद्ध्वस्त धर्मशाळा!

उद्ध्वस्त धर्मशाळा!

एकमत ऑनलाईन

बदल हा निसर्गाचा नियम आहे. मानवाने कितीही तांत्रिक-वैज्ञानिक प्रगती केली तरी शेवटी मानवी जीवन हे पूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने निसर्गाचा हा मूलभूत नियम जसा मानवी जीवनाला लागू होतो तसाच तो मानवी जीवनातील प्रत्येक व्यवहाराला आणि हे व्यवहार पार पाडण्यासाठी उभारण्यात आलेल्या संस्था, संघटनांना लागू होतो. कालानुरूप परिस्थिती बदलते व बदलत्या परिस्थितीनुसार काम करण्यासाठी कामाची पद्धत व रचना बदलावी लागतेच! कुठल्याही बाबींसाठी हा नियम तंतोतंत लागू होतोच! हा नियम पाळला गेला नाही की, मग कुठलीही संघटना, संस्था कितीही उदात्त हेतूने स्थापन झाली असली व कितीही आवश्यक असली तरी ती कालबा ठरण्यास, मोडकळीला येण्यास सुरुवात होते व ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ बनते!

जगात दुस-या महायुद्धाने केलेल्या प्रचंड विध्वंसानंतर युद्ध टाळण्यासाठी, संहार रोखण्यासाठी व सर्व तंटे समन्वयाने, चर्चेने सोडवून जागतिक शांतता कायम करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा जन्म झाला. जागतिक पातळीवर शांतता व सुरक्षितता कायम करण्यासाठी काम करताना जगातील प्रत्येक सार्वभौम राष्ट्राचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे, जागतिक संकट आल्यावर त्याचा मुकाबला करण्यासाठी नेतृत्व करणे व गरीब सदस्य राष्ट्रांना मार्गदर्शन व मदत देणे, अशीच अपेक्षा ठेवून या संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती.

या उदात्त हेतूमुळेच जगातील सर्व देश या संघात सहभागी झाले. सध्या या संघाचे वयोमान पाऊणशे वर्षांचे आहे. योगायोगाने पंचाहत्तरावी साजरी करताना जगावर सध्या कोरोना महामारीचे ‘न भूतो न भविष्यति’ असे संकट कोसळले आहे. मागच्या आठ महिन्यांपासून जगातील प्रत्येक देश या संकटाशी प्राणपणाने लढतो आहे. मात्र, हे संकट परतवून लावण्यात अद्याप यश आलेले नाही. या आरोग्य संकटातून जगातील प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला जोरदार तडाखे बसले आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्थाच प्रचंड संकटात सापडली आहे. याला अपवाद एकच देश, तो म्हणजे या रोगाचा जन्म जिथून झाला तो चीन! चीनच्या वुहान प्रांतातून ही महामारी जन्मली व जगभर पसरली. मात्र, चीनने त्याची सत्य माहिती जगाला अद्यापही दिलेली नाहीच.

३० सप्टेंबर रोजी भुकंपाला २७ वर्ष पूर्ण, काळ्या आठवणी मनामनात

विशेष म्हणजे अवघ्या जगाला या संकटावर अद्याप कुठलाही उपाय सापडलेला नसताना चीन मात्र कोरोनामुक्त झालाय व या देशाची अर्थव्यवस्था कोटीच्या कोटी उड्डाणे घेते आहे. हा सगळा प्रकार प्रचंड संशयास्पद व शंका-कुशंका निर्माण करणाराच! अमेरिकी अध्यक्षांनी तर थेट चीनवर ही महामारी पसरविण्याचा आरोपच केलाय! त्याला ‘राजकीय लाभा’च्या हेतूचा रंग दिला जात असला तरी जगातील इतर राष्ट्रांमध्येही चीनच्या वर्तणुकीने या देशाबाबत संशयकल्लोळ निर्माण केला आहे. अशावेळी जागतिक पालकत्वाच्या भूमिकेत वावरणा-या संघटना काय करतायत? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच!

जागतिक आरोग्य संघटनेची कोरोना संकटकाळातील भूमिका व वर्तणूक तर संशयास्पद आणि आता हास्यास्पद ठरते आहे. जागतिक आरोग्य संकटात जी संघटना जगातील सर्व देशांसाठी मार्गदर्शक व आधार ठरायला हवी, तीच स्वत:च्या वर्तणुकीने संशयाच्या भोव-यात सापडली आहे आणि दर दिवसाला भूमिका बदलल्याने चक्क थट्टेचा विषय बनली आहे.अशावेळी संयुक्त राष्ट्रसंघाकडे जगातील सर्व देशांचे डोळे लागलेले असताना हा संघ काय करतोय? तर या सगळ्या परिस्थितीचा मूकदर्शक बनला आहे. कोरोना परिस्थितीने यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाची प्रत्यक्ष आमसभा होऊ शकली नाही. मात्र, व्हर्च्युअल पद्धतीने ती पार पडते आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले आणि त्यांनी अचूकपणे व नेमक्या शब्दांत ही खदखद व्यक्त केली.

ही केवळ भारताची एकट्याची नव्हे तर जगातील सर्वच देशांची, विशेषत: गरीब व विकसनशील देशांची भावना, खदखद आहे. आणि ती केवळ कोरोना संकटामुळे निर्माण झालेली नाही तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७५ वर्षांच्या प्रवासातील कामकाजाच्या पद्धतीने निर्माण झाली आहे. महायुद्ध टाळण्यासाठी या संघाचा जन्म झाला व आजवर तिसरे महायुद्ध न झाल्याने त्याचा हेतूही सफल झाला, हे मान्यच! मात्र, हे पूर्णसत्य नाहीच. कारण संघाच्या स्थापनेनंतर प्रत्यक्ष महायुद्ध झालेले नसले तरी जगातला विविध प्रकारे होणारा संहार थांबलेला नाही की, जगात चिरकाल शांतताही प्रस्थापित झालेली नाही. दहशतवादाच्या रूपाने मानव संहार सुरूच आहे आणि विस्तारवादी अजेंडा राबविणा-या, जगावर प्रभुत्व निर्माण करू इच्छिणा-या देशांच्या कुरापती सुरूच आहेत.

केंद्र सरकारने दिला इशारा : हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार; सण मास्क घालूनच करा साजरे

मात्र, त्यावर संयुक्त राष्ट्रसंघाला फारसे काही करता आलेलेच नाही. एवढेच काय पण दोन राष्ट्रांमधील तंट्यांवरही कित्येक वर्षे उलटूनही तोडगा काढता आलेला नाहीच. ही प्रकरणे भिजत घोंगडे बनून राहिली आहेत. काश्मीर प्रश्न त्याचा सर्वांत चांगला पुरावा! हे असे का घडले? तर या संघावर असलेले पाच बड्या राष्ट्रांचे वर्चस्व! या पाच देशांच्या राजकीय सोयीनेच निर्णय होत गेल्याने या संघाबाबत इतर देशांची असणारी विश्वासार्हता लयाला गेली आहे आणि आदर तर पुरता धुळीला मिळाला आहे.त्यातही सर्वांत महत्त्वाचा व चिंतेचा मुद्दा आहे तो सुरक्षा परिषदेचा! अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन हे त्यावेळचे बलाढ्य असलेले पाच देश या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य आहेत व त्यांनाच नकाराधिकार प्राप्त आहे.

इतर दहा देशांना दर दोन वर्षांसाठी आलटून-पालटून सदस्यत्व दिले जाते. खरं तर जागतिक परिस्थितीत आता प्रचंड बदल झाले आहेत. शिवाय ज्या पाच बड्या देशांकडे भांडणे मिटवण्यासाठी वडीलकीचा अधिकार देण्यात आला होता त्या देशांनी स्वत:च्या वर्चस्वासाठी व राजकारणासाठी या अधिकाराचा आपल्या सोयीने कसा वापर केला आणि आजही करतात, याचा अनुभव जगातील सर्वच राष्ट्रांनी पुरेपूर घेतलाय. या बड्या राष्ट्रांमध्येच असणारा संघर्ष व धुसफूस लपून राहिलेली नाहीच! शिवाय आता तर चीनचा विखारी विस्तारवादी अजेंडा आणि त्यासाठी हा देश आक्रमकतेसह वापरत असलेले सर्वच पर्याय जगासमोर आले आहेत, याची झळ भारतासह अनेक शेजारी राष्ट्रे सोसतायत.

अशावेळी संयुक्त राष्ट्रसंघाची मूकदर्शक व बोटचेपी भूमिका या संघाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. भारतासारखा मोठी लोकसंख्या असलेला खंडप्राय व कायम शांततेचा पुरस्कर्ता देश जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला असतानाही केवळ चीनच्या नकाराधिकाराच्या हक्काने भारत आपल्या अधिकार व हक्कापासून कायम वंचित राहतो. जर्मनीसारख्या देशांना कायम डावलले जाते. हा अन्याय जग किती दिवस सोसणार? हा खरा प्रश्न! संयुक्त राष्ट्रसंघात कालानुरूप बदल करून त्याची रचना, कार्यपद्धती सुधारली तरच त्याची सर्वमान्यता व विश्वासार्हता, आदर, धाक कायम राहील. बदलत्या काळातील बदलत्या संकटावरील लढ्याचे नेतृत्व ही संघटना करू शकेल आणि एका उदात्त हेतूने जन्माला आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ, सुरक्षा परिषद, जागतिक आरोग्य संघटना या संघटना, संस्थांचे अस्तित्व कायम राहील. अन्यथा या उद्ध्वस्त धर्मशाळाच ठरतायत, हे निश्चित! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून ठामपणे व अचूक हे सत्य जगासमोर मांडले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या