22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeसंपादकीयडिजिटल क्रांती!

डिजिटल क्रांती!

एकमत ऑनलाईन

डिजिटल भारतातील संवेदनशील क्षेत्रास, आंतरजालास अधिक गतिमान करणा-या तंत्रक्रांतीचा शनिवार १ ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला. देशाच्या संपर्क क्षेत्रात क्रांतिकारी ठरणा-या ‘५ जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीच प्रणाली आहे. भारतीय मोबाईल परिषदेच्या (आयएमसी) व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी यांनी ‘५ जी’ प्रणालीचे उद्घाटन केले. या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे, असे ते म्हणाले. या सेवेमुळे देशात इंटरनेट सुसाट होणार असून देशातील १३ शहरांत ही सेवा लगेच उपलब्ध होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरांचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत १३ शहरांमध्ये ५-जी इंटरनेट सेवा सुरू होईल. त्यानंतर हळूहळू ५-जी इंटरनेट सेवेचे जाळे देशभर विस्तारत जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई,पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या १३ शहरांमध्ये ५-जी सेवा सुरू होणार आहे. ५-जी इंटरनेट सेवा देण्याच्या स्पर्धेत रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या दूरसंचार क्षेत्रातील तीन महत्त्वाच्या कंपन्यांचा समावेश आहे. इतके दिवस २ जी, ३ जी आणि ४ जी प्रणालीसाठी आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावे लागत होते. आता संपूर्ण स्वदेशी बनावटीची ५ जी प्रणाली विकसित करून भारताने इतिहास घडविला आहे. अतिवेगवान इंटरनेट शिक्षण, आरोग्य आणि शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे. नवा भारत केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक म्हणून राहणार नाही तर या तंत्रज्ञानाचा विकास आणि अंमलबजावणीतही तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

५ जीच्या आगमनामुळे भारताने दूरसंचार तंत्रज्ञानात पहिल्यांदाच जागतिक मापदंडाशी बरोबरी साधली आहे. हे तंत्रज्ञान केवळ जलदगती इंटरनेट सुविधेपुरतेच मर्यादित नाही तर यात लोकांचे जीवनमान बदलण्याची क्षमता आहे. ५ जी तंत्रज्ञानामुळे विनाअडथळा नेटवर्क कव्हरेज, हाय डेटा रेट आणि उच्च दर्जाची भरवशाची दूरसंचार सुविधा मिळणार आहे. ऊर्जा कार्यक्षमता, स्पेक्ट्रम कार्यक्षमता आणि नेटवर्क कार्यक्षमतादेखील वाढणार आहे. अब्जावधी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ उपकरणे जोडण्यास या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. या सेवेमुळे टेलीसर्जरी आणि चालकरहित तंत्रज्ञानावर चालणा-या गाड्या यासारख्या अतिशय महत्त्वाच्या सेवा उपलब्ध होणे शक्य होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ४ जी सेवेपेक्षा ५ जी सेवेची गती दहा पटींनी अधिक असणार आहे. या सेवेमुळे रोबोटिक शस्त्रक्रिया अचूकपणे करता येतील तसेच घरबसल्या शिक्षण घेणे सुलभ होईल. ऑनलाईन खरेदी अधिक गतीने करता येईल. शेअर बाजारातील घडामोडी अधिक वेगाने समजणे शक्य होईल. मोबाईलमध्ये इंटरनेटचा वेग वाढल्याने मोबाईलवर केली जाणारी कामे वेगाने आणखी सहजतेने करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे चित्रपट, विविध गेम्स, व्हीडीओ, विविध अ‍ॅप्स यांसह अन्य अनेक गोष्टी कमी वेळेमध्ये आणि सहजपणे डाऊनलोड करणे शक्य होणार आहे तसेच जे व्हीडीओ कॉल्स केले जातात त्यांचा दर्जाही या सेवेमुळे सुधारणार आहे.

भारतात सध्या इंटरनेटचा वेग ५४ मेगाबाईट प्रति सेकंद (एमबीपीएस) असा आहे. ५ जी सेवेमुळे या वेगात किमान दहा पट वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी या सेवेचा शुभारंभ होताच एअरटेल कंपनीने यामध्ये आघाडी घेऊन मुंबईसह आठ शहरांमध्ये ही सेवा सुरू केली. आता एअरटेल पाठोपाठ रिलायन्स जिओ कंपनीही ही सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. या दोन कंपन्यांच्या तुलनेत व्होडाफोन, आयडिया ही कंपनी बरीच मागे असून त्या कंपनीकडून ५ जी सेवेसाठी काही ठोस कालावधी घोषित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पनवेल येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहून शुभारंभ कार्यक्रमात भाग घेतला. ५ जी सेवेचा शुभारंभ हा क्रांतिकारक क्षण असल्याचे सांगून या नव्या तंत्रज्ञानामुळे शिक्षणासह सर्वच क्षेत्रात राज्याची प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त केला. इंटरनेटला मिळणा-या वेगाचा फायदा अभ्यासासाठी करून घ्या. गेम आणि सिनेमे पाहण्यासाठी करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी उगवत्या पिढीला दिला. एक प्रकारे ५ जी सेवा ही सदुपयोगासाठी वापरली जावी असेही ते म्हणाले. भारताने या सेवेचा प्रारंभ करून डिजिटल इंडियाच्या दिशेने मोठी झेप घेतली असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

भारतात ही सेवा जरी विलंबाने सुरू झाली असली तरी उच्च दर्जाची आणि परवडणारी सेवा देऊन आम्ही प्रथम क्रमांकावर येऊ, असा विश्वास उद्योगपती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. एकूणच ५ जी सेवेचा प्रारंभ झाल्याने एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे. देशातील जनतेला या सेवेचा नक्कीच लाभ होणार आहे पण सर्वसामान्य जनतेला ही सेवा सहजपणे परवडेल, याकडे संबंधितांनी लक्ष दिले पाहिजे. या सेवेचा लाभ घेऊन शिक्षणापासून शेती, वैद्यकीय क्षेत्र आदींमध्ये अधिकाधिक उच्च पातळी कशी गाठता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. या सेवेचा उपयोग सत्कारणांसाठी कसा करता येईल याकडे तरुण पिढीने जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. जगातील प्रगत देशांशी भारत स्पर्धा करीत असून त्या देशांपेक्षा, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारताने अधिक उंची गाठावी, अशीच सर्वच देशवासीयांंंंंची अपेक्षा असेल. भारताने ६ जी कनेक्टिव्हिटीमध्ये जगाचे नेतृत्व करावे, अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे, असे वक्तव्य केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. आयटी मंत्र्यांचे हे वक्तव्य देशात ५ जी सेवा सुरू झाल्यानंतर एक दिवसानंतर आले आहे.

आगामी ६ महिन्यांत दोनशेहून अधिक शहरांमध्ये ५ जी सेवा उपलब्ध होईल आणि येत्या दोन वर्षांत देशातील ८० ते ९० टक्के भागात ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले. खरे पाहता आयटी मंत्र्यांनी बीएसएनएल सेवा अधिक सक्षम कशी होईल यावर लक्ष द्यायला हवे. सध्या ही सेवा ४ जीवरच रखडली आहे. शिवाय या सेवेबाबत अनंत तक्रारी आहेत. पुढील वर्षी १५ ऑगस्टपासून ५ जी सेवा देण्याचा बीएसएनएलचा प्रयत्न राहील, असे वैष्णव यांनी म्हटले आहे. आज काही ठराविक लोक वगळता भारतीय दूरसंचार निगमची सेवा घेण्यास कोणी उत्सुक दिसत नाही. एके काळी बीएसएनएलकडे सीम कार्डसाठी रांगा लागल्याचे पाहावयास मिळत होते. आज ते चित्र का दिसत नाही याचा वैष्णव यांनी विचार करावयास हवा. ज्या ग्रामीण भागात क्रांती घडविण्याचे स्वप्न पाहात आहोत त्या ग्रामीण भागात आजही बीएसएनएलचीच सेवा आहे. पंतप्रधान अपेक्षा करतात ती डिजिटल क्रांती सरकारी कंपनीच्या धोरणावर अवलंबून आहे. खाजगी कंपन्यांच्या फायद्या-तोट्याच्या गणितामुळे ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल क्रांतीमध्ये कसे सहभागी करणार, असा सामान्य जनतेचा सवाल आहे. त्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या