यंदाचा उन्हाळा जनतेला त्राही भगवान करून सोडणार असे दिसते. त्याची चाहूल लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातच ‘सोसवेना हा उकाडा’ असे म्हणावे लागले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस उत्तर भारतात उष्णता जाणवू लागली. फेब्रुवारीमध्ये या उष्णतेने १२२ वर्षांचा विक्रम मोडला. या दरम्यान दिवसाचे सरासरी तापमान १.७३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. येत्या तीन महिन्यांत उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार देशातील अनेक भागात तापमान गतवर्षाच्या तुलनेत जास्त असेल आणि उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान सामान्यत: जास्त राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम देशातील अनेक भागांमध्ये दिसून येईल. विशेषत: दक्षिण भारत, मध्य भारतातील काही भाग, पश्चिम भारत आणि उत्तर भारतात ही लाट जाणवेल. अहवालानुसार येत्या तीन महिन्यांत दिवसा कडक उष्मा राहील. रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात कडक उन्हाची शक्यता आहे. गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेची लाट आणि रात्रीचे तापमान जास्त राहील. भारत हा हवामान बदलाबाबत अत्यंत संवेदनशील देशांपैकी एक आहे. उष्णतेच्या लाटा,
भीषण पूर आणि दुष्काळ यासारख्या घटना दरवर्षी हजारो लोकांचा बळी घेतात. अशा हवामानामुळे शेतीची उत्पादकता कमी होते, त्यामुळे आर्थिक अडचणी वाढतात. जलविद्युतचे स्रोत कोरडे होतात, त्याचा देशाच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होतो. यंदा भारतासह उपखंडातील मोसमी पावसावर ‘अल-निनो’चा धोका असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन देशाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांवरही परिणाम होऊ शकतो. पॅसिफिक महासागरातील पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढल्यास त्याला ‘अल-निनो’ परिणाम म्हणतात. याचा परिणाम नैऋत्य मोसमी पावसावर होतो. उष्ण कटिबंधातील पश्चिम-प्रशांत महासागराचे पाणी नेहमीपेक्षा थंड होते तेव्हा तो ‘ला-निना’ इफेक्ट असतो. ला-निना प्रभावी होतो तेव्हा आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये भरपूर पाऊस पडतो. जागतिक स्तरावर हे वर्ष गत दोन वर्षांपेक्षा अधिक उष्ण असण्याची शक्यता आहे. कारण भारतासह जगभरातील अनेक देशांत फेब्रुवारीत लक्षणीय उष्णता नोंदवली गेली आहे. देशात सलग दुस-या वर्षी उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागत आहेत. त्याचा परिणाम गहू, तेलबिया, हरभरा पिकाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये काढणीला आलेली पिके उष्णतेमुळे होरपळण्याची शक्यता आहे.
चलनवाढीचा दर नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना याची झळ बसून महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. या काळात विजेचा वापर वाढून वीजनिर्मितीवरही ताण येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीहून अधिक असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मार्च २०२३ मध्ये देशातील पाऊस सरासरीइतका असेल. वायव्य, मध्य पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारतातील तुरळक ठिकाणी सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागात मार्च महिन्यामध्ये कमाल तापमान सरासरीहून अधिक असेल. तर किमान तापमान मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीहून जास्त असेल असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. देशात अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पारा वाढल्याने आरोग्य मंत्रालयाने उष्णतेच्या लाटेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा राज्यांमध्ये दुपारी १२ ते ३ या वेळेत विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गरज नसल्यास दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडू नका, बाहेर पार्र्क केलेल्या कारमध्ये मुलांना एकटे सोडू नका असे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या दिवसा कडक ऊन आणि पहाटे थंडी जाणवते आहे. रात्रीची थंडी अजून पूर्णपणे गेलेली नाही.
वातावरणातील ही विषम स्थिती आरोग्यावर परिणाम करणारी ठरू शकते. अशा विषम स्थितीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. दिवसाच्या कडक उन्हामुळे थकवा जाणवतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे उलट्या (डिहायड्रेशन) होतात. बाहेरचे पाणी, सरबत प्याल्याने पोटाच्या तक्रारी वाढतात. त्वचेवर चट्टे उठणे, त्वचा कोरडी पडून खाज येणे अशी लक्षणे दिसू लागतात. डोळ्याची आग होते, डोळे चुरचुरतात. विषम हवामानाचा त्रास होऊ नये म्हणून डोक्यावर टोपी, सुती कापड घेणे आवश्यक आहे. गॉगल घालणे केव्हाही चांगले. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली बरोबर ठेवावी. ताजे, पौष्टिक अन्न घेणे, आहारात ताक, दही यांचा समावेश करावा. फळांचा ताजा रस, शहाळ्याचे पाणी, सरबते घेतल्याने आरोग्य चांगले राहू शकते. फेब्रुवारीत राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वाधिक उष्ण ठरली. काही ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात तुलनेने थंड वातावरण राहिले. तापमानाची अशी असामान्य स्थिती ‘उष्णतेची लाट’ म्हणून वर्णिली जाते. यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक राहणार अशी लक्षणे दिसत आहेत.
यंदा उन्हाळ्यात राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे दरम्यान मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारतातील काही राज्यांत उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात काय होईल अशी चिंता सर्वसामान्यांना सतावतेय. नवीन वर्षाची सुरुवात बोच-या थंडीने झाली. अनेक ठिकाणी थंडीचा कहर पहावयास मिळाला. या थंडीने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले पण फेब्रुवारीत अचानक वातावरणात बदल झाला. हवामानातील बदल आता आपल्या पाचवीला पूजला आहे! सूर्याने उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच आपले रौद्ररूप दाखवले आहे. यंदा भारतात उन्हाळा खूप कडक राहील त्यामुळे जनतेला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. हवामानाचा लहरीपणा का वाढला यामागे अनेक कारणे आहेत. त्याची कल्पनाही आपल्याला आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने आपणच हे संकट ओढवून घेतले आहे. वाढलेले औद्योगीकरण, शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण ही प्रमुख कारणे जागतिक पातळीवर तापमान आणि उष्ण लहरीस कारणीभूत ठरत आहेत. म्हणजे आम्हाला कळते पण वळत नाही! माणसाचा लहरीपणाच त्याच्या विनाशास कारणीभूत ठरतो आहे. मग उगाच हवामानाचा लहरीपणा वाढतोय असा हवामानाला दोष देण्यात काय अर्थ?