24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसंपादकीयदुहेरी आव्हान!

दुहेरी आव्हान!

एकमत ऑनलाईन

भारताच्या सीमा पुन्हा एकवार अशांत झाल्या आहेत. भारत-चीन दरम्यान लष्करी पातळीवरची १३ वी फेरी चीनने घेतलेल्या मग्रूर व हेकेखोर भूमिकेमुळे निष्फळ ठरलेली असतानाच दीर्घ काळ शांतता नांदलेल्या काश्मिरात पुन्हा अतिरेकी कारवाया व हिंसाचाराने उचल खाल्ली आहे. त्यामुळे भारतासमोर देशांच्या सीमांवर शांतता टिकविण्याचे दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. तसं वरवर पाहता या दोन स्वतंत्र घटना किंवा समस्या आहेत, असेच वाटू शकते. मात्र अफगाणमध्ये तालिबानी सत्तेवर आल्यावर जागतिक राजकारणाचे नेपथ्य बदलले आहे. त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर अफगाणमध्ये खोलवर घुसून तेथे आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीन ज्या आक्रमकतेने प्रयत्न करतो आहे, ते पाहता या दोन घटनांचा परस्परांशी अत्यंत जवळचा संबंध असण्याची व चीनचा हा भारताविरुद्धचा चक्रव्यूह असण्याची शक्यता जास्त बळकट बनते.

त्याचा पुरावा म्हणजे १३ व्या फेरीतील चर्चेदरम्यान चीनने दाखविलेला उद्दामपणा ही फेरी निष्फळ ठरत असताना चिनी लष्कराच्या प्रवक्त्याने केलेले निवेदन हा चीनने ठरवून चालविलेल्या उद्दामपणाचा पुरावाच आहे. ‘भारताने जे मिळाले आहे त्यावर समाधान मानावे,’ असा उद्धट सल्ला या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात दिला. याचाच अर्थ चीन भारताशी चर्चेद्वारे तोडगा काढण्यास उत्सूक नाहीच तर चर्चेचे हे निव्वळ नाटक करून जगाच्या डोळ्यांत धूळफेक करत भारतावर दादागिरी करण्याचा अजेंडा पुढे रेटत आहे. आशिया खंडात एकछत्री वर्चस्व निर्माण करण्याची चीनची मनिषा एव्हाना सुस्पष्टच झाली आहे. मात्र, त्याच्या पूर्ततेत चीनसाठी भारत हा प्रमुख अडसर आहे. एकामागोमाग एक आशियाई देशांना चीन आपल्या ताटाखालचे मांजर बनविण्यात यशस्वी ठरत असताना भारताची शक्ती व स्वाभिमान ही चीनसाठी डोळ्यात खुपणारी बाब ठरते आहे. अफगाणला आपल्या पंखाखाली घेण्याच्या चीनच्या प्रयत्नांमध्येही भारतच प्रमुख अडसर ठरतो आहे.

त्यामुळेच भारताच्या सीमा कायम अशांत करून भारताला त्यात गुंतवून ठेवण्याची रणनीती चीनने मागच्या दोन-तीन वर्षांपासून आखली आहे. त्यातूनच चीन भारताच्या सीमेवर केवळ कुरापतीच नाही तर चक्क घुसखोरी व रेटारेटीवर उतरला आहे. त्यातूनच अरुणाचल प्रदेश राज्यालगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्यूत्तर देत हा प्रयत्न हाणून पाडला, हे अलहिदा. मात्र, तरीही दोन्ही बाजूंच्या जवानांमध्ये धक्काबुक्की व बाचाबाची झालीच व पुन्हा तणाव निर्माण झालाच! उपराष्ट्रपतींनी या भागाचा पाहणी दौरा केल्यावर चीनने तो अनधिकृत असल्याची आदळआपट जगासमोर सुरू केली. नेमके ही घटना घडत असतानाच चीनने तैवानच्या आकाशात जवळपास दीडशे हवाई उड्डाणे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तैवानने या दबावाला अजीबात भीक घातलेली नसली तरी भारतालगतच्या सीमेवर कायम कुरापती करण्याचा चीनचा प्रयत्न सुस्पष्टच झाला आहे. त्याच वेळी काश्मीरच्या सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या पथकावर हल्ला चढविणे व या चकमकीत भारताच्या एका अधिका-यासह पाच जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याची घटना घडली.

वरकरणी या सर्व वेगवेगळ्या घटना असल्याचेच भासत असले तरी चीनचे ताटाखालचे मांजर बनलेल्या पाकिस्तानने चीनच्याच इशा-यावरून ही कुरापत केली असण्याचीच शक्यता जास्त! त्यामुळे आता भारताने त्यावर सांगोपांग विचार करून रणनिती ठरविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हा विचार न केल्यास भारतासाठी एकाच वेळी दोन्ही सीमांवर शत्रूंशी दोन हात करत राहण्याची आव्हानात्मक स्थिती निर्माण होऊ शकते. चीनला लागून असणा-या सीमावर्ती भागाची व्याप्ती पाहता सातत्याने तिथे होणा-या चीनच्या कुरापती रोखताना भारतीय लष्कराची मोठी शक्ती वाया जाणार आहे. मात्र, या सीमावर्ती भागात फुटीरतावादी शक्ती नसणे ही भारतासाठी जमेची बाजू. या भागातील जनतेच्या मनात चीनच्या कुटील हेतूंविषयी अजिबात शंका नाही. त्यामुळे तेथे चीनच्या कुरापती देशांतर्गत असंतोष अथवा हिंसाचार निर्माण करू शकत नाहीत. मात्र, पाकलगतच्या सीमेवर या उलट स्थिती आहे.

या भागात पाक लष्कर प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्षरीत्या अतिरेक्यांना मदत देऊन हिंसाचार व घातपाती कारवाया घडवून आणू शकते. त्यातून काश्मीर खो-यात पुन्हा अशांतता निर्माण होण्याची शक्यता बळावते आहे. या सर्व वेगवेगळ्या भासणा-या पण नसणा-या घटनांचा एकत्रित विचार करून त्यांना जोडून त्यावर विविध स्तरीय रणनिती तयार करण्याची वेळ आता आली आहे. अफगाणवर तालिबान्यांची सत्ता आल्याने साहजिकच पाकला स्फुरण चढले आहे. त्याचा वापर चीन भारताविरुद्ध नक्कीच करणार व भारताला सतत विविध कुरापतींमध्ये गुंतवून ठेवणार हे उघड आहे. त्यातून अफगाणमधील आपले वर्चस्व वाढविण्याच्या चीनच्या मनीषेतील प्रमुख अडसर कमी होऊ शकतो. हे घडले तर मग ती भारतासाठीची नवी डोकेदुखी ठरेल व त्याचा देशाच्या विकासावर व वाटचालीवर मोठा गंभीर परिणाम होईल. त्यामुळे आता भारताला चीनबाबत नवे डावपेच आखावे लागणे गरजेचे बनले आहे. हे डावपेच जसे लष्करी पातळीवरचे तसेच राजनैतिक व आर्थिक पातळीवरही आवश्यक आहेत. कोरोना संकटाचा उद्गाता असणारा चीन सध्या संपूर्ण जगासाठीच खलनायक ठरला आहे. त्याचा योग्य व तत्पर फायदा उचलून भारताने चीनच्या बलाढ्य अर्थकारणावर घाव घालून चीनच्या अर्थव्यवस्थेला टक्कर देणारी अर्थव्यवस्था उभारण्यावरही लक्ष केंंद्रित केले पाहिजे.

निवळ लष्करी व राजनैतिक डावपेचांनी, चीनविरोधी जागतिक आघाड्यांनी उभारण्याने चीनची मस्ती उतरणार नाही. त्यासाठी चीनच्या अर्थकारणाच्या मुळावर भारताला घाव घालावे लागतील. ते वर्मी बसले तरच चीन नमेल! चीनला आपल्या विस्तारवादाच्या विखारी महत्वाकांक्षेला वेसण घालावी लागेल. याकामी जगातले इतर देशांचे सहकार्य भारताला मिळण्याची अपेक्षा फोलच कारण जागतिक अर्थकारणाचा मुलभूत नियम हा ‘प्रथम देशाचा स्वार्थ’ हाच आहे. याला जगातला कुठलाही देश अपवाद नाहीच. त्यामुळे भारताला आपल्यासमोर उभे ठाकलेले हे दुहेरी आव्हान स्वबळावरच पेलावे लागणार हे स्वच्छ आहे. आता भारताने हे वास्तव स्विकारून कुणाच्याही मदतीवर न विसंबता आपल्या तयारीला वेगाने लागावे, हे बरे! तरच चीनने भारताला ज्या चक्रव्यूहात अडकविले आहे त्यातून भारताची सुटका होईल, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या