23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home संपादकीय लसींचा ‘डबल धमाका’!

लसींचा ‘डबल धमाका’!

एकमत ऑनलाईन

सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारताच्या औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्याने देशातील कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही लसी सुरक्षित व परिणामकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारताच्या दृष्टीने हा ‘डबल धमाका’च म्हणावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंजुरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या लसींची भारतात निर्मिती झाली ही भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. त्यातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वैज्ञानिक समुदायाने दाखविलेली इच्छाशक्ती दिसून येते हा कोरोना महामारीविरोधातील भारताच्या युद्धातील निर्णायक क्षण असून यामुळे कोविडमुक्त भारताच्या मोहिमेला बळ मिळेल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला. कोविशिल्ड ही लस ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने तयार केली आहे. तर कोव्हॅक्सिन हैदराबादस्थित भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद व पुणे स्थित ‘एनआयव्ही’च्या मदतीने तयार केली आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)चे प्रमुख सोमाणी हे परभणीचे सुपुत्र आहेत. मराठवाडाच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल. या लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाल्याने कोरोनाच्या लसीसंबंधीची प्रतीक्षा संपली आहे. पण आता ही लस सर्वसामान्यांपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न उभा राहतो. लसीचे दर काय असणार, असाही प्रश्न उपस्थित होतो. सध्या अनेक कोरोना लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. हा टप्पा ओलांडताच सरकार अधिकृतपणे लस उपलब्धतेची घोषणा करेल. यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शासनाकडे लसीची किती मात्रा उपलब्ध आहे यावर ती देशात एकाच वेळी दिली जाणार की टप्प्याटप्प्याने याचा निर्णय घेतला जाईल. कोरोना योद्ध्यांना लसीकरणाच्या कार्यक्रमात प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यापुढील टप्प्यात ५० वर्षे आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाईल. कोरोनाची लस घेणं बंधनकारक नसलं तरी देशातील जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानेच ही लस घेतली पाहिजे. लसीची निर्धारित मात्रा घेत हे सत्र पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. सुरक्षितता आणि लसीचा प्रभाव या निकषांची तपासणी केल्यानंतरच लसीच्या वापराला देशाला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या लसी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ज्यांना कोरोना होऊन गेला आहे अशांनीही कोरोनाची लस घ्यायला हवी. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढेल. इतर देशांप्रमाणेच भारतातील लसीही तितक्याच प्रभावी आणि सुरक्षित आहेत.सीरमकडे सध्या लसीचे ५० दशलक्ष डोस तयार आहेत ते २५ दशलक्ष नागरिकांना देण्यात येतील. कोरोनाच्या नव्या प्रकारावर लस प्रभावी ठरेल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.संशोधकांच्या मते या लसी कोरोनाच्या नव्या प्रकारावरही प्रभावी ठरू शकतील. कारण कोरोना विषाणूमध्ये फार कमी प्रमाणात बदल झाला आहे.मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत लस खासगी स्वरूपात मिळू शकेल. अर्थात ती डॉक्टरमार्फतच मिळू शकेल. सध्या तरी ही लस मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. भारतातील तिसरी लस झायडस कॅडिला कंपनी तयारी करीत आहे. त्यांना तिस-या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. देशात सर्वांना कोरोनावरील लस मोफत मिळेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले होते. त्यामुळे देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु नंतर त्यांनी आपले वक्तव्य बदलले.

मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्रात मोठी वाढ

कोरोनाची लस आरोग्यसेवक आणि कोरोना योद्ध्यांनाच मोफत मिळेल, असे त्यांनी ट्विट केले आहे. देशातील १ कोटी आरोग्यसेवकांना आणि २ कोटी कोरोना योद्ध्यांना मोफत लस दिल्यानंतर जुलैपर्यंत उर्वरित २७ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. याचा अर्थ मोफत लसीकरणाबाबत केंद्र शासनाचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित असल्याचे डीसीजीआयचे डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी म्हटले आहे. त्यामुळे गत अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे. याचा आनंद जोक्स आणि मीम्सच्या माध्यमातून नेटकरी सेलिब्रेट करणार नाहीत तर तो सोशल मीडिया कसला! आजकाल प्रत्येक घटना मीम्सद्वारा व्हायरल करण्याचा ट्रेंडच आहे. कोरोना व्हायरसनंतर आता जगाला ‘डिसीज एक्स’ विषाणूचा धोका असल्याचा इशारा इबोलाचा शोध लावणा-या वैज्ञानिकाने दिला आहे. हा आजार कोरोना विषाणूपेक्षा घातक असून या आजारामुळे इबोलापेक्षा अधिक रुग्ण दगावले जाऊ शकतात, असे वैज्ञानिक जीन-जॅक्स मुयेम्बे तामफूम यांनी म्हटले आहे.

या विषाणूमुळे जगभरात विनाश होऊ शकतो. आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय पावसाच्या प्रदेशामध्ये या विषाणूचे रुग्ण आढळून आल्याचा दावा जीन-जॅक्स यांनी केला आहे. जनावरांपासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकणा-या या विषाणूची निर्मिती होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. हा आजार कोरोना विषाणूपेक्षा घातक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गत काही वर्षांपासून यलो फिव्हर, इन्फ्ल्युएन्जा, रेबीज आणि इतर काही विषाणूंचा प्राण्याच्या माध्यमातून मानवाला संसर्ग झाला आहे. यातील अनेक आजार उंदीर किंवा किड्यांमुळे निर्माण झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने डिसीज एक्स हा विषाणू काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. भारतात प्रत्येक गोष्टीत विघ्न आणणा-या ‘उंदरां’चा सुळसुळाट आहे. आता तर काही नेत्यांना भविष्यात होणा-या ‘लसीकरणा’ची लागण झाली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘भाजपची लस‘ घेण्यास नकार दिला आहे. भाजप लसीकरणासाठी वापरणार असलेल्या लसीवर मी विश्वास कसा ठेवू असे त्यांनी म्हटले आहे. २०२२ मध्ये आपला पक्ष राज्यात सत्तेवर येईल आणि प्रत्येकाला मोफत लस मिळेल असे ते म्हणाले.

अखिलेश यांनी डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ यांचा अपमान केल्याची टीका भाजपने केली. तिस-या टप्प्यातील चाचणी सुरू असताना कोव्हॅक्सिनला देण्यात आलेल्या मंजुरीवर आनंद शर्मा, शशी थरूर आणि जयराम रमेश या काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संशोधकांचे कौतुक केले आहे. हाही ‘डबल धमाकाच’ म्हणावा लागेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या