23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसंपादकीयस्वप्नवत जेतेपद

स्वप्नवत जेतेपद

एकमत ऑनलाईन

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राने देशाला नवी दिशा दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. देशाला नवी दिशा मिळाली की नाही यावर वाद-प्रतिवाद होतील परंतु आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाला मात्र हा मंत्र लाभदायक ठरला यात शंका नाही. कोरोना महामारीत आपल्या सरकारने गरीबांना मोफत धान्य पुरवले, जनधन खात्याद्वारे महिलांना आर्थिक मदत दिली. प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळेल हे सुनिश्चित केल्याचे मोदींनी सांगितले. गुजरात टायटन्स बाबतही तसेच झाले. कागदावर हा संघ बलाढ्य आहे असे कधीच जाणवले नाही. साखळीतील प्रत्येक सामन्यात वेगळाच खेळाडू चमकला.

सांघिक प्रयत्नाद्वारेच हा संघ एकेक पायरी चढत गेला. २०१४ पूर्वी केंद्रात असलेल्या युपीए सरकारने गुजरातला नेहमी सापत्न वागणूक दिल्याचा आरोप मोदींनी केला तसेच गत आठ वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे राज्याचा वेगाने विकास होत असल्याचा दावाही त्यांनी केला. विकासाच्या संदर्भात मोदी जे म्हणाले ते खरेच आहे. अहमदाबादला सुमारे १ लाख ३२ हजार प्रेक्षक क्षमतेचे भव्य स्टेडियम बांधण्यात आले. स्टेडियमचे पूर्वीचे सरदार वल्लभभाई पटेल हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असे नवे नाव देण्यात आले. त्यामुळे जगभरात हे स्टेडियम ख्यातकीर्त झाले. स्टेडियम गुजरातमध्ये असल्याने गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवणे सोपे गेले! कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर क्वालिफायरचे दोन सामने झाले तर नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायरचा एक आणि अंतिम सामना खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात यजमान संघ गुजरात टायटन्स असल्याने तिकीटांचा काळा बाजार होणार हे उघड होते. अंतिम सामन्याची ऑनलाईन तिकिटे काही तासातच संपली. सर्वांत स्वस्त तिकीट ८०० रुपये चे होते ते आठ हजाराला विकले गेले. १५०० रुपयेचे तिकीट १५ हजाराला विकल्याचे वृत्त आहे.

खेळ कुठलाही असो त्यात विजय मिळवण्याचा कोणत्याही संघाचा प्रयत्न असतो. पण प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही. हे वास्तव आयपीएल स्पर्धेलाही लागू पडते. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने पाच वेळा तर चेन्नई सुपरकिंग्जने चार वेळा जेतेपद पटकावले आहे पण यंदा या दोन्ही संघांचा पार धुरळा उडाला आणि या दोन्ही संघांनी गुणतालिकेचा तळ गाठला. कोलकाता नाईट रायडर्सने ही स्पर्धा दोन वेळा तर राजस्थान रॉयल्सने एकदा जिंकली आहे.सनरायझर्स हैदराबादनेही या स्पर्धेचे एक जेतेपद मिळवले आहे. आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जला अजून एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही. यंदा या स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि लखनौ या नव्या दोन संघांची भर पडली होती. त्यामुळे यंदा स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले गेले. या स्पर्धेच्या नावाने कोणी कितीही बोटे मोडो पण ही स्पर्धा जगभर लोकप्रिय ठरली आहे यात शंका नाही. आयपीएल स्पर्धेकडे जगभरातील क्रिकेटपटूंचे लक्ष लागलेले असते. एखाद्या संघाने आपल्याला पसंती द्यावी असे त्यांना मनोमन वाटत असते. कारण या स्पर्धेने अनेक खेळाडूंना मालामाल करून टाकले आहे. कारण एखाद्या संघात वर्णी लागली की त्या खेळाडूला कोट्यवधी रुपये मिळतात. गुजरात टायटन्सच्या संघ मालकांनी सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये मोजून हा संघ विकत घेतला आहे. यावरूनच स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची उधळण होणार हे उघड आहे. ही सारी पैशाची उधळपट्टी कशासाठी असे अनेकांना वाटेलही पण त्याला नाईलाज आहे.

कारण या जगात अखेर ‘दाम करी काम’ हेच खरे. अर्थात या स्पर्धेने जगाला अनेक उत्तमोत्तम प्रतिभावान खेळाडू दिले आहेत. जे क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत त्यांच्या आयुष्याची बेगमीही झाली आहे. म्हणूनच आयपीएलकडे नवोदित, प्रतिभावान खेळाडूंची टाकसाळ म्हणून बघितले जाते. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील साखळीच्या अखेरच्या सामन्यात तळाशी असणा-या मुंबईने टिम डेव्हिडच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीचा पराभव केला आणि बंगळुरू संघाचे भाग्य फळफळले. प्ले ऑफमधील चौथा संघ म्हणून त्यांची वर्णी लागली. क्वालिफायर १ मधील सामन्यात बंगळुरूने पदार्पणाच्या हंगाम गाजवणा-या लखनौ संघाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे क्वालिफायर २ मध्ये त्यांना स्थान मिळाले. परंतु बंगळुरू संघाला या संधीचा लाभ उठवता आला नाही. कर्णधार प्लेसिस आणि विराट कोहली यांनी कचखाऊ प्रदर्शन केले. यंदाच्या स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंचे अपयश बंगळुरू संघाला भोवले. जोस बटलरने आपल्या बॅटच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला अंतिम फेरीत पोहंचवले. एक व्यावसायिक खेळाडू आणि आयपीएलमध्ये खेळणा-या भारताच्या स्थानिक खेळाडूंचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वेगळा असतो हे बटलरच्या फलंदाजीवरून दिसून येते.

या स्पर्धेत बटलरने चार शतके ठोकली आहेत. विशेष म्हणजे कमीत कमी चेंडूत चौकार-षटकारांची उधळण करत त्याने शतके ठोकली आहेत. टी-२० क्रिकेटमध्येही डोके शांत ठेऊन कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा काढता येतात हे त्याने दाखवून दिले आहे. स्पर्धेच्या अंतिम लढतीत गुजरात आणि राजस्थानची गाठ पडली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ पदार्पणात जेतेपदाची आस बाळगून होता. संजू सॅम्सनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स १४ वर्षानंतर दुस-यांदा जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात होता. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेकांनी गुजरात संघाची सर्वांत दुबळा संघ म्हणून संभावना केली होती. कारण या संघात हार्दिक, शुभमन गिल, आणि डेव्हिड मिलर हे तीनच फलंदाज दिसत होते. गोलंदाजीत मात्र हा संघ मातब्बर वाटत होता. मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, रशीद खान, प्रदीप सांगवान असे चांगले गोलंदाज होते. राजस्थान संघात जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅम्सन, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, रियान पराग असे शानदार फलंदाज तर आर अश्विन, यजुवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, मकॉय असे बहारदार गोलंदाज होते. परंतु अंतिम सामन्यात वेगळेच घडले.

अंतिम सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. परंतु गुजरात संघाने शानदार गोलंदाजी करून राजस्थान संघाला ९ बाद १३० असे रोखले. स्पर्धेत ४ शतके ठोकणारा बटलर अवघ्या ३९ धावांवर परतला. हार्दिकने १७ धावांत ३ बळी घेताना बटलर, संजू सॅम्सन आणि हेटमायरला तंबूचा रस्ता दाखवला. विजयासाठी १३१ धावांचे सोपे आव्हान गुजरातला मिळाले. त्यांनी तीन गडी गमावून आणि ११ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला. यात सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिकचे योगदान महत्त्वाचे ठरले. हार्दिकने ३४ तर गिलने नाबाद ४५ धावा काढल्या. हार्दिकने अष्टपैलू कामगिरी केली. मध्यंतरी पाठदुखीमुळे हार्दिकने गोलंदाजी करणे सोडले होते. त्यामुळे त्याचे भारतीय संघातील स्थान डळमळीत झाले होते. आता तो पूर्णत: फिट झालेला दिसतो. गुजरातच्या यशाचे श्रेय जसे हार्दिकला जाते तसे ते मुख्य कोच आशीष नेहरालाही द्यावे लागेल. असे यश मिळवणारा तो पहिला भारतीय कोच आहे. नेहराला गॅरी कर्स्टनची साथ मिळाली होती. भारताने २०११ चा विश्वचषक जिंकला तो गॅरी कर्स्टनच्या मार्गदर्शनाखाली गुजरातला स्वप्नवत जेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा असलेल्या हार्दिकचे पुढील लक्ष्य भारताला विश्वकप जिंकून देणे हे आहे ही आनंदाची गोष्ट.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या