22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home संपादकीय क्रिकेटमध्येही घराणेशाही!

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

एकमत ऑनलाईन

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर, वकिलाच्या मुलाने वकील, न्यायाधीशाच्या मुलाने न्यायाधीश शाळा मास्तरच्या मुलाने शाळा मास्तर, अभिनेत्याच्या मुलाने अभिनेता, क्रीडापटूच्या मुलाने क्रीडापटू तर राजकीय नेत्याच्या मुलाने राजकीय नेता बनावे असे त्या-त्या क्षेत्रातील सन्माननीय बापांना वाटत असते नव्हे वाटतेच. हा नियम अन्य क्षेत्रातील बापांनाही लागू आहे. ज्यांना मुलगा नसेल पण मुलगी असेल त्यांनाही हा नियम लागू आहे. कारण नियमासमोर मुलगा काय किंवा मुलगी काय, सारे समान आहेत. या नियमाचे दुसरे गोंडस नाव म्हणजे घराणेशाही! मुला-मुलींनी घराणेशाही चालवली पाहिजे, जपली पाहिजे! बहुतेक वेळा पुढची पिढी कर्तृत्ववान निघतेच असे नाही, बापाच्या तोलामोलाची असतेच असे नाही.

क्रीडाक्षेत्रापुरते बोलायचे झाल्यास हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा मुलगा अशोककुमार त्यांच्यासारखा किमयागार निघाला नाही. टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांचा मुलगा रमेश कृष्णन त्यांच्यासारखी छाप पाडू शकला नाही. बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी दीपिका वेगळ्याच क्षेत्रात चमकली. माजी अष्टपैलू कसोटीपटू विनू मंकड यांचा पुत्र अशोक मंकड बघता बघता लुप्त झाला. माजी कर्णधार लाला अमरनाथ यांची मुलं मोहिंदर व सुरिंदर फारशी चमकली नाहीत.मन्सूर अली खान ऊर्फ पतौडी यांचा मुलगा सैफ अली खान अभिनयापेक्षा करीना कपूरचा नवरा म्हणूनच प्रसिद्धीच्या वलयात आहे. मुलगी सोहा कुणाल खेमूने मात्र आई शर्मिला टागोरची गादी चालवली आहे. लिजंड सुनील गावस्कर पुत्र रोहन गावस्करला बापाचे नाव काढता आले नाही. थोडक्यात काय तर या स्टार पुत्रांना ‘बाप से बेटा-बेटी सवाई’ होता आले नाही मात्र त्यांनी घराणेशाही चालवली असे म्हणता येईल. राजकीय क्षेत्रातही अशी अनेक उदाहरणे देता येतील. राजकारणात तर ‘घराणेशाही’चा वारंवार उल्लेख केला जातो, आरोप केला जातो.

अमूक पक्षात घराणेशाही आहे, मंत्र्यांचा मुलगा मंत्री, खासदार, आमदार होतो असे आरोप केले जातात. असे होते म्हणूनच आरोपही होतात. तसा राजकारण आणि क्रिकेट यांचा घनिष्ठ संबंध आहे. ओघाने घराणेशाहीचा आरोपही होणारच. क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही सर्वांत श्रीमंत, मालदार संस्था आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा ही भारदस्त संस्था मानली जाते. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये घराणेशाही सुरू आहे असा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन बीसीसीआय चालवत आहेत अशी टीका गुहा यांनी केली आहे. या टीकेत किंवा आरोपात कितपत तथ्य आहे हा भाग वेगळा परंतु या निमित्ताने रामचंद्र गुहा यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे एवढे नक्की. गुहा यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असेही म्हणता येत नाही कारण त्यांच्या गाठीशी बीसीसीआयमधील प्रशासकीय अनुभव आहे. मध्यंतरी रामचंद्र गुहा हे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे सदस्य होते. आपल्या कार्यबाहुल्यामुळे नंतर त्यांनी हे पद सोडले.

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

या प्रशासकीय अनुभवावरच त्यांनी ‘द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात आपले अनुभव कथन करताना गुहा म्हणतात, सध्या भारतीय क्रिकेटमध्ये घराणेशाही सुरू आहे. विविध राज्य क्रिकेट संघटनांमध्ये कोणत्या ना कोणत्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी काम पाहतेय आणि या सर्वांवर अमित शहा व श्रीनिवासन यांचा प्रभाव आहे. इथे गुहा यांचा रोख अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावर दिसतो. सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली तर सचिवपदी जय शहा आहेत. क्रिकेटमध्ये राजकारण घुसल्यामुळे रणजी क्रिकेटपटूंना वेळेवर मानधन मिळत नाही. बीसीसीआयमध्ये कसलीही सुधारणा झालेली दिसत नाही असा गुहा यांचा आरोप आहे. गुहा यांनी सौरव गांगुलीलासुद्धा आडवे घेतले आहे. गांगुली सध्या क्रिकेट फँटसी लीगचे प्रतिनिधित्व करतोय ही लज्जास्पद गोष्ट म्हणावी लागेल. जादा पैशाच्या हव्यासापोटी गांगुलीने जाहिराती करणे ‘ड्रीम टीम’च्या माध्यमातून पैसा कमावणे या गोष्टीला गुहा यांनी आक्षेप घेतला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत गांगुलीने क्रिकेट रसिकांना ‘ड्रीम टीम बनाओ, पैसा कमाओ’ असे आवाहन केले होते ही गोष्ट खरी आहे. बीसीसीआयचा अध्यक्षच अशी कामे करत असेल तर क्रिकेट मंडळात काय चालत असेल असा सवाल गुहा यांनी केला आहे. गुहा यांनी केलेल्या आरोपाला सौरव गांगुली कसा सामोरा जातो ते बघावे लागेल; परंतु गांगुलीच्या कार्यकाळात काही चांगले निर्णय घेण्यात आले हे मान्यच करावे लागेल. कोरोना विषाणूमुळे आयपीएल २०२० भारतात होणार नाही हे निश्चित झाल्यानंतर ही स्पर्धा इतरत्र कोठे खेळवता येईल याची चाचपणी करण्यात आली आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शारजा, दुबई आणि अबुधाबी येथे सामने खेळवण्यासाठी अमिरातीला १०० कोटी देण्यात आले. काही जणांनी यावरही टीका करताना भारतात स्पर्धा झाली असती तर फक्त ६० कोटी खर्च आला असता असे म्हटले.

अर्थात बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या आयोजनातून ४ हजार कोटींचा महसूल मिळवला आहे हे विसरून चालणार नाही. मात्र बीसीसीआयला किती नफा झाला ते अजून गुलदस्त्यातच आहे. कोरोना काळात भारतातील एखाद्या संघटनेकडून घेण्यात आलेली ही सर्वांत मोठी स्पर्धा होती. तब्बल दोन महिने ही स्पर्धा चालली. जगात इतर काही स्पर्धांमध्ये खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. आयपीएलमध्ये मात्र असे काही घडले नाही. अनेकांनी आयपीएलचे आयोजन करू नका असा सल्ला दिला होता परंतु जय शहा यांनी आयोजनासंबंधी ठाम भूमिका घेतली. इथे घराणेशाही कामाला आली! पुढील वर्षी आयपीएलमध्ये आणखी दोन संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता येईल ही अपेक्षा.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या