23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home संपादकीय संपादकीय : आपला तो बाळ्या ..??

संपादकीय : आपला तो बाळ्या ..??

कोरोनाने सगळं जग ठप्प करून टाकल्याने मानवजात घरकोंबडी बनून गेलीय! कामधंदा बंद पडलाय, तसं आम्हा भारतीयांना अगोदर कामाची भारी हौस! त्यामुळेच नव्या वर्षाच्या सुरुवातीला येत्या वर्षात काय होणार? नवीन काय घडणार? नव्या योजना काय? या वर्षातील वाटचालीचे नियोजन काय? वगैरे वगैरेच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये नाही आल्या तरी आमची काही हरकत नसतेच! आणि समजा त्या आल्या तरी त्या वाचण्यात आम्हाला स्वारस्य नसतेच़ मात्र, येत्या वर्षात शासकीय सुट्या किती? शनिवार-रविवारी आलेल्या सणावारांनी, जयंत्या-पुण्यतिथ्यांनी किती हक्काच्या सुट्या बुडाल्या? शनिवार-रविवारला जोडून किती सुट्या मिळणार आणि त्यांचा सुयोग्य व मनसोक्त वापर करण्यासाठी किती दिवसांच्या रजा टाकाव्या लागणार यावर आपले अत्यंत बारीक लक्ष असते.

त्यामुळे आगामी वर्षात किती सुट्या याचे सविस्तर वेळापत्रक सांगणारी बातमी आम्हाला प्रसार माध्यमांकडून हवी म्हणजे हवी असतेच! ‘मागणी तसा पुरवठा’ या बाजारपेठीय तत्त्वानुसार देशातील सर्व प्रसार माध्यमेही अत्यंत नेमस्तपणे आपले हे ‘आद्य कर्तव्य’ प्रामाणिकपणे व चोख पार पाडतात़ असो! तर सांगायचा मूळ मुद्दा हा की, आम्हा भारतीयांना सुटी अजीबात अप्रिय वगैरे नाही आणि ‘दे रे हरि पलंगावरी’ ही आमची सर्वांत आवडीची स्थिती आहेच! मात्र, सुटीसोबत मनसोक्त मनोरंजन हे मात्र ‘कम्पलसरी’ आहे! जसे ‘चकना’ नसेल तर पेयपान व्यर्थ तसे मनसोक्त मनोरंजन नसेल तर सुटीच व्यर्थ! कोरोना महामारीने नेमकी इथंच गोची केलीय! कोरोनाने अवघ्या देशाला मागच्या चार महिन्यांपासून ‘कम्पलसरी सुटी’ दिलीय खरी पण त्याचबरोबर मनोरंजन , विरंगुळा, टाईमपास वगैरे वेगवेगळ्या नावाने संबोधले जाणा-या पण ‘जीव रमवणा-या’ सर्वच बाबीही कडी-कुलुपात घातल्या आहेत.

त्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे ‘जीव रमवावा तरी कुठे?’ त्यामुळे उगाच कोरोनाचे मानवी जीवनाच्या विविध अंगावर झालेले व होणारे दूरगामी परिणाम, जागतिक स्थिती व अर्थकारणावर झालेले व होणारे परिणाम, वगैरे नावडत्या व बोजड विषयांचा होणारा सततचा मारा सहन करावा लागतोय! या सगळ्या विपरीत स्थितीने अक्षरश: जिवाची घालमेल झाली आहे़ यावर उपाय काय? हाच खरा यक्ष प्रश्न!! बहुधा देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी जनतेला पडलेला हा प्रश्न ताडला आहे़ शेवटी राजकीय पक्षांचे नेते तुमचे-आमचे प्रतिनिधीच! मग आपल्या जिवाची घालमेल, आपल्यासमोर असलेले प्रश्न, यातून निर्माण होणा-या समस्या त्यांना नाही कळणार तर कुणाला कळणार? आणि ते यावर उपाय नाही काढणार तर कोण काढणार? त्यामुळेच देशातील ‘कोरोना’वर उतारा म्हणून व सर्वसामान्यांच्या जिवाच्या मनोरंजनाबाबत निर्माण झालेला प्रश्न हमखास सोडविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व नेते सरसावले आहेत आणि देशात अणि राज्याराज्यांमध्ये ‘आपला तो बाळ्या, लोकाचं ते कारटं’, हा हमखास व मनसोक्त मनोरंजनाची शंभर नव्हे तर दोनशे टक्के हमी असणारा वगनाट्याचा प्रयोग रंगविण्यात येतो आहे.

Read More  महानिर्वाण शताब्दी विशेष : गीता, गीतारहस्य आणि लोकमान्य

देशातील सर्वांत मोठा व केंद्रात सत्तेत असणारा पक्ष म्हणून अर्थातच भाजप ‘मेन रोल’ वठवतोय़ तर इतर राजकीय पक्ष आपापल्या वकुबानुसार आपापल्या भूमिका चोख वठवतायत! याची सुरुवात अर्थातच राजस्थानातून झाली़ तसे पाहिले तर ‘कोरोना ब्रेक’ नंतरचा भाग असे याला संबोधणे जास्त योग्य़ कारण कोरोना ब्रेकवर जाण्यापूर्वी मध्य प्रदेशात हा प्रयोग भाजपने ‘सुपरहिट’ करून टाकला होता व त्याच वेळी राजस्थानचे ‘कमिंग सून’ चे ट्रेलर रिलीज केले होते़ पण शिंच्या कोरोनाने हैदोस घातल्याने, राजस्थानमधील प्रयोग तब्बल दोन-अडीच महिने लांबणीवर पडला. असो! मात्र, संधी मिळताच राजस्थानात प्रयोगाला सुरुवात झाली आणि सध्या तो मस्त रंगलाय आणि केवळ राजस्थानातीलच नाही तर देशभरातील जनतेचे मनसोक्त मनोरंजन करतोय!

मध्य प्रदेशात भाजपने ज्योतिरादित्य शिंदे या काँग्रेसच्या ‘बाळ्या’ला आपला ‘बाळ्या’ बनवून काँग्रेसलाच त्यांना ‘कारटं’ ठरवायला लावलं तर राजस्थानात आता सचिन पायलटांना ‘कारटं’ ठरवण्याचा खेळ रंगला आहे़ मात्र, एवढ्यावर भाजप समाधानी नाहीच! भाजपला हा प्रयोग ‘शत-प्रतिशत’ यशस्वी करायचा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील या प्रयोगासाठीच्या तालमीही सुरू झाल्या आहेत़ महाराष्ट्रात मागच्या तीसेक वर्षांपासून भाजपसाठी ‘बाळ’ असलेली शिवसेना व त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले़ एवढेच नाही तर मुख्यमंत्री बनून त्यांनी सरकार स्थापन करीत भाजपलाच विरोधी पक्षात बसवले़ त्यामुळे साहजिकच भाजपचे राज्य पातळीवरील नेते तर प्रचंड अस्वस्थ आहेतच पण ही अस्वस्थता केंद्रीय नेत्यांपर्यंतही पोहोचली व वाढली आहे़ त्यातूनच ‘हे सरकार तीन चाकी रिक्षा’, ‘अंतर्विरोधाचे सरकार’, ‘सरकार आपल्याच लाथाळ्यांनी पडेल’, ‘सरकार पाडण्यात स्वारस्य नाही, पण तुम्ही सरकार चालवून तरी दाखवा’, अशा एक ना अनेक तोफगोळ्यांचा मारा दिवसागणिक भाजप नेत्यांकडून सुरूच आहे.

मात्र, हे तोफगोळे काही केल्या नेम साधत नाहीत़ उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘अचूक मारा कराच’ असे प्रतिआव्हान देत आहेत़ खासदार संजय राऊत त्यात दररोज एक फटाका फोडून रंगत आणतायत! त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेऊन धमाल उडवून दिली आणि त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीची कमालही केली़ त्याने तर भाजपची अस्वस्थता थेट पोटदुखीतच रूपांतरित झाली़ उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत तसे जाहीरही करून टाकले़ अशा स्थितीत अस्वस्थ भाजपला हमखास नेम साधणारा तोफगोळा हवा होता़ राममंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने तो मिळेल, असाच भाजपचा होरा! भूमिपूजनाला ठाकरे जाणार की नाही जाणार? यावरून वातावरण तापायला आणि या प्रयोगात उत्सुकता निर्माण व्हायला सुरुवात झाली.

Read More  भारताच्या सैन्यखरेदीच्या करारांविरोधात पाकिस्तानला पोटशूळ

मात्र, उद्धव ठाकरेंनी ‘ई-भूमिपूजन’ करावे, अशी मागणी केली आणि या समारंभासाठी उद्धव ठाकरेंंना निमंत्रणच असणार नाही, हे स्पष्ट झाल्याने हा मुद्दा बारगळला! मग उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांनी सोशल मीडियावर फोटोसह दिलेल्या शुभेच्छांनी आता ‘स्टेअरिंग कुणा हाती?’चा उप-प्रयोग रंगला आहे. या संथ जाणा-या कथानकाला वेग देण्यासाठी म्हणून की काय, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे़ पी़ नड्डा यांनी राज्यातल्या पदाधिकाºयांना सरकारविरोधात आक्रमक होण्याचा व स्वबळावर सत्ताप्राप्तीचा कार्यक्रम दिला आहे़ मात्र, राज्यात भाजप आता व पुढेही स्वबळावर सत्तेत येणे अवघडच याची जाण व भान जागे झाल्याने की काय, प्रदेशाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाºया चंद्रकांतदादांनी स्वबळावर लढू मात्र हिंदुत्वासाठी शिवसेनेशी युती करू, अशी गुगली टाकली आहे़ तर विरोधी पक्षनेते फडणवीस आता सेनेशी सख्य नाहीच, असे म्हणतायत!

पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इतिहासाचा धांडोळा घ्या, असा सूचक व प्रेमळ सल्ला देतायत! अशी सगळी डायलॉगबाजी सुरू असताना त्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा, असा प्रश्न पडण्याची शक्यता असते़ त्याचे एकमेव उत्तर म्हणजे, असा प्रश्न अशा प्रयोगाचा मनसोक्त आस्वाद घेताना प्रेक्षकांनी स्वत:ला अजीबात पडू द्यायचा नसतोच! एक तर हे सगळे तुमच्या-आमच्या मनोरंजनासाठीच सुरू आहे, हे ध्यानात ठेवावे व दुसरे म्हणजे अशा प्रयोगात या प्रश्नांना उत्तर नसतेच! प्रयोग रंगवण्याचा हेतू वेगळाच असतो आणि त्याचा क्लायमॅक्स व शेवटही तेवढाच वेगळा असतो़ प्रेक्षकांनी ‘पेशन्स’ बाळगून त्याची प्रतीक्षा करावी व दरम्यान प्रयोगाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा, हेच बरे! तूर्त अर्थच काढायचा तर तो हा की, राजस्थाननंतर महाराष्ट्रात ‘आपला तो बाळ्या, लोकाचं ते कारटं’, हा तुफान मनोरंजनाची हमखास हमी देणारा प्रयोग होणार, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow