30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeसंपादकीयसंपादकीय : बळीराजाच्या पाठी शुक्लकाष्ठ !

संपादकीय : बळीराजाच्या पाठी शुक्लकाष्ठ !

एकमत ऑनलाईन

आपला देश खरं तर कृषिप्रधान! देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा आजही मोठा वाटा़ स्वातंत्र्यानंतर देश हाकणाºया सर्वच राज्यकर्त्यांनी देशातील कृषी क्षेत्राला गृहित धरण्याचे व विकासाच्या धोरणात कृषी क्षेत्राला कायमच दुय्यम स्थान देण्यात कमालीचे सातत्य व एकवाक्यता दाखविलेली ! एकवेळ आपल्या देशात ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नौकरी’ ही धारणा होती़ मात्र, काळाच्या ओघात घडलेल्या बदलांनी व राज्यकर्त्यांनी राबविलेल्या धोरणांनी आज मात्र ‘उत्तम नौकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती’ ही धारणा समाजमनात दृढ झाली आहे़ त्याला आपण स्वीकारलेली इंग्रजांची कारकून बनविणारी शिक्षणपद्धती जशी कारणीभूत आहे, तशीच धोरणे राबवितानाही पाश्चात्यांच्या अंधानुकरणाची आपली सवयही कारणीभूत आहे.

असो! कारणे कुठलीही असली तरी देशातील कृषी क्षेत्राची अवस्था सध्या दयनिय आहे आणि शेतात राबणाºया बळीराजाचे जीवन हलाखीचे बनले आहे़ शेती तोट्याची व आतबट्ट्याची ठरत असल्याने निराश बनलेल्या शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र देशात सुरू आहे़ मात्र, तरीही शेतीचा शाश्वत विकास व हा नफ्याचा व्यवसाय ठरविण्यासाठीचे ठोस धोरण तयार करण्याची, राबविण्याची गरज आजही आपल्याला वाटत नाहीच! आताशा तर शेतक-यांची स्थिती, त्याचा कर्जबाजारीपणा हे राजकारणाचे ‘हुकमी एक्के’ बनले आहेत़ विरोधात बसलेल्यांना विरोधक असताना शेतक-यांचा प्रचंड पुळका येतो आणि सत्तेत विराजमान झाले की, याच शेतकºयांचा अत्यंत सोयीस्करपणे विसर पडतो़ आजही देशातला बहुतांश शेतकरी निसर्गाच्या मेहरबानीवरच अवलंबून आहे़ कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ या दुष्टचक्रात पुरता अडकलेला आहे़ गारपीट, अवकाळी पाऊस या संकटांना तोंड देतो आहे़ त्यात ‘पिकले तर विकत नाही’ या बाजारपेठेच्या सूत्रात गुरफटल्याने पुरता हतबल आहे आणि शेतक-यांसमोर असणारी ही संकटांची मालिका कमी म्हणून की काय, बोगस बियाणे, निकृष्ट दर्जाची खते, बोगस किटकनाशके आदी प्रकारांनी फसवला व नाडला जातो आहे.

बळीराजा, अन्नदाता वगैरे वगैरे मोठी विशेषणे लावून भाषणात व व्यवहारात गौरविला जाणारा शेतकरी प्रत्यक्ष बाजारात मात्र नाडला, भरडला व लूटला जातो़ त्याच्या जीवावर व्यापार करणा-यांची साखळी मालामाल होते आणि ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता वर्षभर अहोरात्र शेतात खपणारा, घाम गाळणारा शेतकरी मात्र कंगाल होतो़ आताही महाराष्ट्रात अशीच स्थिती निर्माण झालेली आहे़ महाराष्ट्रात सध्या सोयाबीनच्या बोगस बियाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ झटपट हाती पैसा देणारे नगदी पीक म्हणून हल्ली राज्यातील शेतकरी सोयाबीनच्या पे-याला प्रथम पसंती देतात. त्यामुळे राज्यात सोयाबीनच्या पे-याचे क्षेत्र प्रचंड मोठे आहे आणि नेमके शेतक-यांच्या पदरी सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे व बोगस बियाणे टाकण्याचा गोरखधंदा बियाणे कंपन्यांनी केल्याने राज्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेलेच नाही़ शेतकºयांवर चक्क दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

Read More  तुझा विसर न व्हावा…..पांडुरंगा !

अगोदरच आर्थिक विवंचनेत अडकलेला राज्यातला शेतकरी या बोगस बियाण्याने फसवला व नागवला गेल्याने अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे़ यावर्षी राज्यात कधी नव्हे तो पाऊस वेळेवर झाला़ मृग बरसल्याने आनंदलेल्या बळीराजाने उत्साहात व वेगात पेरणी सुरू केली़ राज्यात एकूण क्षेत्राच्या जवळपास ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे़ मात्र, यात हजारो हेक्टरवरील सोयाबीन व कापसाचे बियाणे उगवलेच नाही़ बियाणे कंपन्या यासाठी शेतकºयांनाच दोषी ठरवत असल्या तरी हजारो हेक्टरवर पेरा झालेले बियाणे उगवतच नसेल तर दोष शेतक-यांचा नाही तर बियाणे कंपन्यांचा आहे व हे बियाणे निकृष्ट दर्जाचे व बोगस आहे, हे सत्य सांगण्यासाठी कुठल्या कृषी पंडिताची अजिबात गरज नाही़ मात्र, निर्ढावलेल्या बियाणे कंपन्या आणि सुस्तावलेले कृषी खाते यांच्यातील अभद्र युतीने शेतकरी अक्षरश: वा-यावर सोडला गेल्याचे चित्र आहे़ शेतकºयांना विकण्यात आलेल्या २१ बियाण्याचे नमुने कृषी विभागाने केलेल्या तपासणीत नापास झाले आहेत़ ‘वरातीमागून घोडे’ या म्हणीप्रमाणे कृषी विभागाने आता हे नापास नमुने विक्री न करण्याचे फर्मान कंपन्या व दुकानदारांना दिले आहे.

मात्र, अगोदर हे बियाणे पेरल्याने फसवल्या गेलेल्या शेतकºयाचे काय? यावर सोयीस्कर मौन बाळगण्यात येते आहे़ बोगस बियाणे विकणाºया कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे व शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीची त्यांच्याकडून वसूली करण्याचे इशारे दिले जातायत पण प्रत्यक्षात तशी कारवाई झाल्याचे ऐकिवात येत नाही़ सरकार, लोकप्रतिनिधी शेतक-यांना कृषी विभागाकडे तक्रारी दाखल करण्यास सांगतायत! ते योग्यही आहे व शेतकरी अशा तक्रारी सध्या दाखल करतायत आणि पुढेही करतीलच पण सध्या शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे जे संकट उभे आहे त्याचे काय? पहिल्या पेरणीलाच बियाणे-खतासाठी उसनवारी करून, कर्ज काढून, खाजगी सावकारांचे पाय धरून पैसे उभे करावे लागलेला शेतकरी दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणणार? हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत.

शेतक-यांना सध्या कारवाईच्या कोरड्या आश्वासनांची व नुकसान भरपाईच्या लोंबकळत राहणाºया हमीची नव्हे तर दुबार पेरणीसाठीच्या थेट व तात्काळ मदतीची गरज आहे कारण दुबार पेरणीसाठी पैसा हाती नसल्याने त्याच्या हातून खरीपाचा हंगामच निघून जाण्याची भीती आहे़ ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या पद्धतीने होणारी कारवाई व मिळणारी नुकसान भरपाई शेतकºयांचा खरीप हंगाम वाचवणार कसे? आणि जर हा हंगाम हातचा गेला तर मग ५० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात असणाºया राज्यातील या हंगामावरच जगणं अवलंबून असणाºया कोरडवाहू शेतकºयांनी जगायचे कसे? महाबीज सरकारी कंपनी असल्याने तिने शेतक-यांना बियाणे बदलून देण्याची ‘साळसूद’ भूमिका घेतली आहे़ मात्र, इतर खाजगी कंपन्यांनी थेट काखा वर केल्या आहेत़ बाजारातील महाबीजच्या बियाण्याचे प्रमाण ३० टक्के आहे.

Read More  उर्जा देणारी लोहयुक्त ‘आबई’

त्यामुळे ३० टक्के शेतक-यांना बियाणे बदलून मिळाल्याने थोडाफार दिलासाही मिळेल पण उर्वरित ७० टक्के शेतकºयांचे काय? हा यक्ष प्रश्न आहे़ कृषी विभाग व कंपन्या यावर उत्तर देत नाहीत आणि देणार नाहीत़ कारण बियाणे सर्व तपासण्या करून प्रमाणित करण्याची व्यवस्था असतानाही बोगस बियाणे सर्रास बाजारात विक्रीला येते, शेतकºयांची फसवणूक होते आणि प्रचंड ओरड झाल्यावरच कृषी विभागाला तपासणीची जाग येते़ तोवर कृषी विभाग व सरकार घोरत पडलेले असते का? हाच प्रश्न! नंतर ज्या कंपन्यांवर कारवाईच्या व गुन्हे दाखल करण्याच्या भीमगर्जना होतात त्याचे प्रत्यक्षात काय होते? याचा सर्वांनाच चांगला अनुभव आहे, त्यामुळे त्यावर वेगळे काही सांगण्याची गरज नाही व तसे काही वेगळे घडेल, अशी अपेक्षा ठेवणेच व्यर्थ! सरकारच्या चौकशीचे नाट्य पूर्ण होईपर्यंत शेतक-यांचा हंगामच निघून जातो व तो नव्या संकटात सापडलेला असतो, हाच सार्वत्रिक अनुभव!

मुळात बियाणे प्रमाणित झाल्याशिवाय व तपासणीशिवाय विक्रीला बाजारात येणारच नाही, अशी यंत्रणा आणि व्यवस्था अस्तित्वात असताना बोगस बियाणे बाजारात येतेच कसे? हा खरा प्रश्न! भ्रष्टाचार, आर्थिक साटेलोटे याची अत्यंत पक्की साखळी, हे त्याचे खरे उत्तर! या मूळ प्रश्नाला राज्यकर्ते कधीच भिडत नाहीत व या प्रश्नाचे उत्तर माहिती असूनही त्यावर उपचार करण्याची इच्छाशक्ती कधीच दाखवत नाहीत! फक्त शेतकºयांना पोकळ दिलासे मिळतात! शेतीचे मूळ प्रश्न, समस्या, अडचणी व या संदर्भातील व्यवस्थेत असणारे दोष, भ्रष्टाचार, आर्थिक हितसंबंधांची साखळी याकडे गांभीर्याने व प्राधान्याने लक्ष देण्याची इच्छाशक्ती जोवर राज्यकर्ते दाखवत नाहीत तोवर बोगस बियाण्याप्रमाणेच बळीराजाच्या उन्नतीचे व उत्कर्षाचे बोगस आश्वासन शेतकºयांना सोसत रहावे लागणार, हे शुक्लकाष्ठ त्याच्या नशिबाचा भाग बनून राहणार, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या