‘चकाकते ते सोने’ असे म्हणायचे दिवस आता राहिले नाहीत़ आजपर्यंत नेहमी सोनेच भाव खाऊन जात असे; परंतु आता चांदीसुद्धा भाव खाऊ लागली आहे़ आजपर्यंत चांदीने दुय्यमपणावर समाधान मानले होते परंतु आता तिला ‘हम भी कुछ कम नहीं’ची जाणीव झाली असावी़ अलीकडे रजतसुंदरी सुद्धा कनकसुंदरीसमोर नाक उडवू लागली आहे़पूर्वी एखादा माणूस किती गब्बर आहे याचा अंदाज त्याच्याकडे असलेल्या सोन्या-चांदीवरून लावला जायचा़ अंगावर सोने मिरवण्याची माणसाची हौस आजही कायम आहे़ किलो-दीड किलो सोने अंगावर मिरवणारा एक ‘गोल्डन मॅन’ काही महिन्यांपूर्वीच अनंतात विलीन झाला़ अशा सुवर्णपुरुषाची झलक अधूनमधून दिसत असत़.
सध्या जगभरात आणि भारतातसुद्धा कोरोना विषाणूने हाहाकार उडवून दिला आहे़ या विषाणूला रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा आटापिटा सुरू आहे़ विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून अमूक करा, तमूक करा अशा सूचना दिल्या जातात़ परवा तर एका कनकप्रेमी महाभागाने सोन्याची मुखपट्टी (मास्क) तयार करून घेतली आहे़ खरे पाहता महिलावर्गाला सोन्याचे वेड असते परंतु अलीकडे पुरुषवर्गसुद्धा सुवर्णाच्या आहारी जाताना दिसत आहे. सोन्याच्या वेडापायी अनेकांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत़ परंतु हे वेड काही सुटत नाही. कोरोना संकटकाळात देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे़ २२ जुलै रोजी भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला.
चांदीच्या दराने तर कमालच केली़ चांदीचा दर ६१ हजार रुपये प्रति किलो तर सोन्याच्या दरानेही १० ग्रॅमसाठी ५० हजार रुपयांचा आकडा ओलांडला. भारतीय बाजारात बुधवारी एक किलोग्रॅम चांदीचा दर ६१ हजार २०० रुपयांवर गेला़ गत सात-आठ वर्षांतील चांदीचा हा सर्वाधिक दर होता़ आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने तसेच टाळेबंदीत सुरक्षित पर्याय म्हणून ग्राहकांच्या खरेदीचा ओघ वाढल्याने मौल्यवान धातूच्या दराने सर्वसामान्यांचे डोळे पांढरे केले़ देशात सोन्याने प्रति तोळा ५० हजारांहून अधिक तर चांदीने किलोमागे ६० हजार रुपयांचा टप्पा पार केला़ आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य वेगाने घसरल्याने सोने प्रति औंस १,९५० डॉलरपुढे गेले.
Read More कोरोना, औषधे आणि इम्युनिटी
सोने दरातील सध्याचा चढता आलेख अमेरिकेच्या बाजारात २००८ मध्ये दिसून आला होता़ त्यावेळी अमेरिकेची आर्थिक स्थिती बिघडली होती़ सध्या आरोग्य तसेच वित्तीय पातळीवर जगभरात आव्हानात्मक वातावरण आहे़ परताव्याबाबत सोने दोन ते तीन वर्षे अधिक लाभ देत राहण्याची शक्यता आहेग़ुंतवणूक तसेच मूल्याबाबतचा हा कल काही कालावधीसाठी कायम राहण्याची शक्यता आहे़ अर्थात सर्वसामान्य ग्राहकांचे प्राधान्य जीवनावश्यक वस्तंूच्या खरेदीला आहे. परंतु ज्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा आहे त्यांची धडपड सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची आहे़ त्यामुळे सोन्या-चांदीने भाव खाल्ला आहे आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे दर आवाक्याबाहेर गेले आहेत़ भारतीय लोक उत्सवप्रेमी आहेत.
श्रावण महिना उजाडला की विविध सण-उत्सवांना उधाण येते़ श्रावण महिना हा चैतन्यमय आणि मंगलमय मानला जातो़ श्रावण महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सणवार असतात़ नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती अशा विविध सणांचा आनंद घेऊन श्रावण महिना येतो़ याशिवाय श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवंतिका पूजन अशा व्रत-वैकल्यांची रेलचेल असते़ समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष भगवान शंकराने प्राशन केले आणि मनुष्यजातीवरील धोका टळला़भगवान शंकराचे मनुष्यावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी पूजा, उपवास करून त्याच्या प्रति आदर व्यक्त केला जातो़ या महिन्यात भाविकांचा कल मासा-दोन मासे सोने खरेदीकडे असतो; परंतु काही वर्षांपासून सोने दरात वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीने सोने खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले आहे.
२१ जुलै रोजी सोन्याचा दर ४९,५२७ रुपये प्रति तोळा इतका होता; परंतु नंतर एका दिवसात हा दर ५३३ रुपयांनी वाढला आणि ५० हजारांचा आकडा पार झाला़ चांदीच्या दरातही वाढ झाल्याने हा दर ६० हजार ९९० रुपये प्रति किलो इतका झाला़ कोरोना विषाणूच्या संकटाचा फटका सोने खरेदीवर बसूनसुद्धा सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ पहायला मिळाली़ जागतिक बाजारात सोन्याचा दर १़३ टक्क्याने वाढला़ त्यामुळे सोन्याची दरवाढ १,८६५.८१ डॉलर प्रति औंस इतकी झाली़ गत ९ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. चांदीच्या किमतीत ६़६ टक्के म्हणजेच ३,४०० रुपये प्रति किलो वाढ झाली़ चांदीचा दर ६१ हजार १३० रुपये प्रति किलो इतका झाला.
Read More आता डेंग्यूची धास्ती
जगभरात कोरोना संकटकाळात कोलमडलेली अर्थव्यवस्था, भारतात रुपयाची होत असलेली घसरण याचा परिणाम सोने खरेदीवर झाला़ महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये रिटेल मार्केटमध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ५० हजारांच्या पार गेला होता़ पहिल्यांदाच सोन्याने हा उच्चांकी दर गाठला़ गत काही काळापासून सोन्याच्या भावात सतत चढ-उतार होत आहेत़ काही तज्ज्ञांच्या मते कोरोना विषाणूचा संकटकाळ दूर झाल्यानंतर सोन्याच्या किमती ५० हजारांच्या पार जाण्याची शक्यता एप्रिलमध्ये वर्तवण्यात आली होती.
आज कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे आणि सोन्याच्या दराने ५० हजारी पार केली आहे़ एप्रिलमध्ये चांदीच्या दरात घसरण झाली होती, आज ते तेजीत आहेत़ कोरोनामुळे जागतिक बाजारात आलेली मंदी पाहता सुरक्षित पर्याय म्हणून अनेकजण सोन्यात गुंतवणूक करीत आहेत अर्थात अशी गुंतवणूक करणारी मंडळी गब्बरच असणाऱ १९७० मध्ये सोने १७५ रुपये तोळा होते हे सांगूनसुद्धा खरे वाटणार नाही़ आज सोन्याच्या दराने ५० हजारी टप्पा गाठल्याने सर्वसामान्यांचे जिणे हराम झाले आहे़ सर्वसामान्य मुलीच्या लग्नासाठी ४-५ तोळे सोने खरेदी करताना नाकी नऊ येतात ही वस्तुस्थिती आहे़ त्यात चांदीचाही तोरा वाढला आहे़ ‘जिए तो जिए कैसे?’