24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसंपादकीयसंपादकीय : भयाचे जंतू अन् आशेचे तंतू!

संपादकीय : भयाचे जंतू अन् आशेचे तंतू!

एकमत ऑनलाईन

कोरोना महामारीचे संकट, या संकटाने मानवी जीवनाच्या सर्वांगावर केलेला विपरित परिणाम आणि त्यातून निर्माण झालेली भयावह स्थिती यासह मागच्या चार महिन्यांपासून भारतातील प्रत्येक नागरिक जीव मुठीत घेऊन जगतो आहे़ सुरुवातीला या रोगाबाबत माहितीच उपलब्ध नसल्याने त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये भय व तज्ज्ञांमध्ये गोंधळ उडणे अत्यंत साहजिकच होते़ मात्र, या रोगाबाबत जसजशी माहिती प्राप्त होण्यास सुरुवात झाली तसतसे त्याबाबतचे भय कमी होऊन जागरूकता निर्माण व्हायला हवी व त्यातून या संकटाशी लढण्याचा आत्मविश्वास तयार व्हायला हवा, त्यादृष्टिने नेतृत्वाने नियोजनबद्ध आखणी करून ठोस प्रयत्न करायला हवेत, हे सूत्र!

आज चार महिन्यांचा काळ लोटल्यावर जगभरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला तर कोरोनाच्या भयंकर उद्रेकाला सामोरे जावे लागलेल्या आणि आजही त्याचा सामना करावा लागत असलेल्या देशांनी वरील सूत्र स्विकारून ते लागू करण्यावर भर दिल्याचे निदर्शनास येते़ त्यामुळेच आता अशा देशांमध्ये कोरोनाचे भय निर्माण करणाºया बातम्यांची जागा कोरोनाच्या लढ्यात, संशोधनात, उपाययोजनांत मिळत असलेल्या यशाच्या बातम्यांनी आणि कोरोनाचे भय हद्दपार करणाºया आशादायी वातावरणाने घेतली आहे़ त्याचा सकारात्मक परिणाम होऊन या देशांमधील जनता वैयक्तिक पातळीवर सजग व दक्ष झाली आहे आणि आत्मविश्वासाने कोरोनाचा मुकाबला करण्यास सज्ज झाली आहे.

त्याच्या परिणामी या देशांमध्ये ठप्प झालेले मानवी जनजीवन, या जनजीवनाचे अर्थचक्र आणि जगणे पूर्ववत करण्याचे प्रयत्न वेगवान झाले आहेत़ मात्र, या जागतिक सूत्राला अपवाद ठरलेला जगातला सर्वांत मोठा व शक्तीशाली देश म्हणजे आपला भारत! प्रचंड लोकसंख्या, खंडप्राय देश, दाट लोकवस्ती, गरिबांची जादा संख्या हे सगळे कच्चे दुवे असतानाही भारताने व भारतातील जनतेने तब्बल ६८ दिवसांचा कडक लॉकडाऊन मुकाटपणे स्विकारला आणि बहुतांशाने यशस्वीही करून दाखवला़ त्यामुळेच सरकारने १ जूनपासून लॉकडाऊनचे नवे बारसे घालत त्याचे नाव ‘अनलॉक’ किंवा ‘पुनश्च हरिओम’ असे केले.

Read More  सहज : इम्यूनिटी अँड ह्यूमॅनिटी

जगात लागू झालेल्या सुत्रानुसार खरं तर भारतातही आता अनलॉक किंवा पुनश्च हरिओमच्या घोषणेला दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आलेला असताना कोरोनाचे भय संपून जनजीवन सुरळीत व्हायला, अर्थचक्राला गती यायला व लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा होता़ मात्र, प्रत्यक्षात आता अनलॉक ३़० ची घटिका समीप आलेली असतानाची स्थिती काय आहे? तर ‘पुनश्च हरिओम’च्या नावावर ‘पुनश्च लॉकडाऊन’च सुरू आहे़ एवढंच नाही तर जिल्ह्यांचे मालक बनलेल्या प्रशासकीय अधिकाºयांमध्ये ‘आणखी कडक लॉकडाऊन’ जनतेवर लादण्याची स्पर्धा सुरू आहे आणि त्याचे समर्थन करताना वाढती रुग्णसंख्या, वाढते मृत्यू या आकडेवारीचा आधार घेतला जातोय आणि जनतेवरच बेशिस्तीचे खापरही फोडले जातेय!

सरकार- प्रशासनाच्या या कारणमिमांसाने भेदरलेले काही जीव मग आणखी दहशतीखाली जाऊन ‘उघडझापी’च्या खेळाचे समर्थन करतायत आणि त्याचा आधार घेत जिल्ह्याचे मालक बनलेले अधिकारी ‘हा जनतेनेच स्वेच्छेने स्विकारलेला, मागणी केलेला लॉकडाऊन आहे,’ असे सांगत तो आणखी कडक करण्यास सरसावत आहेत आणि जीवनावश्यक बाबीही बंद करून टाकतायत! या ‘बंद’मागे कुणाचे स्वारस्य व हित आहे, हा स्वतंत्र विवेचनाचा व अभ्यासाचा विषय आहे़ पण तूर्त एकीकडे देशाचे व राज्याचेही नेतृत्व ‘कोरोनासोबत जगायला व लढायला शिकले पाहिजे’, असा संदेश वारंवार जनतेला देत असताना प्रत्यक्षात जनतेला हे शिकण्याची व त्याची सवय लावून घेण्याची संधीच उपलब्ध होणार नाही, याची व्यवस्था उघडझापीचा खेळ करून का केली जाते आहे?हा खरा प्रश्न!

अनलॉक स्विकारल्यावर रस्त्यावर लोक येणे नैसर्गिक काम सुरू होणे साहजिक आणि लोक एकमेकांच्या संपर्कात येणे अटळच़ त्यामुळे काही काळ रुग्णसंख्या वाढणार, हेच सरकारने अनलॉक जाहीर करताना गृहीतच धरलेले असणार आणि त्याचीच तयारी म्हणून मागच्या चार महिन्यांपासून सर्व काही बाजूला ठेवून सरकारने व प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर संपूर्ण भर दिलेला आहे, असा सरकार, प्रशासनाचाच दावा आहे़ शिवाय आता पुढचे पाऊल उचलत सरकारने या लढ्यात खाजगी रुग्णालयांनाही सामिल करून घेतले आहे़ मग सरकार किंवा प्रशासन वाढती रुग्णसंख्या हताळण्यावर भर देण्यापेक्षा लोकांना घरात कोंडण्यावर भर का देते आहे? याचे शास्त्रोक्त व सविस्तर, पारदर्शी आकडेवारीसह उत्तर जनतेला मिळायला हवे.

Read More  वेध वनौषधीचा….औषधी गुणधर्माची मायाळू

तरच जनतेतील भयही दूर होईल व जनता आणखी सजग, सतर्क होईल़ मात्र, सरकार, प्रशासन त्यावर भर न देता ‘उघडझापी’चा खेळ रंगवून असलेले भय, संभ्रम व गोंधळ आणखी का वाढवते? हेच या संदर्भातील अहवाल, आकडेवारी पाहता कळत नाही़ देशाची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक आहे़ सध्या दिल्लीत १ लाख रुग्ण उपचार घेत आहेत़२ कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीतील रुग्णांचे हे प्रमाण बघितले तर अर्धा टक्का! आता ही आकडेवारी कोणत्या अंगाने घ्यायची हे ठरवले पाहिजे़ दिल्लीत करण्यात आलेला सेरोलॉजी सर्व्हेचा अहवाल हेच अधोरेखित करतो़ या अहवालानुसार दिल्लीतील ४२ ते ४७ लाख लोकांना कोरोना होऊन गेलेला आहे, हे त्यांच्या लक्षातही आले नाही़ सौम्य लक्षणेही फारच थोड्यांमध्ये दिसली.

हे लोक कोरोना होऊनही एवढा दीर्घकाळ ठणठणीत आहेत, याचा अर्थ अंगभूत प्रतिकारशक्तीने कोरोनावर मात होते, हेच सिद्ध होते व व्हायला हवे! लोकांमधील भीती, दहशत कमी करण्यासाठी हे सत्य आवर्जून सांगायला हवे़ मात्र, ते न सांगता या अहवालाचा आधार घेऊनच आणखी ७५ टक्के लोक संसर्गाच्या बाहेर असून त्यांना संसर्गाची दाट शक्यता आहे़, ही दुसरी बाजू तिखट-मीठ लावून सांगितली व चर्चिली जाते! असाच प्रकार महाराष्ट्रातही़ राज्यस्तरावर गठीत एक समिती कोरोना प्रचंड घातकच असा दावा करताना राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ३० टक्के लोक केवळ कोरोनानेच दगावले़ त्यांना इतर कुठलाही आजार नव्हताच, असे ठासून सांगते़ मात्र, त्याचवेळी एकूण रुग्णांपैकीचा मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे प्रमाण व मृत्युदर काय, हे मात्र ठासून वा आवर्जून सांगत नाहीक़ी, कोरोनावर कुठलेही ठोस औषध व उपचार उपलब्ध व ज्ञात नसताना कोरोनाला पराभूत करून घरी परतणा-या रुग्णांचे राज्यातील प्रमाण ६५ टक्क्यांच्या वर आहे, हे ही सांगत नाहीच!

विशेष म्हणजे हे ६५ टक्के रुग्ण बरे होण्याचे सत्य काय? हे जनतेसमोर मांडणे या समितीला आवश्यक वाटत नाहीच! ते आपले कर्तव्य आहे, याचे भान या समितीने बाळगणे तर अलहिदाच! अशी एक ना अनेक उदाहरणे दिल्लीपासून गल्लीपर्यंत पहायला मिळतात़ कोरोना रुग्णसंख्या सांगताना ती बरे झालेले रुग्ण वगळून न सांगता एकूण सांगितली जाते़ जसे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ठळकपणे सांगितले जात नाही तसाच प्रकार मृत्युसंख्येबाबत! राज्यात आजवर एवढे बळी, हे प्रकर्षाने सांगितले जाते़, त्यावर चर्चा घडवली जाते़ मात्र, एकूण रुग्णसंख्येत मृत्युचे प्रमाण किती, हे ठळकपणे अधोरेखित का केले जात नाही? सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसणारे एकूण पैकी किती रुग्ण, त्यांचे प्रमाण काय? हे का सांगितले जात नाही?

खरं तर देश व राज्याच्या नेतृत्वाच्या भूमिकेनुसार सकारात्मक बाबींवर भर देऊन भय कमी करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत! मग नुसते भयच नाही तर तर्कांचा अवडंबर करून दहशत निर्माण करण्याचा हा खेळ का? तो कोण खेळतंय आणि त्यामागे हेतू काय? असे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाहीतच! लोकांमध्ये धास्ती निर्माण केली की, आपण खूप मोठे काम केले, असे मानणाºयांची देशात अजिबात कमतरता नाहीच आणि अशा दहशतीवर स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी प्रचंड सक्रीय होणाºयांचीही कमी अजिबात नाहीच! मात्र, त्याने जनतेचे व देशाचे प्रचंड मोेठे व न भरून निघणारे नुकसान होते आहे़ नकारात्मक, भयाच्या जंतूने स्वत:ला ग्रासून घेत परिस्थिती आणखी बिघडवून घ्यायची की, आशेचे, सकारात्मकतेचे व आत्मविश्वासाचे तंतू विणत हे संकट परतवून लावायचे, पराभूत करायचे, हे सर्वस्वी तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांवर अवलंबून आहे, हे मात्र निश्चित!

Read More  गावाकडच्या पालकास पत्र…

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या