30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeसंपादकीयनिवडणूक प्रचारातील कवित्व !

निवडणूक प्रचारातील कवित्व !

एकमत ऑनलाईन

प्रेमात आणि युद्धात सारे काही माफ असते असे म्हणतात, त्यात आता राजकीय क्षेत्राचीही भर घालावी लागेल असे दिसते. निवडणूक जाहीर झाली की राजकीय नेत्यांना कंठ फुटतो.मतदारांचा अनुनय करण्यासाठी ते काय बरळतील, कसली भाषा वापरतील ते सांगता येत नाही. आपल्या मुद्याचे समर्थन करताना आचारसंहितेचे भान त्यांना राहात नाही. शिवराळ, गलिच्छ भाषा वापरत ते विरोधकांना चावे, ओरखडे, बोचकारे काढण्याचा प्रयत्न करतात. सुसंस्कृतपणाची मर्यादा ओलांडत विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा वेळी निवडणूक आयोगाला त्यांना वठणीवर आणण्याचे काम करावे लागते; परंतु आयोग अशी कारवाई करताना क्वचितच दिसते. बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. दुस-या टप्प्याचे मतदान आज (३ नोव्हेंबर) रोजी होईल.

मध्य प्रदेशातही पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. बिहारमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी निवडणूक प्रचाराची राळ उडवून दिली होती. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यानिमित्ताने एक वेगळाच डाव खेळला. चंपारण येथील प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे. लोकसंख्या समजण्यासाठी जनगणना करून हा निर्णय घेता येईल. मात्र हा निर्णय आमच्या हातात नाही. नितीशकुमार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी मतांची चिंता करीत नाही. याआधी तुम्ही मला काम करण्याची संधी दिली होती. आता पुन्हा संधी द्याल तर अजूनही काही समस्या असतील तर त्या सोडविण्याचा मी प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले. चंपारणमधील वाल्मीकीनगर भागात थारू समाजाचे आधिक्य आहे. या समाजाचा समावेश अनुसूचित जाती-जनजातीत करावा, अशी खूप दिवसांपासूनची मागणी आहे.

एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी या मागणीचे समर्थनच केले आहे. अर्थात त्यासाठी जनगणना करावी लागेल. पण ते आमच्या हातात नाही असे त्यांनी सूचित केले आहे. जनगणना करून लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण हा अत्यंत स्फोटक विषय आहे हे न समजण्याइतपत मुख्यमंत्री दुधखुळे नक्कीच नाहीत. निवडणूक म्हटली की मतदारांना आकर्षित करण्यासाठी काहीही ठोकून द्यायचे असते, नंतर काही का होईना! निवडणूक प्रचार करताना काही जणांची जीभ घसरते तर काहींना आपण कोणत्या पक्षात आहोत याचेसुद्धा भान राहात नाही. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतच असतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही जीभ घसरली. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव यांचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, यांचा मुलींवर विश्वास नाही, म्हणूनच ८-९ मुले जन्माला घातली. अनेक मुली झाल्या मग कुठे मुलगा जन्माला आला! हाच यांचा आदर्श. असे घडले तर बिहारची अवस्था काय होईल? याला प्रत्युत्तर देताना लालुपुत्र तेजस्वी यादव म्हणाले, आदरणीय नितीशकुमार माझ्याबद्दल कितीही वाईट बोलले तरी तो मी आशीर्वाद मानतो.

उदगीर शहर बनले गुटख्याचे माहेरघर

नितीशजी शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकले आहेत म्हणून ते काहीही बोलत आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने भाजपनेत्या इमरतीदेवी यांच्यावर एक दिवसाची बंदी घातली. त्यांना मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीसंदर्भात सार्वजनिक सभा, सार्वजनिक मिरवणुका, रोड शो आणि मुलाखती, माध्यमांमध्ये जाहीर भाषण अशा गोष्टींसाठी बंदी घालण्यात आली. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आणि आता भाजपमय झालेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीतील एका प्रचारसभेत चुकून काँग्रेससाठी मते मागितली. डाब्रा येथील प्रचार सभेत इमरतीदेवी यांच्यासाठी प्रचार करताना ते म्हणाले, डाब्रातील लोक माझेच आहेत. मुठी वर करून सर्वांनी ३ नोव्हेंबरला पंजाचे बटण दाबणार असल्याची खात्री शिवराजसिंह चौहान व मला द्या! नंतर त्यांनी आपली चूक सुधारली आणि कमळाला मत देण्याचे आवाहन केले. याचा अर्थ असा की, ज्योतिरादित्य यांच्यातील काँंग्रेस अजून गेलेली नाही. भाजपचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी शिंदेंची पाठराखण करताना म्हटले की, निवडणूक प्रचारात अशा गफलती होऊ शकतात. चुकून ते तसे बोलले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभ्य भाषेत विरोधकांवर घराणेशाहीच्या आरोपाचे अस्त्र चालविले. राजदचे युवा नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांनी एकाच वेळी लक्ष्य केले. ‘बिहार में डबल इंजिन सरकार विकास की ओर दौड लगा रहा है तो दूसरी ओर डबल डबल युवराज है. एक तो जंगलराज का युवराज और डबल युवराज अपना सिंहासन बचाने के कोशिश में है’ अशी टीका मोदींनी केली. विरोधक घराणेशाहीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा एक तरी नातेवाईक राज्यसभेवर आहे का, मोदींचा एक तरी नातेवाईक संसदेत आहे का, असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे विरोधकांच्या चेह-यावरचा बुरखा फाडला गेला आहे असे सांगत मोेदींनी बिहारी अस्मितेला साद घातली. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दणका दिला.

कमलनाथ यांच्या वादग्रस्त विधानांची गंभीर दखल घेत त्यांचे ‘आघाडीचे प्रचारक’ यादीतून नाव हटविले. आचारसंहितेचा भंग न करण्याची समज आयोगाने त्यांना दिली होती पण कमलनाथ यांनी त्याची दखल न घेता वादग्रस्त विधाने करणे थांबविले नव्हते. भाजपच्या नेत्या इमरतीदेवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख कमलनाथ यांनी जाहीर सभेत केला होता. निवडणूक प्रचारातील आघाडीच्या प्रचारकांची यादी पक्षाला निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. या आघाडीच्या प्रचारकांचा खर्च पक्षाच्या वतीने केला जातो. अन्यथा तो खर्च उमेदवाराच्या खर्चात जमा होतो. कमलनाथ यांच्या विधानांवर राहुल गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्याकडेही कमलनाथ यांनी दुर्लक्ष केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ‘नौटंकी कलाकार’ असा उल्लेख केला होता. निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्यावरही ठपका ठेवला आहे. कैलाश यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांना ‘चुन्नू-मुन्नू’ असे संबोधले होते. कैलाश यांनी काँग्रेसच्या जोडगोळीचा ‘गद्दार-देशद्रोही’ असाही उल्लेख केला होता. कोणत्याही नेत्याने निंदानालस्ती करणा-या शब्दांचा वापर करणे योग्य नव्हे; परंतु एकदा का निवडणुकीचे भूत अंगात संचारले की त्यांना आपण काय बोलतो आहोत याचे भान राहात नाही. हे भूत मतदारांनीच उतरवायचे असते.

कोरोनामुक्तीचा दर ९० टक्क्यांवर, दिवसभरात केवळ चार हजार नवे रुग्ण !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या