देशातल्या अनेक प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना सध्या राष्ट्रीय नेतृत्वाचे डोहाळे लागले आहेत. अर्थात अशा राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात गैर काही नाही. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही! मात्र, या महत्त्वाकांक्षेला कर्तृत्वाची जोड असावी, ही अपेक्षा गैर मानता येणार नाही. तथापि, अर्ध्या हळकुंडात पिवळे होणा-या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना नेमके ही साधी-सोपी अपेक्षाच लक्षात येत नाही आणि म्हणूनच त्यांचे स्वत:च्या प्रदेशाबाहेर विस्तारण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झालेले पहायला मिळत नाहीत. अशा फसलेल्या प्रयत्नांची यादी प्रचंड मोठी आहे व त्यात दिग्गज म्हणवल्या जाणा-या मायावती, मुलायमसिंग यादव, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे. मात्र, तरीही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा स्वस्थ बसू देत नाहीच. अर्थात त्यालाही काहीच हरकत नाही पण या महत्त्वाकांक्षेचे रुपांतर अहंकारात होते आणि त्यातून विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या प्रक्रियेला तडे जाऊन सत्ताधारी भाजपला त्याचा फायदा होतो, हे लक्षात घ्यायला हवे! दुर्दैवाने या वास्तवाकडे डोळेझाक केली जात असल्यानेच सध्या विरोधकांचे ऐक्य ही ‘बोलाची कढी, बोलाचाच भात’ बनलेली आहे. असो! तर अशा वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्यांच्या यादीत नुकतेच आणखी एक नाव सामील झाले आहे ते म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव! मागच्या सहा दशकांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांवर आपला दावा ठोकणा-या तेलंगणास दावापूर्ततेत काही यश आलेले नाही.
मात्र, आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राची भूमी जवळची वाटू लागली आहे. के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी नुकतेच आपल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले आहे. हे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाच्या इच्छेचे व महत्त्वाकांक्षेचे स्पष्ट संकेत! मात्र, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची तर किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व सिद्ध करावे लागते. तसेच इतर काही अटींची पूर्तताही करावी लागते. त्यामुळेच केसीआर यांनी महाराष्ट्रावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ‘व्हाया नांदेड’ हा एमआयएम पक्षाच्या ओवेसींनी चोखाळलेल्या मार्गाला पसंती दिली आहे. मराठवाड्याचा भाग हा दीर्घकाळ निजामाच्या राजवटीखाली होता. त्यामुळे या भागातील जनतेचे तेलंगणाशी असणारे नाते पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही. ओवेसी यांनी आपल्या पक्षाच्या महाराष्ट्रातील प्रवेशासाठी याच नात्याचा आधार घेतला व त्याला त्यांच्या पक्षाला असलेल्या मुस्लिम जनाधाराची जोड दिली. ओवेसींच्या एमआयएमने महाराष्ट्रात सर्वप्रथम नांदेड महापालिकेची निवडणूक लढविली होती व नंतर औरंगाबादमध्ये बस्तान बसवले.
या प्रयत्नात ओवेसींना जे यश आले त्यामागे त्यांच्याकडे असणारे मुस्लिम कार्ड कारणीभूत होते. मात्र, केसीआर यांच्याकडे अशा हुकमी कार्डाचा अभावच असल्याने त्यांनी आपली सगळी भिस्त शेतकरी कार्डावर ठेवली आहे आणि त्याच्या जोडीला जाहिरातीच्या तंत्राने निर्माण केलेल्या भपकेबाजीचा आधार त्यांनी शोधला! त्यामुळेच नांदेडमधील सभेसाठी त्यांचे दोन मंत्री, दोन खासदार तसेच तब्बल ३० आमदार तीन आठवडे नांदेडमध्ये तळ ठोकून होते. प्रसार माध्यमांना मोठमोठ्या जाहिराती देऊन तसेच संपूर्ण नांदेड शहर व परिसरात होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर लावून मोठी वातावरणनिर्मितीही करण्यात आली. केसीआर यांनी केंद्रातल्या व राज्यातल्याही सरकारांवर यथेच्छ तोंडसुख घेत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी आकर्षक घोषणाही केली पण शेवटी हा सगळा प्रयत्न निवळ आपटबारच ठरला! सभेला व केसीआर यांच्या पक्षाच्या राज्यातील प्रवेशाला फारसा प्रतिसाद मिळालाच नाही. या सभेला ‘पक्षप्रवेश सोहळा’ असे नाव देण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ तर सोडाच पण किमान चर्चा होईल अशा नेत्यांचाही या सोहळ्यात पक्षप्रवेश झाला नाही. विदर्भ व मराठवाड्यातील शेवटच्या फळीत कार्यरत काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशावर समाधान मानत केसीआर यांना हा सोहळा साजरा करावा लागला.
शिवाय जाहीर सभेला झालेल्या गर्दीतही तेलंगणाच्या सीमावर्ती गावांमधून गाड्या भरून आणल्या गेलेल्या ‘अमराठी’ लोकांचीच संख्या जास्त होती. थोडक्यात सर्वसामान्यांमध्ये कुतुहल निर्माण करण्यात केसीआर यांना यश आले नाही. केसीआर यांनी राज्यातील सर्व म्हणजे २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाच्या किसान समित्या स्थापन करण्याची घोषणा सभेत केली असली तरी प्रत्यक्षात या समित्या अस्तित्वात येणे किती कठीण आहे, याची पूर्ण कल्पना त्यांना या जाहीर सभेनंतर आलीच असेल. या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करणे, शिवनेरी किल्ल्यावरून समिती स्थापनेस सुरुवात करणे आदी बाबी करून त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा पण हल्ली राज्यात रोजच अस्मितेच्या मुद्यांवरून होत असलेले ‘हाऊसफुल्ल खेळ’ बघून पुरत्या कंटाळलेल्या सामान्यांना केसीआर यांच्या तशाच प्रयत्नात कितपत नवलाई वाटेल, हा प्रश्नच! असो!! महाराष्ट्रात प्रवेश करताना केसीआर यांनी शेतकरी कार्ड वापरण्याचे पक्के केल्याचे मात्र त्यांच्या या जाहीर सभेतून स्पष्ट झाले आहे.
राज्यातला शेतकरी संकटात आहे व अस्वस्थही आहे, हे सत्यच! मात्र, यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय आश्वासनांच्या खेळ्यांमध्ये नागवले गेलेल्या शेतक-यांनी केसीआर यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकत त्यांच्या मागे एकवटावे, असे केसीआर यांचे शेतक-यांप्रति काय कर्तृत्व? हा प्रश्न उपस्थित होतोच! केसीआर शेतक-यांसाठी तेलंगणात जे केल्याचा दावा मोठमोठ्या जाहिराती देऊन करत आहेत ते प्रत्यक्षात त्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठीच्या ‘रेवडी राजकारणा’चा भाग आहे, हे जगजाहीरच! सध्या अशा ‘रेवडी राजकारणावरच’ सर्वच राजकीय पक्षांची भिस्त असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात अशाच ‘फुकट’च्या आश्वासनांची, घोषणांची मांदियाळीच असते! त्यामुळे केसीआर शेतक-यांच्या उत्थानाचे कोणते मॉडेल घेऊन येणार? हा खरा प्रश्न! शेतकरी कार्डावरच पक्षविस्ताराची भिस्त ठेवताना केसीआर यांनी त्यावर खरोखरच गांभीर्याने आणि कळकळीने विचार करायला हवा होता. मात्र, त्यांनी तसा काही विचार केला नसल्याचेच त्यांच्या जाहीर सभेतील वक्तव्यावरून स्पष्ट होते.
शेतक-यांना पाणी व वीज मोफत देण्याच्या व पीक विमा योजनेच्या ‘रेवडीबाज’ आश्वासनांच्या पलिकडे केसीआर यांची मजल गेलीच नाही. त्यामुळे अशा रेवडीबाज आश्वासनांना पुरता सरावलेला राज्यातला शेतकरी केसीआर यांना व त्यांच्या पक्षाला कितपत थारा देणार हा प्रश्नच! थोडक्यात काय तर केसीआर यांचा पक्षविस्ताराचा ‘व्हाया नांदेड’ प्रयोग आपटबारच ठरला आहे. या प्रयोगाने राज्यात थोडीशी खळखळ निर्माण करण्यातही यश मिळविलेले नाही. अर्थात ‘पहिला डाव भुताचा’ अशी स्वत:ची समजूत घालून केसीआर आपले प्रयत्न चालूच ठेवतील कारण त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांना शांत बसू देणार नाहीच. मात्र, ती प्रत्यक्षात उतरायची तर आपल्याला राजकारणाच्या मळलेल्या वाटेवरून जाणे पुरेसे ठरणार नाही तर नव्या वाटा शोधाव्या लागतील, हे या ‘व्हाया नांदेड’ च्या पहिल्या प्रयत्नातून केसीआर यांच्या ध्यानात आलेच असेल अशी आशा करायला हरकत नाही. ही आशा फळली तर केसीआर पक्षविस्ताराच्या नव्या वाटा शोधून परततील अन्यथा मग त्यांची पक्षविस्ताराची महत्त्वाकांक्षा बसपा, सपा या पक्षांच्या मार्गानेच जाईल, हे मात्र निश्चित!